16 January 2019

News Flash

पालकांचा वाढता कल मराठी माध्यमाकडे?

‘‘कोणत्या शाळेत गं तू?’’ आदितीच्या छोटय़ा भाचीला मी विचारलं.

|| मेघना जोशी

पालकांचा मराठी माध्यमाकडे कल वाढतो आहे आणि त्यासाठी शासकीय पातळीवरूनही जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेतच. पण आज तरी हे चित्र शहरांपलीकडेच दिसतं आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये अद्याप इंग्रजी माध्यमाचं आकर्षण असलं तरी इतरत्र मराठी माध्यमाकडे वाढत चाललेला कलही अनेक गोष्टींची सुरुवात ठरू शकतो.. का होतो आहे हा बदल,  हे सांगणारा लेख..

‘‘कोणत्या शाळेत गं तू?’’ आदितीच्या छोटय़ा भाचीला मी विचारलं. ‘‘इंग्लिश मीडियमच्या शाळेत जात होती, पण या वर्षी मराठी माध्यमामध्ये घालतोय बरं का.’’ आदितीच्या भावाने म्हणजे छोटीच्या वडिलांनी परस्परच उत्तर दिलं आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या, सोशल नेटवर्किंग साइट्सवरील पोस्ट झटक्यात नजरेसमोरून गेल्या. लगेचच विषयालाच हात घालत ‘‘का हो?’’ असा प्रश्न विचारला. आदिती पुणे जिल्ह्य़ातली. लग्न होऊन आमच्या कोकणात आलेली त्यामुळे जे काही ऐकायला मिळणार होतं ते थोडं लांबचं म्हणजे पुणे जिल्ह्य़ातलं असणार होतं, पण त्यामुळे मनात एक विचारांचं घर्षण सुरू झालं.

बरोबरच आदितीच्या भावाचं उत्तर ऐकतच होते. ‘‘आमच्या गावात ‘झिरो एनर्जी स्कूल’ आहे बरं का, पूर्ण काचेची शाळा, संपूर्ण सौर ऊर्जेवर असणारी आणि मी हा निर्णय घेण्यामागचं खरं कारण सांगू का तुम्हाला, मी शाळा पाहायला गेलो तेव्हा इयत्ता तिसरीतली सगळी पोरं चक्क विहिरीत पोहत होती. इंग्रजी माध्यमातला विद्यार्थी फक्त चार भिंतींतल्या शिक्षणात अडकलेला असतो, पण मराठी माध्यम हे परिसराचं ज्ञान करून देणारं असतं. वनभोजन, परिसर भेटी वगैरेसारख्या उपक्रमांतून मुलांना आसपासचं बरंच ज्ञान होतं आणि ते खूप गरजेचं आहे म्हणून हा निर्णय घेतला.’’ आदितीच्या भावाचं हे बोलणं ऐकत असताना माझ्यामधल्या शिक्षिकेनं नकळत कान टवकारले. मी स्वत: एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे, पण मी मराठी माध्यमांच्या शाळांकडे माझे प्रतिस्पर्धी म्हणून कधीच पाहत नाही. उलट, माझं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमात झालं असल्याने आणि मी मराठी भाषेची प्रेमी असल्याने तसंच मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने मातृभाषेतून शिक्षण हे व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला पोषक आहे हे मला मान्यच आहे; पण माझा व्यवसाय हे माझ्या चरितार्थाचं साधन. अनुदानित मराठी शाळेत नोकरी मिळाली नाही, त्यामुळे जो व्यवसाय ‘मिळाला’ तो मी स्वीकारलाय. त्यातून एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझी शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी ‘मराठी संस्कृती जोपासणारी इंग्रजी माध्यमाची शाळा’ अशी तिची विशेष ओळख असल्याने मी माध्यमबदल वगैरेबाबतचे माझे आणि इतरांचे विचार स्पष्टपणे आणि त्रयस्थपणे इथे व्यक्त करू शकते. हे सगळं सुरुवातीला सांगायचं कारण मला वैयक्तिकरीत्या ओळखणाऱ्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचा माझं लेखन वाचताना विचार करू नये, एवढं साधं व सरळ आहे. असो.

