माधुरी ताम्हणे

एकेकाळी रेसकोर्स आणि पत्त्यांच्या क्लबवर जाणारा, मटक्याच्या अड्डय़ावर आकडे लावणारा अट्टल जुगारी आज घरबसल्या ऑनलाइन गॅम्बलिंग, क्रिकेट बेटिंग तसेच व्हिडीओ पार्लर्स, लॉटरी सेंटर्सचे व्यसनाधीन जुगारी झाले आहेत, त्यात आता प्रौढांबरोबर तरुण आणि मुलंही मोठय़ा संख्येने आहेत. अनेक कुटुंब याचमुळे उद्ध्वस्ततेच्या मार्गावर आहेत. मात्र आशेचा किरण आहेच.. कारण या निराश व एकाकी  जुगारी मुलाला वा नवऱ्याला यातून बाहेर काढण्यासाठी ठामपणे उभ्या असणाऱ्या स्त्रियांच्या मागे उभी आहे, ‘गॅमेनॉन’ ही संस्था. त्यांच्या कार्याविषयी..

प्रतीक उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण झाला. सहजगत्या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला आणि आईवडिलांचा आनंद गगनात मावेना. परिस्थिती सुमार असली तरी तैल बुद्धिमतेच्या या मुलाला डॉक्टर करायचं, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. प्रतीक हॉस्टेलला गेला आणि सातत्याने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. सुरुवातीला गंमत म्हणून तो त्या मुलांबरोबर पत्ते खेळायला लागला आणि बघता बघता अट्टल जुगारी बनला. महाविद्यालयाला दांडी मारून क्लबला जाणं सुरू झालं. महाविद्यालयानं दोन पत्रे घरी पाठवली. ती नेमकी त्याच्याच हाताला लागली. त्यामुळे आईवडिलांना त्याच्याविषयी, त्याच्या व्यसनाविषयी काहीच कळलं नाही. अत्यंत कुशाग्र बुद्धिमतेमुळे तो एम.बी.बी.एस मात्र झाला. पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला, काही दिवस गेले आणि त्याच्या घरी एक निनावी पत्र आले. त्या पत्रात प्रतीक महाविद्यालयात न येता क्लबमध्ये जाऊन जुगार खेळतो. सबब त्याला इथे ठेवू नका, अशी कळकळीची विनंती केली होती. पत्र वाचून प्रतीकचे आईबाबा हादरले. त्यांनी हॉस्टेलकडे धाव घेतली. प्रतीक कुठेच सापडला नाही. शेवटी एका मित्रानं त्यांना क्लबचा पत्ता दिला. पण प्रतीकला त्या क्लबमधल्या खुर्चीनं जणू बांधूनच टाकलं होतं. तो आईवडिलांना भेटायलासुद्धा आला नाही.

अखेर आईवडिलांनी त्याला कसंबसं घरी आणलं. जुगारात त्याची अंगठी, चेन, मोटारबाईक गहाण पडली होती. त्याला महाविद्यालयानं काढून टाकलं होतं. आईनं प्राचार्याच्या हातापाया पडून त्याची जागा राखली. सर्व कर्ज फेडलं. प्रतीक एम. डी. झाला. आईनं स्वत:चे दागिने विकून त्याला क्लिनिक थाटून दिलं. प्रतीकची प्रॅक्टिस चांगली सुरू झाली आणि पुनश्च घात झाला. हातात पैसे खेळू लागताच पुन्हा एकवार त्याची पावलं जुगाराकडे वळली. सुदैवाने त्याला ‘गॅम्ब्लर अ‍ॅनॉनिमस’चा पत्ता मिळाला. तो बैठकांना जाऊ लागला. इतर सदस्यांचे स्वानुभव आणि परखड आत्मपरीक्षण या दुहेरी प्रयत्नांतून आज तो जुगारापासून लांब रहाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र साठी उलटलेले आईवडील, आपल्या या चाळिशीतल्या अविवाहित, व्यसनाधीन मुलाच्या भविष्याच्या चिंतेने सतत धास्तावल्या मनाने दिवस ढकलत आहेत..

