29 May 2020

News Flash

कथा ‘त्या’ कपाची!

पांढऱ्या शुभ्र कापसामध्ये ग्ल्यायको फॉस्फेटसारखी कर्करोगाला कारणीभूत असलेली द्रव्ये असतात.

भारतात सुमारे ३.६ कोटी स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. दर महिन्याला १२ नॅपकिन्स या हिशेबाने वापरलेल्या ४३.२ कोटी नॅपकिन्सचे वजनच ५००० टन होईल. कुठलेही नॅपकिन्स पूर्णपणे नष्ट व्हायला शेकडो र्वषे जावी लागतात. म्हणजेच वापरून फेकून देत असलेल्या या नॅपकिन्सच्या संख्येचा विचार केल्यास दररोज प्रदूषणात किती भर पडत आहे, पर्यावरणावर त्याचा किती विपरीत परिणाम होत आहे, याची नक्कीच कल्पना येईल. म्हणूनच आता आणखी एक पर्याय समोर येतो आहे तो म्हणजे, मेनस्ट्रअल कप.. त्याविषयी..

आटपाट नगरात प्रचंड कचरा झालेला होता. कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नव्हती. अनेक बालके विकृती घेऊन जन्माला येत होती. प्रदूषण भयानक होते. या नगरातील काही मोजक्या स्त्रियांनी पाळीचा कप वापरायचे व्रत घेतले. मीही त्यातलीच एक! साधारण दहा महिन्यांपूर्वी मी सॅनिटरी नॅपकिन्सऐवजी मेनस्ट्रअल कप वापरू लागले. खरे तर या कपाची माहिती एका मैत्रिणीने सांगून दोन वर्षे झालेली होती पण मनात भीती होती की कप शरीरात हरवून बसेल, टोचेल किंवा अवघडल्यासारखे होईल. पण एक-दोन महिन्यांनंतर सवय झाली. मग मी ऊठसूट माझ्या मैत्रिणींना, बहिणींना या कपाचे माहात्म्य सांगू लागले. त्याविषयी लिहायला सुरुवात केली. त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. पुरुष आणि स्त्रियांनी बरेच मुद्दे मांडले. गंमत म्हणजे थोडय़ा दिवसांनी मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ई-मेल येऊ  लागले. त्यातील काही स्त्रियांना मोकळेपणाने धड प्रश्नही विचारता येत नसायचे पण त्यांना माहिती हवी होती. मग मी त्यांच्याशी फोनवर संवाद साधू लागले.