..तर, त्या नवपालकाचं मत ऐकून घेण्यास मी सज्ज झाले. स्वत: पदवीधर असलेला तो पालक आपलं म्हणणं अगदी व्यवस्थित पटवून देत होता. ‘इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या आपल्या मित्राची मुलगी अभ्यासाच्या ओझ्याने पार वाकली होती. तिला खेळायला वेळ मिळतच नव्हता, पण आता तिला मराठी माध्यमात घातल्याने एकदम हसरं खेळकर पिल्लू झालंय हो ते. माध्यम बदलल्यावर एकदम टेन्शन-फ्री झालीय ती,’ असा किस्सा सांगत त्या कुटुंबाने औपचारिक बोलत माझा निरोप घेतला; पण डोक्यात एक बीज मात्र पेरून दिलं आणि अनेकांशी या विषयावर बोलण्यास प्रवृत्त केलं.  मी या संदर्भात या व्यवस्थेतील लोकांशी संवाद साधायचं ठरवलं. अर्थातच संदर्भ होता माध्यमबदलाचा, अगदी स्पष्टतेने म्हणायचं तर आजकाल पालकांचा मराठी माध्यमाकडे  कल वाढतोय का आणि त्यामागचं कारण काय? त्यासाठी नवपालक, परिपक्व किंवा अनुभवी पालक, मराठी माध्यमातील शिक्षक, इंग्रजी माध्यमातील शिक्षक, दोन्ही माध्यमांतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अधिकारी अशा अनेक लोकांशी संवाद साधला गेला आणि खूप वैचारिक, भावनिक आणि मानसिक घुसळणीतून आता लेखणी उचललीय..

मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये हा ओढा वा कल फारसा दिसून येत नसला तरी निमशहरात आणि गावपातळीवर मात्र हे चित्र दिसू लागलं आहे. काय आहे नेमकं कारण  हा माध्यमबदल होण्यामागचं, याच्या मुळाशी जाण्यासाठी हा लेखनप्रपंच.  खरं तर, त्यासाठी इंग्रजी माध्यम का अस्तित्वात आलं, त्याची गरज का भासू लागली आणि त्याचा बोलबाला का झाला इथपासून सुरुवात करावी लागेल. उच्च आर्थिक गटातील लोकांच्या मुलांना प्रथम त्यांच्या मुलांसाठी ‘विशेष शाळांची’ गरज वाटली आणि बरोबरच ग्लोबलायझेशनसाठी त्यांचं मूल तयार होण्यासाठी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाचीही गरज भासली म्हणून पहिल्यांदा या शिक्षित हाय प्रोफाइल गटासाठी इंग्रजी माध्यमाची गरज निर्माण झाली; पण त्यानंतर जो नवश्रीमंतांचा गट निर्माण झाला, भले त्यात शिक्षित घटक कमी असतील, पण हाय प्रोफाइल गटात त्यांचा वावर सुरू झाला अशा लोकांनी जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं, बरोबरच ग्लोबलायझेशनमध्ये माझं मूल मागे पडू नये या हेतूने शिक्षित श्रीमंतांची वाट चोखाळली. हळूहळू त्याचाच पगडा अर्धशिक्षित आणि अशिक्षित समाजावरही पडू लागला आणि इंग्रजी माध्यमाचा प्रसार आणि प्रभाव गावागावांमध्ये झाला.