नाडकर्णी बांधकाम व्यावसायिक तर त्यांची पत्नी सामाजिक कार्यकर्त्यां, पैसा अमाप! घरात महाविद्यालयात जाणारे दोन मुलगे. अभ्यासाच्या निमित्ताने थोरल्या मुलाच्या खोलीचा दरवाजा सतत बंद! या बंद दरवाजाआड हा मुलगा ऑनलाइन जुगार खेळतोय हे अनेक दिवस आईवडिलांना कळलंच नाही. आपल्या डेबिट कार्डवरून मोठय़ा रकमेचा अपहार आपला मुलगाच करतोय, त्यासाठी तो अनेक गैरमार्ग अनुसरतोय हे लक्षात येताच वडील हादरले. पण लोकलज्जेस्तव त्यांनी हे प्रकरण दाबलं. ‘जी.ए.’च्या बैठकांची माहिती मिळूनसद्धा केवळ समाजातील पत आणि प्रतिष्ठा यांचा विचार करून ते तिथे फिरकले नाहीत. त्यामुळे मुलाची वेगाने अधोगती होत आहे आणि एक सुखवस्तू कुटुंब देशोधडीला लागत आहे..

परंतु मुलांच्या भवितव्यापेक्षा मोठय़ा झालेल्या लोकलाजेच्या नको त्या कल्पनांमध्ये न अडकता ज्या जुगारी व्यक्तींचे कुटुंबीय ‘गॅम्ब्लर अ‍ॅनॉनिमस’ आणि ‘गॅमेनॉन’ या संस्थांच्या बैठकांना नियमितपणे हजेरी लावतात ते मात्र स्वत:सह संपूर्ण कुटुंबाला संभाव्य अधोगतीपासून वाचवत आहेत. संपूर्ण कुटुंबाला जीवदान देणाऱ्या या बैठकांचा उगम कसा झाला ते पहाणे म्हणूनच अगत्याचे आहे.

डॉ. बॉब आणि बील डब्ल्यू हे दोघे जण एका हॉटेलमध्ये एकत्र भेटले. दोघेही अनिवार्य (अट्टल) दारुडे. ते आपली कर्मकथा एकमेकांना ऐकवू लागले. मध्यरात्र उलटली आणि त्या दोघांच्या लक्षात आलं की आज संध्याकाळी आपण बारमध्ये दारू प्यायला गेलो नाही. आपण दुसऱ्याशी बोलतो तेव्हा आपल्याला दारूची आठवण येत नाही.. दारू सोडण्यासाठीचा हा उत्तम उपाय होता.. बैठक आणि बैठकीमधील स्वानुभव कथनाच्या संकल्पनेचा तिथेच उदय झाला.. तो दिवस होता, १० जून १९३५.

पुढे त्यांना त्यांच्यासारखे आणखी अट्टल दारूडे भेटले आणि ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ आणि पुढे त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘अ‍ॅलेनॉन’ या संस्थेची स्थापना झाली. त्यांनी आपलं ऑफिस थाटलं. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले तेव्हा तिथल्या सचिवाला जुगारी लोकांचे फोन येऊ लागले की आम्हाला दारूप्रमाणे जुगाराचंही व्यसन आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आमच्यासाठीसुद्धा अशी एखादी संस्था आहे का? त्यातूनच बिल डब्लू आणि त्याचा एक मित्र एकत्र आले आणि १९५७ मध्ये अमेरिकेत ‘गॅम्बलर्स अ‍ॅनॉनिमस’ (जी. ए.)या संस्थेची रीतसर स्थापना झाली.

जुलै १९६० मध्ये तीन दु:खी-कष्टी स्त्रिया अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरातील एका हॉटेलात एकत्र आल्या. बोलता बोलता त्यांच्या लक्षात आलं की तिघींचेही नवरे अट्टल जुगारी आहेत. आपण समदु:खी आहोत, हे लक्षात घेऊन त्यांनी त्याचदिवशी स्वमदत गट स्थापन केला आणि ‘अ‍ॅलेनॉन’च्या धर्तीवर त्याला ‘गॅमेनॉन’ हे नाव देण्यात आलं आणि त्या गटाचं कामकाज चालवण्यास सुरुवात केली. ‘गॅमेनॉन’ ही संघटना व्यसनाधीन जुगाऱ्यांच्या कुटुंबीयांची- बायका, मुले, नातेवाईक, आई, वडील आणि मित्रमंडळी यांची आहे.

