25 September 2020

News Flash

मन-आतल्या मनात :  अपेक्षा – भंग आणि पूर्ती

अपेक्षा आपल्या आपल्याचकडून असतात आणि आपण इतरांकडूनही काही अपेक्षा करतो.

कधी कधी परिस्थिती हा घटक आपल्या अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंगात महत्त्वाचा असतो.

जगताना आपण सारे आपलं जगणं जितकं छान जगता येईल तितकं छान जगत असतो. पण तरीही काही गुंते होतात, काही अडचणी येतात, काही तिढे कसे सोडवावे याचा गोंधळ होतो. या साऱ्यात आपल्या मनातल्या भावनांचा, विचारांचा, वागण्याचा आणि परिस्थितीचाही भाग असतो. त्यांचा ऊहापोह  करणारे, मानसशास्त्रीय उकल करणारे, उपाय सुचविणारे आणि नवा दृष्टिकोन दाखवणारे हे नवीन करकरीत सदर ‘मन – आतल्या मनात’ दर पंधरवडय़ाने. कालच साजरा करण्यात आलेल्या जागतिक आरोग्य दिनी यंदाचं वर्ष नैराश्य याच विषयासाठी जाहीर करण्यात आले  आहे. नैराश्याचा विळखा जगभरातल्या लोकांना बसतो आहे. त्यातून बाहेर  कसं पडता येईल हे सुचवणारं हे सदर म्हणूनच महत्त्वाचं..

‘‘हं! सांग आता तुझ्या अपेक्षा! सुंदर, सुशील, हुशार, द्विपवीधर, उत्तम पगाराची चांगली नोकरी असणारी इतकं तर मीच लिहिलंय. आता पुढे सांग. ए राज, तुला गोरीच बायको हवी आहे का गहुवर्णीय वगैरे चालेल?’’ बोलता बोलता नंदाने आईकडे बघून डोळे मिचकावले आणि सगळेजण हसू लागले.’’ राजचे लग्न जमवायचे होते. त्यासाठी आई, बाबा आणि नंदा ताई राजला घेऊन बसले होते. राजच्या पत्नीबद्दलच्या, त्याच्या आई-बाबांच्या, सुनेबद्दलच्या आणि नंदाताईच्या वहिनीबद्दलच्या अपेक्षा खरोखरच जेव्हा लिहून काढल्या आणि पुन्हा वाचल्या तेव्हा लक्षात आलं – इतकी ‘मेड टू ऑर्डर’ कुठलीच व्यक्ती असणार नाही. मग सगळे कोणत्या अपेक्षा ठेवायच्या आणि कोणत्या सोडायच्या यावर चर्चा कम् वाद  घालू लागले. झालं ते बरंच झालं. राजला बायको लवकर मिळण्याची शक्यता वाढली.

कळत नकळत या अपेक्षा सगळ्यांच्याच मनात असतात. अगदी छोटय़ा बाळाशी डोळे झाकून – कूक – करत लपंडाव खेळताना  डोळे झाकून ठेवून हात काढायला उशीर केला तर बाळ आधीच गमतीच्या अपेक्षेने खिदळू लागते. छोटय़ा मुलीने ठेक्यावर नाच केला की सगळ्यांच्या ‘वा! छान!’ ची अपेक्षा तिच्या डोळ्यात दिसते. पाहुणे घरी आले की घरातल्या मुलांना त्यांच्याकडून खाऊची अपेक्षा असते. शाळेत चांगले मार्क मिळाले, स्पर्धेत बक्षीस मिळाले की मुलांची अपेक्षा असते – पालकांनी भरपूर कौतुक करावे. पुढे वय वाढतं तशा अपेक्षा वाढू लागतात.

‘‘हे बघ. मी बाप म्हणून तुझे सगळे लाड पुरवतो आहे. तू म्हणालास त्या क्लासला महागडा असला तरी घातलं. क्लासला येण्याजाण्यात वेळ जायला नको म्हणून तुला हवी ती बाइक घेऊन दिली. तुला भरपूर पॉकेटमनी दर महिन्याला देतो. शिवाय अधूनमधून रिचार्जसाठी, पेट्रोलसाठी म्हणून तू मागतोस तेव्हा पैसेही देतो. तुला मी हिशेब सांगत नाही. पण प्रेमापोटी  हा सगळा खर्च मी घरखर्चात काटकसर करून करतोय. यामागे माझी आणि आईची तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. भरपूर अभ्यास कर आणि भरपूर मार्क मिळव. तुझं करिअर एकदा चांगलं झालं की आयुष्यभर तुझी काळजी वाटणार नाही. तुझ्या  भल्यासाठीच या अपेक्षा आहेत.’’ चिंतूकाका पोटतिडकीने त्यांच्या मुलाला, अमितला सांगत होते. अमित नेहमीसारखा मख्ख चेहऱ्याने ऐकून घेत होता. तेवढय़ात मित्राची शिट्टी ऐकू आली. ‘‘हो बाबा. मी करतोय ना अभ्यास. मी जरा जाऊन येतो,’’ म्हणत अमित तिथून सटकला. वडिलांच्या अपेक्षांची रेकॉर्ड त्याला ऐकून ऐकून पाठ झाली होती.