म्हणजेच एका विशिष्ट गटाच्या गरजेतून निर्माण झालेलं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे एक स्टेटस सिम्बॉलच्या रूपात तळागाळात पोहोचलं आणि कष्टकरी समाजही सशुल्क शिक्षण घेण्यास तयार झाला. हे अगदी कालपर्यंत चाललं होतं. मग आज असं काय झालं, की चित्र बदलू लागलं किंवा संक्रमणावस्था आली, पालक माध्यमबदलाला राजी झाले. एकंदर संवादातून असं लक्षात आलं की, याला अनेक पैलू आहेत. त्या सगळ्या पैलूंमुळे हा बदल हळूहळू घडतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा ठळक पैलू म्हणजे जाहिरातीचा. जाहिरात हा शब्द कदाचित खटकेल, कोणी त्याला जनसंपर्क म्हणेल, पण मराठी माध्यमाच्या शाळा आता समाजापर्यंत, पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू लागलेल्या आहेत, असं म्हणेल. शिक्षणव्यवस्थेतील ज्या ज्या घटकांशी मी संवाद साधला त्या प्रत्येकाने कोणतीही आडकाठी न ठेवता मान्य केलं की, मधल्या काही काळात मराठी माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांना गरजच नव्हती की, त्यांनी समाजापर्यंत पोहोचावं, त्यांना गरजच नव्हती की मुलांना आकर्षित करून घ्यावं; पण आज जेव्हा पटाधारित शिक्षकसंख्या ही संकल्पना आली तेव्हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. विज्ञानात अस्तित्वासाठीची लढाई सांगितलेली आहेच, तद्वतच अस्तित्व टिकवण्यासाठी शिक्षकांशिक्षकांमध्येच स्पर्धा सुरू झाली आणि त्यातूनच ‘माझी शाळा’ ही शाळेबाबतची आपुलकी निर्माण झाली, यातून समाजापर्यंत पोहोचण्याची मानसिकता तयार झाली आणि शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती, शाळेतील स्पर्धा परीक्षा, शालेय प्रगती यात पालकांचा सहभाग घेतला जाऊ लागला. याबाबत जेव्हा मी ‘नाक दाबलं की..’ अशी म्हण वापरली तेव्हा कोणी ती खळखळत मान्य केली, तर कोणी शांततेने; पण जिल्हा परिषद किंवा सरकारमान्य मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांचं अस्तित्व हे विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा मराठी माध्यमाच्या शाळांनी म्हणजे त्यातील शिक्षकांनी आपापल्या शाळांची ‘जाहिरात’ वेगवेगळ्या प्रकारे करणं सुरू केलं. कदाचित ते त्यासाठी जाहिरात हा सरधोपट शब्द वापरत नाहीत, तो वापरणं त्यांना रुचणार नाही, कुणी त्याला पालकांशी किंवा समाजाशी संवाद म्हणेल तर कुणी समाजाभिमुखता; पण शाळांची फेसबुक पेजेस, त्यांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप्सवर माहिती टाकणं, माहितीचे व्हिडीओज व्हायरल करणं, चिन्मयी सुमीतसारख्या सेलेब्रिटीजच्या व्हिडीओजना प्रसिद्धी देणं याला काहीही म्हटलं तरी शाळा समाजापर्यंत पोहोचल्यामुळे, त्या पालकांसाठी खुल्या झाल्यामुळे, पालकांशी मुक्त संपर्क होऊ लागल्यामुळे साहजिकच पालकांचा मराठी माध्यमाकडे ओढा वाढला. त्याचबरोबर शिक्षण सचिवांनी टेक्नोसॅव्ही शिक्षकांची एक फळी निर्माण केलीय. शैक्षणिक पीडीएफ, चांगले ब्लॉग्ज, शिक्षकांचे स्वत:चे व्हिडीओ चॅनेल्स, ज्यांच्याकडे अप्रतिम प्रेझेन्टेशन स्किल्स आहेत त्यांची माहिती हे सगळे स्रोत मुक्त झाले, ते हळूहळू समाजापर्यंत पोहोचले व त्यातूनच माध्यमबदलाचे हे वारे वाहू लागले, असं एक टेक्नोसॅव्ही शिक्षक सांगतात.