सोलापूरच्या एका ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ – डॉ. बाहुबली दोशी यांनी लेखाच्या प्रती काढून वाटल्या आणि कप मागवून काही जणींना दिले. जळगाव, रत्नागिरी, नाशिक, नागपूर अशा लहान शहरांमधून कपाला मागणी येऊ  लागली. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरूनही माझा लेख ‘व्हायरल’ होऊन खूप जणींपर्यंत पोहोचला. मी काही डॉक्टर नाही, पण हे सर्व स्वानुभवातून आणि मैत्रिणींबरोबर, डॉक्टरांबरोबर केलेल्या चर्चेतून लिहिले होते.
३१ जानेवारीला माझ्या काही ‘कपप्रेमी’ मैत्रिणींनी पिंकॅथॉन (बंगलोर) या स्त्रियांच्या धावण्याच्या शर्यतीमध्ये या मेनस्ट्रअल कपाचा प्रचार करण्याची मोहीम आखली. ही शर्यत स्तनाच्या कर्करोगावरील संशोधन व गरीब रुग्णांवरील इलाजासाठी निधी गोळा करते. शर्यतीच्या अगदी दोन दिवस आधी आम्हाला परवानगी मिळाली. ‘पिंकॅथॉन’ ही शर्यत भारतातील सर्वात मोठी अशी स्त्रियांची शर्यत. ही नुसती शर्यत नव्हे तर एक चळवळ आहे. या वर्षी आठ शहरांत होणाऱ्या या ‘रन’चा आयोजक आहे सुप्रसिद्ध मॉडेल, क्रीडापटू- ‘आयर्न मॅन मिलिंद सोमण!’ आम्ही पाच जणी पाठीवर ‘व्हाय व्हिस्पर व्हेन यू कॅन टॉक!’, ‘थिंक आऊट ऑफ द कप’ अशी मजेशीर वाक्ये व चित्रे असलेले फलक लावून ५/१० कि.मी. धावलो. आमच्यातील एक जण- शिल्पी साहू तर २१ कि.मी म्हणजे हाफ मॅरेथॉन धावली. ती कित्येकदा पूर्ण मॅरेथॉन धावते आणि विशेष म्हणजे पाळीच्या दिवशीसुद्धा सराव चुकवत नाही. शिल्पी गेली ३ वर्षे कप वापरत आहे. आम्ही स्वत:ला नाव घेतले ‘कपस्पर्ट’ म्हणजे कप वापरण्यात एक्स्पर्ट! मिलिंद सोमण यांनीही आमच्या या उपक्रमाची दखल घेतली आणि पुढच्या सर्व ‘पिंकॅथॉन’मध्ये कपाचा प्रचार करण्याचे आवाहन केले. शर्यतीनंतर आमच्या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी जवळजवळ दोन-अडीचशे बायका/मुली आल्या. आम्ही त्यांना मासिक पाळीत सुती कापडाचे पॅड आणि कप हा वापरायला किती सोयीचा आहे आणि त्याचा पर्यावरणाला किती फायदा आहे हे तुलनात्मकरीत्या समजावून दिले. आमच्या ग्रुपमधली सर्वात तरुण- बावीस वर्षांची शर्मदा हैदराबादच्या ‘पिंकॅथॉन’मध्ये कपाच्या प्रचाराला गेली होती. तिने आणि हैदराबादच्या स्त्रियांनी पाचशे जणींशी संवाद साधला. दरम्यान मी फेसबुकवरच्या ‘सस्टेनेबल मेन्स्ट्रएशन इंडिया’ या ग्रुपची सभासद झाले. हा स्त्रियांचा एक खासगी गट  आहे. तिथे प्रियांका नागपाल-जैन माझी मैत्रीण झाली. प्रियांका स्वत: गेली दहा वर्षे हा मेन्स्ट्रअल कप वापरत असून, कप आणि कापडी पॅडचा प्रचार-प्रसार करत आहे. आम्ही दोघींनी कप कसा वापरायचा यावर मराठीमध्ये व्हीडीओ/माहिती तयार करून यू-टय़ूबवर टाकले. गेल्या दोन महिन्यांत बऱ्याच स्त्रियांनी ‘मेनस्ट्रअल कप’ घेतले आणि त्याही त्यांच्या मैत्रिणींना कपाचे महात्म्य सांगू लागल्या! नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित धावण्याच्या स्पर्धेच्या वेळी बोलताना असे जाणवले की आता पुष्कळ जणींना असे काही साधन आहे एवढे तरी माहीत होऊ  लागले आहे. हेही नसे थोडके!