‘जी. ए.’ आणि ‘गॅमेनॉन’ या दोन्ही संस्थांच्या भारतातील स्थापनेसाठी मात्र १९९० हे वर्ष उजाडावं लागलं.  रेसचं व्यसन लागल्याने अफाट कर्जाचं ओझं असलेला मुनीर देणेकऱ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी अमेरिकेतल्या एका नातलगाकडे पळाला. तिथे त्याला ‘गॅम्बलर्स अ‍ॅनॉनिमस’ या संस्थेची माहिती मिळाली. तो नियमितपणे बैठकांना जाऊ लागला. त्याचा फायदा म्हणजे जुगारापासून हळूहळू दूर गेला. त्यातून पूर्णत: बाहेर पडला. त्याची पत्नी तर या बैठका, शेअरिंग्ज आणि ‘गॅमेनॉन’च्या बारा पायऱ्या आणि बारा रूढींचा कार्यक्रम याने एवढी प्रभावित झाली की तिने या विषयाशी संबंधित सर्व साहित्य वाचण्यास सुरुवात केली. कालांतराने हे जोडपं भारतात परतलं आणि त्यांनी ‘जी. ए.’ची स्थापना मुंबईत करण्याचं ठरवलं. सुदैवाने मुंबईतल्या दोन जोडप्यांना, जे अट्टल जुगाराच्या समस्येने होरपळलेले होते, त्यांना मुनीर आणि त्याच्या पत्नीच्या या धडपडीविषयी कळलं. त्यांनी मुनीरची भेट घेतली. पहिली बैठक मुनीरच्या रेसकोर्सजवळील घरात झाली आणि पुढे  व्यसनाधीन जुगाऱ्यांसाठी ‘गॅम्बलर्स अ‍ॅनॉनिमस’ (जी.ए.) आणि  त्याच्या कुटुंबीयांसाठी ‘गॅमेनॉन’ची रीतसर स्थापना झाली आणि त्यांच्या नियमित बैठकांना सुरुवात झाली. त्याचाच फायदा म्हणू किंवा गरज म्हणून १६ नोव्हेंबर १९९१ ला ठाणे येथे ‘चैतन्य गॅमेनॉन’ गट सुरू झाला आणि ६ एप्रिल २०१७ मध्ये कल्याण इथेही एक गट तयार झाला.

‘गॅमेनॉन’ ही जादूची कांडी नाही. इथे प्रवेश करताच जुगाऱ्याचा जुगार तात्काळ थांबेल, अशी आशा करणे अत्यंत भाबडेपणाचे ठरेल. मात्र हे जुगारी नंतर नंतर एकाकी आणि निराश होत जातात. त्यांची अतिशय जवळची व्यक्ती मग ती आई असो वा पत्नी इथे पोहोचते.  इथे आल्यावर तिलाही जाणीव होते की आपल्यासारखे समदु:खी अनेक जण आहेत. तेही आपल्याप्रमाणेच कमकुवत, चिडखोर, कडवट आणि असमंजस होते. पण आपल्या मनाचे दरवाजे खुले केले तर हीच माणसं खुशीने, मित्रत्वाने आपल्याला मदत करू इच्छितात. त्यांच्याप्रमाणे आपल्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडू शकतात. मुख्य म्हणजे कोणतीही परिस्थिती एवढी कठीण नसते की जिला आपण घाबरून जावं आणि कोणतेही दु:ख असं नसतं जे कधी कमी होऊच शकत नाही, याची जाणीव झाली की अट्टल जुगाऱ्यांचे नातलग या समस्येसह आणि समस्याग्रस्तासह कसं जगायचं ते स्वत:च शिकतात. कारण बैठकीला गेल्यावर त्यांच्या कानांवर पहिलं वाक्य हेच पडतं की ‘ही इज नॉट मॅड, ही इज नॉट बॅड. ही इज अ सिक पर्सन.’ शारीरिक व्याधिग्रस्ताला आपण जसे सांभाळतो, त्याची सर्वतोपरी काळजी घेतो तद्वत या मनोरुग्णाचीही काळजी घ्यायला हवी. अर्थात जुगाऱ्याची काळजी घेण्याची पद्धत आणि स्वरूप हे वेगवेगळे असते. कारण प्रत्येक जुगाऱ्याचे व्यक्तिमत्त्व, सवयी, कौटुंबिक पाश्र्वभूमी, शिक्षण, व्यवसाय आणि जुगाराचे प्रकार हे वेगवेगळे असतात. काळानुसार जुगाराचे स्वरूप बदलते आहे तसच वयोगटही बदलतो आहे.