एके काळी चकचकीत शाळा, स्वच्छ परिसर, अत्याधुनिक वर्गखोल्या, ई-लर्निग ही सगळी इंग्रजी माध्यमाची मक्तेदारी होती. त्यामुळे पालकवर्ग त्याकडे आकर्षित होत होता, पण आजकाल ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वाने मराठी माध्यमाच्या शाळांनीही कात टाकली, लोकसहभागातून शालेय इमारती आकर्षक बनवल्या. शिक्षक टेक्नोसॅव्ही बनला, त्यातून आपोआपच संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट फोन्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा शालेय शिक्षणात वापर वाढला. शिक्षक तंत्रप्रेमी झाला. पालकांना याची गरज होतीच, ते वापरलं जावं अशी इच्छाही होती आणि ते नि:शुल्क उपलब्ध होऊ लागलं. त्यामुळे पालक आपोआपच मराठी माध्यमाच्या शाळेकडे वळला. आपलं पाल्य इंग्रजी माध्यमात शिकतंय असं गर्वाने का सांगत होते पालक? कारण तिथे असणारी भव्यता ज्याला आता बेगडीपणा म्हटला जातोय, आता त्याच गोष्टी मराठी माध्यमात आल्याने पालक आपोआपच तिकडे वळला एवढंच. याबाबत मत मांडताना एका मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापकांनी म्हटलं, ‘‘माध्यम वगैरे विचार दुय्यम असतो हो, पालक आकर्षित होतो तो सुविधांकडे. शाळेमध्ये आपल्या पाल्याला मिळणाऱ्या सुविधा जशा की मोफत माध्यान्ह भोजन, मोफत गणवेश, मोफत पाठय़पुस्तके किंवा पाठय़पुस्तकांसाठी मिळणारा निधी आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेपर्यंत दळणवळणाची चोख सुविधा असेल तर पालक शाळेकडे आकर्षित होतोच.’’ हे सारं आज सरकारमान्य मराठी माध्यमाच्या शाळांत उत्तम प्रकारे राबवलं जातंय, त्यामुळेच पालकांचा ओढा त्याकडे वाढलाय. शासनानेही स्वत:च्या धोरणांमध्ये बदल केला हेही नमूद करावं लागेल. आपल्या राज्यातील विद्यार्थी मराठी भाषिक असावा, पर्यायाने मराठीप्रेमी असावा, पण त्याला इंग्रजीचा गंड नसावा, त्यामुळे पहिलीपासून इंग्रजी, पहिलीपासून सेमी-इंग्रजी वगैरेसारखी पावले उचलली गेली आणि त्यातूनच माध्यमबदलाचा हा परिणाम आज जाणवतोय.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या एका अध्यापिकेनं कळीचा मुद्दा सांगितला, ‘‘पूर्वी मराठी माध्यमाचा शिक्षक बहुतांशी उदास आणि साधा होता, पण आता जेव्हा प्रशिक्षण वगैरेच्या दरम्यान तरुण शिक्षकांशी संपर्क येतो तेव्हा त्यांच्यामधील उत्साह जाणवतो. कदाचित टी.ई.टी.मार्फत होणारी शिक्षकभरती, कॉर्पोरेट युगात वाढलेला, स्पर्धेला सरावलेला युवावर्ग आणि नोकरीची गरज ही त्याची कारणं असावीत आणि या युवा शिक्षकांमुळेच पालकांचा कल मराठी माध्यमाकडे वाढतोय.’’ या तिच्या स्पष्ट मताला एका प्राथमिक शिक्षकाने आणि केंद्रप्रमुखानेही दुजोरा दिला.

वर्गात कमी विद्यार्थिसंख्या असल्याने शिक्षणाचा दर्जा उंचावतो असा काही जणांनी सूर लावला; पण हे पूर्वीही होतं की, असं म्हणत अनेकांनी तो खोडून काढला, त्यामुळे विद्यार्थिसंख्येचा मुद्दा पालकांना आकर्षित करण्यासाठी फारसा प्रभावी नाही हे स्पष्ट झालं. अजून एका अभ्यासू शिक्षकांचं म्हणणं इथे नमूद करावंच लागेल. ते म्हणतात, ‘‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या चळवळीचा हा परिपाक आहे. या चळवळीत शिक्षकांना उद्दिष्ट किंवा लक्ष्य ठरवून दिलं गेलं. ते पूर्ण करण्यासाठी शिक्षक जोमाने काम करू लागले आणि त्याचा परिणाम आता जाणवतो आहे. अजून एक बाब नमूद करावी लागेल ती म्हणजे अधिकाऱ्यांच्या दृष्टीमध्ये झालेला बदल. पूर्वी अधिकारी हा शाळा तपासनीसाचं काम करायचा, पण आताचा अधिकारी हा तपासनीस न राहता मार्गदर्शक बनला, तसा त्याच्या दृष्टिकोनात बदल करण्यात आला, त्यामुळे शिक्षक व अधिकारी यांची परस्परांकडे पाहण्याची नजर बदलली. शिक्षक अजून मुक्त व तणावरहित झाले, त्यामुळे आपापल्या शाळांमध्ये शाळेच्या गरजेनुसार उपक्रम राबवण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळालं ज्यामुळे शाळास्तरावर त्यांचा दबदबा वाढला आणि गावस्तरावर शाळेचा दबदबा वाढला आणि पालकांच्या भूमिकेत बदल घडून पालक मराठी माध्यमाकडे वळू लागला.’’