पाळी म्हटली की मूड स्विंग्स, पोट फुगणे, ओटीपोटात कळा, कंबरदुखी अशा नाना गोष्टींनी अगोदरच स्त्रिया त्रस्त असतात. त्यातच कपडय़ामुळे ओलेपणा, डाग पडण्याची काळजी यामुळे स्त्रीला आजाऱ्यासारखे वाटते. डिस्पोजेबल पॅड रक्त शोषतात व त्यामध्ये जंतू वाढायला लागतात. त्याला दरुगधी येते. काही पॅडमध्ये यावर उपाय म्हणून मंदसा सुवास देणारी रसायने घातली जातात. त्यांचा अपाय होण्याचीच शक्यता असते. याउलट मेनस्ट्रअल कपाची रक्ताशी कुठलीच प्रक्रिया होत नाही व ते कपाला फारसे चिकटतसुद्धा नाही. आतापर्यंतच्या कप-प्रचाराच्या अनुभवातून लक्षात आले की बऱ्याच जणींना भीती वाटते की काही झाले तरी एक ‘फॉरीन बॉडी’ शरीरात आहे. मलासुद्धा सुरुवातीला असेच वाटत होते. योनीमार्गात कप कसा मावेल अशी चिंता पहिल्यांदा होती. मग लक्षात आले की जर अख्खे बाळ तिथून येऊ  शकते तर एक पातळ घडी घातलेला कप का नाही आत जाणार? वापरल्यावर समजले की डायॉक्सिनसारखी घातक द्रव्ये असलेले पॅड वापरण्यापेक्षा मेडिकल ग्रेड सिलिकॉनचा कप खरोखरीच चांगला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाळीच्या आधी आणि नंतर कप पाच-सात मिनिटे उकळून र्निजतुक करता येतो. घरच्या घरी खात्रीशीरपणे र्निजतुक करून पुन:पुन्हा वापरता येणारे हे एकमेव साधन आहे, की जे स्त्रियांची ‘त्या’ चार दिवसांची अस्वस्थता कमी करू शकेल.

भारतात ३.६ कोटी स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकिन्स वापरत असाव्यात. दर महिन्याला १२ नॅपकिन्स या हिशेबाने वापरलेल्या ४३.२ कोटी नॅपकिन्सचे वजनच ५००० टन होईल. आपण वापरून फेकून देत असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या संख्येचा विचार केल्यास दररोज प्रदूषणात किती भर पडत आहे याची नक्कीच कल्पना येईल. कुठलेही नॅपकिन्स पूर्णपणे नष्ट व्हायला शेकडो र्वष जावी लागतात. २०१०च्या एका पाहणीनुसार केवळ १२ टक्के स्त्रिया डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. सगळ्याच जणी वापरायला लागल्या तर कचरा आणखी वाढेल. डिस्पोजेबल नॅपकिन्सची गरज तयार केली गेली. सुपर अब्सॉर्बन्ट, अति पातळ असे नवीन नवीन प्रकार आले. पण त्यांचे शरीरावरील आणि पर्यावरणावरील परिणाम काय आहेत त्याचा फारसा विचार झाला नाही. पूर्वी कापडाच्या घडय़ा वापरल्या जायच्या. व्यवस्थित धुऊन उन्हात वाळवल्यास हा उपाय आरोग्याच्या दृष्टीने चांगला, पण स्वच्छ पाण्याचा अभाव, उन्हात वाळत घालण्याबाबतची नकारात्मक मानसिकता आणि स्वच्छतेबद्दलच्या अज्ञानामुळे कित्येक स्त्रिया अजूनही घाणेरडय़ा चिंध्याच वापरतात. अलीकडे नॅपकिन्स पूर्णत: जाळून टाकण्यासाठी इन्सिनरेटर्स आले आहेत. पण त्यासाठी ऊर्जेचा वापर आला शिवाय कार्बन डायऑक्साईड व इतर वायू निर्माण होणारच. यावर एक युक्तिवाद केला जातो की इन्सिनरेटरमध्ये असलेले फिल्टर हे वायू शोषून घेतात. आणि उरलेली राख शेतात टाकता येते. फक्त कापूस असलेले पॅड असेल तर हे ठीक आहे पण आताच्या आधुनिक पॅडची मागची बाजू प्लॅस्टीकची असते. शाळा-कॉलेजच्या मुलींना ही चांगली सोय आहे. पण किती ठिकाणी असे इन्सिनरेटर बसवता येतील? आणि विजेवर चालणारे असतील तर आपल्याकडे किती गावात चोवीस तास वीज मिळते? म्हणजे एका नॅपकिनच्या मागे किती गुंतागुंत आली! नॅपकिन तयार करण्यापासून ते जाळून राख होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कार्बन पायखुणा राहणार.