एकेकाळी रेसकोर्स आणि पत्त्यांच्या क्लबवर जाणारा, मटक्याच्या अड्डय़ावर आकडे लावणारा अट्टल जुगारी आज घरबसल्या ऑनलाइन गॅम्बलिंग, क्रिकेट बेटिंग, शेअर्स व्यवहार या प्रकारांकडे वळला आहे. अनेक शाळा-महाविद्यालयाच्या आजूबाजूला असणारी व्हिडीओ पार्लर्स, लॉटरी सेंटर्सवर खेळायला जाणारी शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण त्यात अडकले आहेत. अनेकजण तर खासगीपण जपण्याचे वा अभ्यासाचे निमित्त करून खोलीचा दरवाजा बंद करतात आणि आईवडिलांच्या क्रेडीट कार्ड्सचे पिन नंबर वापरून सर्रास ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाच्या जाळ्यांत अडकतात. परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत घरच्या मंडळींना याची अनेकदा जाणीवसुद्धा होत नाही. आणि अशी जाणीव झाली तरी हे व्यसन लोकलाजेस्तव लपवण्याकडेच अधिक कल असतो. त्यातही आईची माया ही अनेकदा मुलाला पाठीशी घालत स्वत:ला दोष देण्यापर्यंत मजल मारते. अखेरीस शेवटचा उपाय म्हणून, ‘लग्न करून दिले की हा सुधारेल’ या विचारापर्यंत टोक गाठून त्याला बोहल्यावर चढवले जाते. यातून निष्पन्न एवढेच होते की दुसरा एक तरणाताठा जीव या समस्येने होरपळून जातो. उद्ध्वस्त होतो आणि परिस्थिती मात्र जैसे थे राहते!