इंटरनॅशनल स्कूल्स हा अजूनही सर्वसामान्यांचा आकर्षणाचा मुद्दा. हेच जाणून शासनाने त्याच धर्तीच्या ३५ ‘ओजस’ शाळांची निर्मिती करायची ठरवली. कोणी त्याला इंटरनॅशनल स्कूल्सचा फोलपणा उघड करण्यासाठी हे शासनाने उचललेलं पाऊल आहे असं म्हणतं, तर कोणी शासनाने पालकांना आकर्षित करण्यासाठी केलेली ही खेळी आहे असं म्हटलं; पण हे मात्र अनेकांनी मान्य केलं की, ‘ओजस’ हा एक प्रयोगात्मक प्रकल्प आहे. आर.टी.ई.मध्ये परीक्षा रद्द असं धोरण आलं आणि आता त्याचा फोलपणा उघडकीला आला त्याचप्रमाणे ‘ओजस’ शाळा प्रायोगिक तत्त्वावर चालू केल्यावरच त्यांची उपयुक्तता वा अनुपयुक्तता ठरेल.

स्वत: शिक्षक असलेल्या एका पालकाशी बोलणं झालं. नोकरी लागण्याआधी शेतकरी असताना या पालकाने आपलं मूल इंग्रजी माध्यमात घातलं होतं. नंतर जेव्हा ते दुसरीत गेलं आणि यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. नंतर हळूहळू यांच्या लक्षात आलं की, भाषेच्या अडसरामुळे विद्यार्थ्यांचा संवाद खुंटतोय म्हणून दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपलं मूल वस्तीशाळेत दाखल केलं. आज चौथीत असणारं ते मूल धनुर्विद्येत राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक विजेतं आहेच, बरोबर शिक्षक अनुपस्थित असताना दिवसभर शाळा सांभाळण्याएवढी क्षमताही प्राप्त केलीय त्याने.

घरचं वातावरण इंग्रजीसाठी पोषक नाही, उच्च प्राथमिक स्तरावर मूल इंग्रजीमध्ये मागे पडतं, इंग्रजी माध्यमात भावनिक व सामाजिक विकास होत नाही, इंग्रजी माध्यमातील शिक्षकांना जिव्हाळा नाही, इंग्रजी माध्यमात शिक्षक सतत बदलत असतात, अशी कारणं पालक आणि शिक्षक देतच असतात; पण त्याबरोबरच झगमगाट, भपका यांची असलेली आवड लपत नाही हे वास्तव आहे.