यापेक्षा एक कप आणि जास्त स्रावाच्या दिवशी एखादे कापडी पॅड वापरले तर सृष्टीवरील सगळाच अत्याचार कमी करता येईल. आणि आपल्या कचऱ्याची व्यवस्था आपल्यालाच करता येईल. आता खूप छान छान रंगाचे व प्रेस बटनाचे कापडी पॅड मिळायला लागलेत. नुकत्या वयात आलेल्या मुलींना सुरुवातीची काही वर्षे हलका स्राव असेल तेव्हा कापडी पॅड वापरायला काहीच हरकत नसते. कप बरोबर आत बसल्यावर खरे तर दुसरे काहीच संरक्षण लागत नाही. पण काही जणी तक्रार करतात की कपाच्या बाजूने गळते. यासाठी कप घेण्याआधी जरा वेगवेगळ्या कपाच्या साईजचा तक्ता पाहावा. आपले माप कसे घ्यावे, व योग्य कप कसा निवडावा यावर सुद्धा माहिती उपलब्ध आहे. बहुतेक जणींना भारतात बनवलेला ‘शी-कप’(२ँी-ू४स्र्) बसतो. शी-कप एकाच साइजमध्ये मिळतो, परंतु आपण सगळ्या अगदी सारख्या नसतो. काही कप थोडे मऊ  असतात तर काही जरा घट्ट. विशीतल्या मुलींसाठी लहान आकाराचे कपसुद्धा मिळतात. अमेरिकेमध्ये कितीतरी मुली वयात आल्या की लगेचच असे छोटे कप वापरायला लागल्या आहेत. कप वापरताना योनीपटल फाटू शकते, परंतु योनीपटल खेळतानासुद्धा ताणले जाऊ  शकते. काही वेळा मातांना भीती वाटते की कप वापरल्यामुळे मुलीचे कौमार्य संपेल, परंतु वैद्यकीय परिभाषेनुसार कौमार्य योनीपटलावरून ठरत नाही; मुलीचा लैंगिक संबंध आला आहे किंवा नाही यावर ठरते. कपाची इंग्रजी ‘यू’ आकाराची घडी घालून तो योनीमार्गात घालायचा. मग हळूच फिरवल्यावर तो आतमध्ये उघडतो व स्राव त्यामध्ये जमतो. हवेच्या दाबामुळे तो आत व्यवस्थित बसतो. तो एकदा नीट बसला की पाच-सहा तासांची सुट्टी. पाळी आहे हेच विसरायला होतं. पुरळ, घसपटणे आणि चालताना जड वाटणे हे सगळंच बंद. गंमत म्हणजे कप वापरताना तुम्ही धावणे, पोहणे, योगा-व्यायाम अगदी निश्चिंतपणे करू शकता. कित्येक योगा शिक्षिका आणि मॅरेथॉन धावपटू आता कप वापरू लागल्या आहेत. पाळी आहे म्हणून कुठलीच बंधनं नाहीत. डागांची काळजी न करता रात्रभर गाढ झोपता येते.
पांढऱ्या शुभ्र कापसामध्ये ग्ल्यायको फॉस्फेटसारखी कर्करोगाला कारणीभूत असलेली द्रव्ये असतात. टॅम्पन किंवा नॅपकिन्समुळे ‘टॉक्सिक शॉक सिन्ड्रोम’सारखे गंभीर आजार होऊ  शकतात. कप वापरणाऱ्या स्त्रियांत तो धोका नाही कारण जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. अगदी साबण नसलाच तर नुसता पाण्याने विसळून कप वापरता येतो. काही जणी म्हणतात कप आणि कापडाचे पॅड धुवत कोण बसणार? पण कप व्यवस्थित बसला तर आठ-दहा तास काढावा लागत नाही. समजा, कापडाचे पॅड वापरलेच तरी कपामुळे ते फारसे खराब होत नाही. आणि कपाची सवय झाल्यावर सुक्या बाजूने चिमटीत धरून अलगद काढता येतो. हाताला काही लागत नाही. सुरुवातीला काढ-घाल करायचा सराव व्हायला एक-दोन महिने जावे लागतात, पण एकदा सवय झाली की डिस्पोजेबल पॅड वापरावेसेच वाटत नाही.
माझ्याकडे वर्षभरापूर्वी घेतलेले नॅपकीन पडून आहेत आणि मला ते कुणाला द्यावेसे वाटत नाहीत कारण ते कुणीच वापरू नयेत असे मला आता वाटते.