अपेक्षा आपल्या आपल्याचकडून असतात आणि आपण इतरांकडूनही काही अपेक्षा करतो. आपण वाढताना, आपलं व्यक्तिमत्त्व फुलत जाताना आपला आत्मविश्वास वाढू लागतो. आपली स्वप्रतिमा सकारात्मक आणि सशक्त होऊ लागते. त्याबरोबर आपल्या स्वत:कडून अनेक बाबतींत अपेक्षा निर्माण होतात. योग्य विचारांची जोड देऊन कृती केली, मनापासून प्रयत्न केले की त्याची चांगली फळेही मिळतात. आपलं कर्तृत्व उंचावलं की आपल्या स्वत:बाबतच्या अपेक्षाही उंचावतात. म्हणून अपयशाची जशी अनेकांना भीती वाटते तशीच यशाचीही भीती वाटते. नेत्रदीपक यश मिळाल्यावर अनेकजणांना धास्ती वाटू लागते, कारण आता पुढच्या काळात या यशापेक्षा जास्त यश त्यांना मिळवावेसे वाटते. किमान हे यश टिकवावे लागते, कारण स्वत:ची आणि इतरांचीही तशी अपेक्षा असते.

‘‘तुम्हाला सरकार भरपूर पगार देतं. तुम्ही वेळेत येऊन तुमची सगळी कामं व्यवस्थित वेळेत पार पाडावीत एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे,’’ असं एखादे वरिष्ठ अधिकारी हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सांगत असतात. ‘‘तू घरी  परत  आलास की झोपण्याआधी आमची एकदा चौकशी करावीस, थोडं जवळ बसून विचारपूस करावीस ही अगदी छोटी अपेक्षा आम्हाला असते. पण तू कित्येक दिवस बोलतसुद्धा नाहीस.’’ एखादे  वृद्ध आईवडील त्यांच्या प्रौढ मुलाशी बोलत असतात.

अपेक्षांचा आणि कर्तव्यपूर्तीचा खूप जवळचा संबंध आहे. कोणत्याही नात्यामधला भूमिकेबाबत ती भूमिका कशा प्रकारे निभवावी, त्या भूमिकेतल्या व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये, त्या भूमिकेतल्या व्यक्तीची काय काय कर्तव्ये आहेत – हे सारे समाजमान्यतेच्या, संस्कृतीच्या निकषावर घासून ठरते.  मग ती भूमिका ‘आदर्श’ भूमिकेप्रत जाते. त्याच निदर्शकावर मग प्रत्येकाच्या भूमिकेचा ‘परफॉर्मन्स’ तपासला जातो. मग त्या विशिष्ट भूमिकेतल्या व्यक्तीची स्वत:बाबत आणि इतरांची त्या व्यक्तीबाबत किती अपेक्षापूर्ती झाली यावर त्या व्यक्तीची प्रगती ठरते. नातेसंबंधांचा कस ठरतो, नातेसंबंधातली सकारात्मकता व विकसनही ठरते.

इथे एक चांगली गोष्ट म्हणजे आपण समजा एखादी भूमिका नीट निभावत नसलो – कर्मचारी म्हणून, व्यावसायिक म्हणून, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून पती / पत्नी म्हणून, आई / बाप म्हणून, शेजारी म्हणून, नागरिक म्हणून  – भूमिका  कुठलीही असो ती जर आपल्याला नीट निभावता येत नसेल तर आपल्यात सुधारणा करून आपली गुणवत्ता वाढवू शकतो. आपला अपेक्षाभंग होऊ नये म्हणून आपल्याला कितीतरी गोष्टी करता येतात.

आधी आपल्या अपेक्षा रास्त, योग्य आहेत का ते पाहायला हवे. अवास्तव अपेक्षा अपेक्षाभंग तर करतातच पण जीवनात गुंतेही निर्माण करतात. एकदा एका अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलीचं लग्न तिच्या पसंतीने भारतात वाढलेल्या, पण नोकरीनिमित्त तिथे गेलेल्या मुलाशी ठरले. लग्न भारतात झाले आणि दोनच दिवसांनी मुलीचे आई-वडील सासू-सासरे-नवरा असे सगळे मुलीला घेऊन ‘मनोबल’मध्ये आले. ती मुलगी लग्नच नाकारत होती. कारण तिच्या मते अग्नीभोवती सात फेरे आणि ‘मांग मे सिंदूर’ असे काही प्रकार झालेच नव्हते. मुलाच्या जातीतल्या रिवाजानुसार  एकमेकांच्या गळ्यात सर्वासमोर  हार घालून एकमेकांना ‘वरले’ होते.  पण मुलीच्या स्वत:च्या ‘इंडियन मॅरेज’बद्दलच्या सगळ्या अपेक्षा हिंदी सिनेमातली लग्नाची दृश्यं पाहून बनलेल्या होत्या याची कल्पना कुणालाच नव्हती.  ‘असंच’ लग्न करायचं होतं तर ते भारतात येऊन कशाला – आपण अमेरिकेत केलं असतं असं मुलीचं म्हणणं होतं. शेवटी घरच्या घरी तिच्या मनासारखे विधी पुन्हा केले गेले तेव्हा हा तिढा सुटला! या सगळ्यादरम्यान सगळ्यांची काय मानसिक अवस्था झाली असेल त्याचा नुसता विचारच केलेला बरा.