काही गोष्टींकडे डोळेझाक करणं शक्यच नाहीए. माध्यमबदलाला प्रोत्साहन देणारे पालक आणि मराठी माध्यमातील तरुण शिक्षक यांच्याशी बोलल्यावर एक गोष्ट सहज लक्षात येते की, मराठी माध्यमात प्राथमिक स्तरावर इंग्रजीला दिलेलं महत्त्व. आमची मुलंही इंग्रजी लिहू, वाचू अगर बोलू शकतात आणि हे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊनही शक्य होतंय याचा अभिमान न कळत कुठे तरी बोलण्यात डोकावतोच म्हणजे अजूनही इंग्रजी आलं पाहिजे, त्यावर प्रभुत्व असलं पाहिजे हे समाजमनातून जात नाहीच आहे. दोन मुलांच्या एका पालकांशी बोलताना त्यांनी प्रांजळपणे सांगितलं की, मराठी माध्यमात शिकणारी माझी मुलगी समाजाभिमुख झाली आणि इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलाला इंग्रजीवरील प्रभुत्वाच्या जोरावर केंद्र सरकारी नोकरी मिळाली. इथे एक नमूद करावंसं वाटतं की, काही पालक असेही भेटले, मुलगा इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या(?) शाळेत आणि मुलगी मराठी माध्यमाच्या चांगल्या(?) शाळेत. वर म्हटल्याप्रमाणे आवाजाच्या चढउतारावरून यामधल्या दुटप्पीपणाची जाणीव होते म्हणून मौखिक संवाद महत्त्वाचा. सुरुवातीच्या प्रसंगात आदितीच्या भावाने मी एकुलत्या एका मुलीचा बाप आहे, असं ठासून सांगितलं होतं. ते का, याचं उत्तर मी नंतर इतरांशी संवाद साधल्यावर मला मिळालं.

‘सेमी इंग्रजी’ हा एक वेगळाच मुद्दा. पहिलीपासून, पाचवीपासून किंवा आठवीपासून सेमी इंग्रजी म्हणजे इंग्रजी माध्यमापेक्षा वेगळेपण एवढंच की, फक्त इतिहास, भूगोल मराठीतून, बाकीचे सारे विषय इंग्रजी माध्यमाप्रमाणेच. मराठी माध्यमामध्ये शिकवणारे एक स्पष्टवक्ते शिक्षक म्हणाले, ‘‘अहो, बेस्ट ऑफ फाइव्हमध्ये हा इतिहास, भूगोल विषय निरुपद्रवी ठरतो. बरं, मराठीतून शिकला तर समजायला सोपा जातो त्यामुळे पालक सेमीची निवड करतात आणि म्हणतात, आम्ही मराठी माध्यमात आलोय. आणि हे तुमच्या पाल्यांच्या कक्षेबाहेरचं आहे म्हटलं तर शाळा सोडण्याची धमकी ठरलेलीच.’’ याच्या पुष्टय़र्थ एक केंद्रप्रमुख म्हणाले, ‘‘कोणतीही ठाम भूमिका घ्यायला घाबरणं ही आपली प्रवृत्ती आहे. त्याला अनुसरून सेमी इंग्रजीचा मध्य साधला जातो.’’ तर एक अधिकारी, ती निव्वळ दिशाभूल आहे, असं म्हणाले. या साऱ्यांच्या मते ‘सेमीच्या शुगर कोटिंगमध्ये दडलेली इंग्रजी माध्यमाची कीड कशी नाहीशी करायची याचा विचार होणं गरजेचं आहे.’ मला वाटतं याला कितीही विरोध केला तरी हे वास्तव आहे आणि त्याकडे डोळेझाक करणं हे मातृभाषेवर जाणूनबुजून अन्याय करण्यासारखंच ठरेल.

असो, मराठी माध्यमाकडे पालकांचा वाढता कल ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे. आम्हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचीही आहे, पण इंग्रजी माध्यमाला बेगडी, बाजारी, व्यापारी असं म्हणणारे आम्ही नकळत पालकांना आकर्षित करण्यासाठी त्याच गोष्टींचा वापर करत नाही आहोत ना, हा थोडासा स्वयंमूल्यमापनाचा विषय ठरू शकेल. बरोबरच सेमीच्या वर्खामागचं खरं गणित काय याचा शिक्षक, शासन, प्रशासन यांनी नक्कीच विचार करावा, जेणेकरून मराठीचं संगोपन आणि संवर्धन यासाठी मराठी माध्यमाचा प्रसार हा हेतू खरंच साध्य होईल. अन्यथा मराठी माध्यमाकडे वाढणारा कल हे नुसतं ‘उरलो जाहिरातीपुरता’ असंच ठरेल आणि शिक्षण क्षेत्रातील पायंडय़ाप्रमाणे उद्दिष्टाला बगल देणारी कृतीच अनुभवास येईल.

joshimeghana.23@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 2, 2018 12:12 am

Web Title: marathi medium school