पतीच्या जुगाराच्या समस्येने होरपळलेल्या स्त्रियांच्या कर्मकहाण्या जवळपास सारख्याच असतात. नंदिनी त्यापैकी एक. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उच्च शिक्षण यामुळे लहान वयात खूप मोठय़ा पदावर पोहोचलेला जोडीदार तिला लाभल्यामुळे नंदिनी अतिशय खूश होती. परंतु लग्नानंतर महिनाभरात तिच्या लक्षात आलं की तो अट्टल जुगारी आहे. रात्ररात्र क्लबमध्ये तो पत्ते खेळत बसे. पण तिने तो संसार स्वीकारला, स्वबळावर! पुढे १० वर्षांत १४ नोकऱ्या झाल्या. पण कधीही त्याचा पगार घरात आला नाही. अखेर कंटाळून दोन मुलींना घेऊन ती माहेरी गेली. दरम्यान, अनेक वेळा त्याने मुलींच्या डोक्यावर हात ठेवून आणाशपथा घेतल्या. सेल्फ हिप्नॉटिझम, मानसोपचार झाले. आपला नवरा हळूहळू सुधारेल या आशेवर ती पुन्हा एकदा सासरी परत आली. जुगाराच्या व्यसनात तो इतका बुडाला होता की पगाराच्या दिवशी घरी आलाच नाही.    एवढंच नव्हे तर कोणाचं तरी देणं द्यावं या उद्देशाने उशीखाली ठेवलेले स्वत:च्या पगाराचे पैसेही त्याने नेल्याचं तिच्या लक्षांत आलं. तेव्हा मात्र तिचा तोल गेला. घरी आल्यावर भांडणात गळ्यातलं मंगळसूत्र तोडून तिने त्याच्या अंगावर फेकलं. त्याने ते अगदी शांतपणे उचललं आणि तो घराबाहेर पडला.. जुगार खेळायला! कर्जाचा आकडा वाढतच चालला होता.. त्याची नोकरी गेली. पण ऐन दिवाळीत गलेलठ्ठ पगाराची दुसरी नोकरी मिळाली. आता तरी तो सुधारेल म्हणून नंदिनीने उमेदीने दिवाळीची तयारी केली. आकाशकंदील लावले आणि मुलींना घेऊन खरेदीला जायचं या त्याच्या शब्दांवर विसंबून ती संध्याकाळची तयार होऊन वाट पाहत बसली. पण तो पुढे तीन दिवस घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी मुलींना अभ्यंगस्नान घालताना डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूधारांवर ती पाण्याचे हबके मारत राहिली. त्याला आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप होत होता पण व्यसनाने त्याला इतकं घट्ट आवळलं होतं की पुन्हा पुन्हा तो त्याकडेच वळत होता. शेवटी पुनश्च हे जोडपं मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलं. तिथे मुनीरचा पत्ता मिळाला. ‘जी.ए.’च्या नियमित बैठका सुरू झाल्या. अखेर त्याची दारू आणि जुगार दोन्हीही व्यसनं सुटली.

वसुधा सुशिक्षित, पण कडक शिस्तीच्या कुटुंबात वाढलेली तरुणी.  वसुधाचं लग्न झालं उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात. लग्नानंतर महिनाभरात एकदा रात्री तो घरी आलाच नाही. माहेरी असं कधीच  न अनुभवलेली वसुधा सासरी सगळे शांत झोपलेले पाहून हादरलीच. रात्रभर ती जागत बसून राहिली. पहाटे दिरांना उठवून तिने हे सांगितलं. त्यांनी शांतपणे चप्पल घातली आणि तिला म्हणाले, ‘‘चल!’’ तिला घेऊन ते एका क्लबमध्ये गेले. नवरा आतून तांबारलेल्या डोळ्यांनी बाहेर आला तेव्हा तिला पहिल्यांदा कळलं की तो इथे रात्रभर पैसे लावून पत्ते खेळतो. त्यानंतर आपण त्याला प्रेमाचा वर्षांव करून सुधरवू म्हणून तिने मनापासून सारे प्रयत्न केले. भांडणतंटे, अबोला सर्व झालं. पण तो काही सुधारेना. एकदा त्याने वसुधाला सांगितलं, माझ्या डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं आहे ते फेडायला मी नोकरी सोडतो आणि येणाऱ्या पैशांतून ते फेडतो. पण प्रत्यक्षात नोकरी सोडल्यावर मिळालेले सगळे पैसे पुन्हा जुगारातच गेले. कर्जाचा आकडा मात्र दुप्पट झाला. शेवटी घटस्फोट घेण्याचं नक्की झालं. लहान मूल पदरात होतं आणि जुगाराचं व्यसन सोडल्यास नवरा म्हणून तो खूप चांगला माणूस होता. दरम्यान, उभयताना ‘जी.ए.’ आणि ‘गॅमेनॉन’चा पत्ता मिळाला. अर्थात त्याने या बैठका आणि ‘जी.ए.’चा कार्यक्रम लवकर स्वीकारला नाही. पण बायकोच्या प्रयत्नाने हळूहळू कालांतराने त्याचे व्यसन सुटले.