आणखी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कॉपर टी (तांबी) बसवलेली असेल तर कप वापरता येईल का? याचे उत्तर सोपे आहे. तांबी गर्भाशयाच्या आत असते तर कप योनी-मार्गात. तांबी बसवल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी कप वापरायला हरकत नसावी. तसेच बाळंतपणानंतरसुद्धा काही महिन्यांनी कप वापरायला हरकत नाही. अर्थात या दोन्ही परिस्थितींमध्ये वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.
भारतामध्ये हे सर्व नवीन असले तरी कपाची कल्पना शंभर वर्षांपेक्षा जुनी आहे. १९८० मध्ये रबराचा ‘द कीपर’ कप आला तो अजूनही मिळतो. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला मेडिकल दर्जाच्या ‘सिलिकोन’पासून  बनवलेले अत्यानुधिक कप आले. ज्यांना रबराची एलर्जी आहे त्या स्त्रियाही पाळीचे कप वापरायला लागल्या. ल्युनेट ही कंपनी २००५ पासून विविध आकारांचे व मापांचे कप बनवत आहेत. भारतामध्ये कपचे उत्पादन मलानी बंधूंनी २०१० मध्ये सुरू केले. सध्या अशा कपची किंमत ७०० रुपये ते १००० किंवा त्यापेक्षा जास्त आहे.  पण एकच कप आपण ५ ते १० र्वष वापरू शकतो.  याउलट नॅपकिन्सचा महिन्याचा खर्च १०० ते १५० रुपये असतो. म्हणजे केवळ सात-आठ महिन्यांत आपले पैसे वसूल होतात. पण एक समस्या आहे- कप अजून औषधांच्या दुकानात आलेला नाही. इंटरनेटवरून, ऑनलाइन मागवता येतो. त्याच्या वैद्यकीय चाचण्या झालेल्या असल्या तरी आजही त्यावर संशोधन सुरू आहे. सर्वेक्षणही होत आहे.  स्त्री-रोगतज्ज्ञ त्याबद्दल सांगत नाहीत. पण याचा प्रसार व्हायला हवा. जसजशी मागणी वाढेल, तसतशी किंमत कमी होईल. दानशूर लोकांनी मदत केल्यास गावागावांतून बायकांना स्व-स्वच्छतेबद्दल व ग्रामस्वच्छतेबद्दल जागृत करता येईल. मुलींची शाळा-कॉलेजांमधील हजेरी व त्यांची गुणवत्ता वाढेल.

मैत्रिणींनो, ही वेळ आहे आटपाट नगरातल्या प्रचंड कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची. आपणही त्याला छोटय़ाशा कृतीतून हातभार लावू शकतो. त्यासाठी तुम्ही स्वत:ला बदलायची वेळ आली आहे, वेळ आली आहे डिस्पोजेबल पॅडच्या पलीकडे विचार करण्याची.. पर्यावरण रक्षणार्थ पाऊल उचलण्याची आणि स्वत:ला मुक्त करण्याची!
कहाणी सुफळ संपूर्ण!

– गौरी दाभोळकर
(लेखिका बंगळुरूच्या एका ‘आय बी’अभ्यासक्रमाच्या आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षिका आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2016 1:20 am

Web Title: menstrual cup
Next Stories
1 बदलू या होळीचा ‘रंग’
2 आजचं मरण उद्यावर..
3 समानतेच्या नावाने चांगभलं!
Just Now!
X