प्रेमविवाह केलेल्या निर्मलाच्या आयुष्यात जुगार लग्नानंतर बारा वर्षांनी आला. तोवर

त्याचं दारू पिणं आणि सिगरेट ओढणं तिनं स्वीकारलं होतं.    प्रमोशननंतर त्याला पगाराखेरीज बरीच रक्कम मिळत असे. पण हे जास्तीचे पैसे कुठे जातात ते तिला कधीच कळलं नाही. दरम्यान, तो रात्ररात्र घराबाहेर राहू लागला. पैशांवरून दोघांची भांडणं विकोपाला गेली तेव्हा एकदा त्याने सांगून टाकलं, मी जबरदस्त जुगार खेळतो. बँक बॅलन्स शून्य! डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज आहे. निर्मला हादरली. तिच्या बहिणीने तिला आणि नवऱ्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेलं. त्यांनी ‘जी.ए.’ आणि ‘गॅमेनॉन’विषयी माहिती दिली. त्याने फारसं लक्ष दिलं नाही. परंतु निर्मलाने मात्र ‘गॅमेनॉन’ची सर्व सूत्रं स्वीकारली, अभ्यासली आणि जीवनात त्याचा अंगीकार केला.

‘गॅमेनॉन’च्या कार्यक्रमात बारा पायऱ्यांचा अंतर्भाव आहे. यातील पहिली पायरी सांगते की या सत्याचा स्वीकार करा की आपल्या आयुष्यातील अत्यंत जवळची व्यक्ती अनिवार्य (अट्टल)जुगारी आहे. यानंतरच्या सर्व पायऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी बदलावं यासाठी आहेत. या अट्टल जुगाऱ्याच्या कुटुंबीयांनी हा कार्यक्रम मनापासून स्वीकारला आणि ते यात टिकले तर त्यांच्यासह जुगारी व्यक्तीलाही अत्यंत फायदा होतो. यानंतरची पायरी हे सांगते की जुगारी व्यक्तीच्या कुटुंबीयांनी हे मान्य करावं की आपल्या आयुष्यात जो प्रश्न निर्माण झालाय तो सोडवण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणूनच यासाठी आम्हाला ‘उच्चशक्ती’ची मदत घेणं आवश्यक आहे. या वैश्विक शक्तीची संकल्पना प्रत्येकाची वेगवेगळी असते.

बैठकीमध्ये हे आवर्जून सांगितलं जातं की जुगारी व्यक्तीला पैशांचे व्यवहार हाताळता येत नाहीत. पैसे हातात पडले की त्याचे स्खलन होते. त्यामुळे ‘गॅमेनॉन’ सदस्याने सर्वप्रथम सर्व आर्थिक व्यवहार स्वत:कडे घ्यावेत आणि त्याला फक्त खर्चापुरते आवश्यक पैसे द्यावेत. एकदा हे कळल्यावर प्रीतीसारखी खंबीर स्त्री तात्काळ योग्य ती पावले उचलते. तिने बँक मॅनेजरला स्पष्ट कल्पना दिली की इथून पुढे बँकेतून पैसे काढण्याचा अधिकार आपल्याला असावा, कारण आपला नवरा जुगारी आहे. त्याचा पगार बँकेत जमा व्हावा यासाठी तिने नवऱ्याच्या बॉसला भेटून वास्तवाची कल्पना दिली. आपला पैशांचा स्रोत बंद होतोय हे लक्षात येताच त्याने मित्र, नातलग यांच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. हे कळताच प्रीतीने सर्वाना स्पष्टपणे सांगितलं, ‘‘त्याला कोणीही पैसे देऊ नका. दिल्यास ते फेडण्याची जबाबदारी माझी नाही.’’ हळूहळू त्याला पैसे मिळणं बंद झालं. मात्र तिचा नवरा नियमित ‘जी.ए.’ च्या बैठकांना येत असल्याने हे आपल्या हितासाठीच केले जात आहे, याची रास्त जाणीव त्याला होती. त्यामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला नाही.

बैठकांना नियमित हजेरी लावण्यामुळे ‘गॅमेनॉन’ची तत्त्वं, जबाबदारी आणि प्राधान्यक्रम यांची नेमकी जाणीव होते. एकदा ही जाणीव झाली की पुढील पायरीचा स्वीकार करणं सोपं जातं. ही पायरी सांगते, जुगाऱ्यासोबत वागताना ‘प्रेमळ अलिप्तता’ आवश्यक आहे. म्हणजे त्या माणसावर प्रेम करा. पण त्याच्या समस्येपासून अलिप्त राहा. उदा. तो वेळेवर घरी आला तर प्रेमाने त्याला जेवण वाढा. तो उशिरा येत असेल तर त्याचं ताट झाकून ठेवा. मात्र त्याच्यासाठी जागत बसू नका. मात्र रोजच अन्न फुकट जाऊ लागलं तर यापुढे जेवण मिळणार नाही, याची स्पष्ट कल्पना द्या.

घरात अट्टल जुगारी असेल तर तो सतत जुगार आणि त्यासाठी पैसा कसा उभा करावा, या चिंतेत तर कुटुंबीयांचे विचार त्याच्या चिंतेत. मात्र ‘गॅमेनॉन’च्या बैठकांमुळे परिस्थितीशी सामना करण्याचं धैर्य येतं. वृंदा सांगते, ‘‘एरव्ही त्याच्या येण्याच्या वेळेला मी सतत दारात येरझारा घालत राही. धास्तावल्या मनाने रिक्षाचा कानोसा घेई. पण बैठका सुरू झाल्या. इतर जणींचं शेअरिंग ऐकलं आणि माझी अस्वस्थता, काळजी दूर पळाली. मी शांत झाले. एकदा ऐन दिवाळीत तो चार दिवस घरी आला नाही तरी मी फराळ केला. मुलांसह फटाके वाजवले. कंदील बनवले. उत्साहाने खेरदी केली. त्याच्या जुगाराचं सावट मी दिवाळीच्या सणांवर, मुलांच्या आनंदावर पडू दिलं नाही.

‘गॅमेनॉन’चं आणखी एक तत्त्व आहे की सभासदाने स्वत:च्या पायावर उभं राहावं. त्यानुसार कोणी नोकरी करू लागतात किंवा  कॅटरिंगसारखा एखादा व्यवसाय सुरू करतात. मात्र कोणीही आपली स्वकष्टार्जित कमाई नवऱ्याचे कर्ज फेडण्यासाठी वापरत नाही हे विशेष. ‘गॅमेनॉन’मधील तत्त्वांचं कसोशीने पालन करणाऱ्या मैत्रिणींपैकी एक मीरा! तिला लग्नापूर्वी नवऱ्याने आपण क्रिकेटवर बेटिंग करतो हे सहजपणे सांगितलं. पण त्याचं गांभीर्य तेव्हा तिला कळलं नाही. नवरा आडबाजूला जाऊन मोबाइलवर दोन मिनिटं काय बोलतो याचीही दखल तिने घेतली नाही. कारण त्याचा व्यवसाय तेजीत होता. कमाई भरपूर होती. चैनीचं आयुष्य ती जगत होती.  एकदा त्याने तिला सहज म्हणून समुपदेशकाकडे नेलं. तिने विचारलं, ‘‘तुझी आर्थिक स्थिती कशी आहे?’’ मीरा निरागसपणे उत्तरली, ‘‘उत्तम! मला काहीच कमी नाही.’’ तिने कपाळाला हात लावला. ती म्हणाली, ‘‘क्रिकेट बेटिंगमुळे तुझा नवरा कफल्लक झाला आहे. तुमच्यावर भरमसाट कर्ज आहे. तुझं घर बँकेकडे गहाण पडलं आहे!’’ हे ऐकलं मात्र मीरा वेडीपिशी झाली. नवऱ्याचा तिला प्रचंड तिरस्कार वाटला आणि मुलांना ठार करून आपणही आत्महत्या करावी, हा विचार प्रबळ झाला. नेमकी त्याच वेळी तिला ‘गॅमेनॉन’ची माहिती मिळाली. ती सांगते, ‘‘तिथे सुरुवातीला दैवी शक्तींवर विश्वास ठेवण्यास सांगण्यात आलं. माझ्या घरात तर देव धूळ खात  होते. पण मी बैठकांवर विश्वास ठेवला. ती चुकू नये यासाठी आटापिटा केला. अगदी पोटाच्या ऑपरेशननंतर लगेच बारा दिवसांनी मी बैठकीला गेले.’’ मीरा जुन्या घटना आठवत सांगू लागते. ‘‘मात्र सर्वकाही उच्च शक्तीवर सोपवून चालत नाही. ‘गॅमेनॉन’ सदस्य कृतिशील असलाच पाहिजे. जुगाऱ्याशी खूप कठोर आणि  खूप नरम न वागता संयम, शांतता आणि समतोल राखून त्याला वागता यायला हवं. नवऱ्याच्या क्रिकेट बेटिंगमुळे मी मुलाला कधी क्रिकेट खेळू दिलं नाही. त्याची बॅटसुद्धा मोडून टाकली. ‘गॅमेनॉन’मुळे मला माझी चूक कळली. आता पूर्वीचे प्रसंग आठवून मी नवऱ्याला कधीही हिणकस वागणूक देत नाही. जुन्या गोष्टी उकरून टोमणे मारत नाही. तसंच माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी  स्वत:ला दोष देऊन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ ‘गॅमेनॉन’मुळे मी हे समजून घेतलं की मुलांचा या समस्येत हत्यार म्हणून वापर करायचा नाही. तसंच त्यांच्यासमोर वडिलांची प्रतिमा मलिन करायची नाही.’’

मीरा एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करते.  जुगाऱ्याप्रमाणे त्याची पत्नीसुद्धा वैफल्यग्रस्त होऊन अनैतिक मार्गाकडे वळू शकते. पैसे देणारे मित्र अथवा नातलग तिला मोहात पाडू शकतात. पण केवळ ‘गॅमेनॉन’च्या बैठकांमुळे तिचा सारासारविवेक जागृत राहतो. अशा नाजूक क्षणी तिला आधार देतो तो ‘स्पॉन्सर’चा! स्पॉन्सर तिला सावध करतो, पण सल्ला देत नाही. परावलंबी करत नाही. स्पॉन्सर  ‘गॅमेनॉन’ सदस्य, मैत्रीण, समुपदेशक,मानसोपचारतज्ज्ञ कोणीही असू शकतं. मात्र त्याने / तिने ‘गॅमेनॉन’च्या बारा पायऱ्या आणि रूढींचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. ‘स्पॉन्सर’ने बळ आणि आशा प्रदान करणं हे महत्त्वाचं!

‘गॅमेनॉन’च्या बैठका सभासदाला निष्क्रिय आयुष्य न जगता क्रियाशील जीवन जगण्याचा संदेश देतात. ‘हेही दिवस जातील’ हा आशावाद मनात जागवतात. त्यातून आनंद समाधान तर मिळतेच पण अपूर्व अशी मन:शांती मिळते. आपला व्यसनाधीन जुगारी नवरा किंवा मुलासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या या असंख्य स्त्रिया, निराशेवर मात करत, दु:खाला बाजूला सारत प्रयत्नशील राहते, अपयशावर मात करू पाहते, आपल्या आजारी सुहृदाला बरं करण्याचं वाण घेते, त्याचं चांगलं फळ तिला  बहुतांशी मिळतच, मात्र हा प्रवास सोपा नाही. त्या सगळ्या कर्तव्यकठोर, आशावादी आणि समर्पित भावनेने जगणाऱ्या स्त्रियांना आमचा सलाम!

madhuri.m.tamhane@gmail.com

chaturang@expressindia.com

‘गॅमेनॉन’ संस्थेचा पत्ता आणि वेळ

चैतन्य ‘गॅमेनॉन’ ग्रूप

आर. पी. मंगला हायस्कूल

बँक ऑफ महाराष्ट्रसमोर

स्टेशनजवळ, ठाणे (पूर्व) – ४०७६०३.

फोन  – ९८१९४०१३७१, ९९२०५४२२८१, ९८२०२०३७६४

वेळ – शनिवार ७ ते ९

ल्युडस् हायस्कूल

इन्कम टॅक्स ऑफिससमोर,

मुरबाड रोड, कल्याण (पश्चिम)  ४२१३०१.

फोन – ९८३३१५०८७४, ९८२११६०७५३५, ८६५५८७३१९३

वेळ – गुरुवार ७ ते ८.३०