म्हणून यथार्थ आणि वास्तवपूर्ण अपेक्षा हव्यात. त्या पूर्ण होण्याची शक्यता भरपूर असते. अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन तसे प्रयत्न, श्रम आणि कृती करणे महत्त्वाचे आहे. मेहनत न करता आपल्या अपेक्षा आपोआप पूर्ण होत नाहीत. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या अपेक्षा थोडय़ा उंचावलेल्या असल्या तर आपण आपल्या क्षमता वाढवून, जास्त मेहनत करून, योग्य दिशेने योग्य कृती करून त्यांची पूर्ती करू शकतो. यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास होतो. आपण आपला आळस, बेपर्वा वृत्ती, विलंब करण्याची सवय, सगळीकडे शॉर्टकट मारण्याची सवय अशासारख्या दुर्गुणांना घालवूनही सुधारू शकतो.

आपल्या अपेक्षांची पूर्ती फक्त आपल्याच प्रयत्नांवर, मेहनतीवर अवलंबून असली तर आपण भरपूर प्रयत्न करू शकतो. पण अनेकदा  अपेक्षापूर्तीसाठी आपण इतर व्यक्तींच्या प्रयत्नांवर, कृतींवर, मदतीवर अवलंबून असतो. अशा वेळी त्या व्यक्ती किती मनापासून प्रयत्न करतात त्यावर आपलं यश अवलंबून असतं. आपले इतरांशी असणारे चांगले, सौहाद्र्र आणि आपुलकीचे नातेसंबंध यामध्ये आपल्याला मदत करू शकतात.

कधी कधी परिस्थिती हा घटक आपल्या अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंगात महत्त्वाचा असतो. परिस्थिती आणच कठीण करून ठेवली असली तर आपण तक्रार करू शकत नाही. पण काही वेळा बाह्यघटक, ज्यांच्यावर आपले काहीच नियंत्रण नसते, असे घटक परिस्थिती बिकट करतात. तेव्हा त्या वेळच्या अशा परिस्थितीचा स्वीकार करून, जुळवून घेत दुसरा काही अपेक्षापूर्तीसाठी मार्ग शोधणे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणे योग्य ठरते. परस्पर नातेसंबंधातल्या अपेक्षाभंगाचे एक मोठे कारण म्हणजे अहंकार. या अहंकारापोटी ईर्षां, मत्सर, असूया, सूडभावना, क्षुद्र लेखणे अशासारख्या वाईट नकारात्मक भावना मनात घर करतात. मग एखाद्याने ठेवलेल्या साध्या सरळ अपेक्षाही आपल्याला जाचक वाटू लागतात.

मन निर्मळ असलं की आपण आपल्या जगण्यातली प्रत्येक भूमिका समरसून जगू लागतो. प्रत्येक काम, कृती, प्रयत्न मन:पूर्वक करू लागतो.  मग आपल्या आपल्याकडून आणि इतरांबाबतही अपेक्षा भलत्या नसतात. वास्तवाला धरून माफकच असतात. योग्य तशा असतात. मग अर्थातच अपेक्षापूर्तीचं प्रमाण वाढतं. जगणं सोपं आणि छान होतं.

एकदा एका निवृत्त आजोबांच्या कट्टय़ाजवळ बसले होते. त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. एकजण सांगत होते, ‘‘सकाळी मला उठल्याबरोबर गरम वाफाळलेला आल्याचा चहा बायकोने किंवा सुनेने द्यावा ही अपेक्षा मी करतच नाही. सगळ्यांच्या आधी मी उठतो. म्हणून मी माझ्या मनासारखा चहा करतोच, पण इतरांचाही चहा करतो. मला त्यात काही गैर वाटत नाही. भलती अपेक्षा करत नाही म्हणून अपेक्षाभंगांचं दु:खही नाही!’’

खरं आहे. मात्र अपेक्षाच ठेवायच्या नाहीत. एवढी आध्यात्मिक प्रगती आपणा सामान्यांची नसते.  जगण्याला गती द्यायला पुढच्या जगण्याचे वेध लागायला योग्य आणि वास्तवदर्शी अपेक्षा अवश्य बाळगूया! अपेक्षाभंगाचं दु:ख नको, पण अपेक्षापूर्तीचा आनंद आपल्याला हवा ना!!

(तुमच्या जिव्हाळ्याचे, दैनंदिन जगण्याशी निगडित असणारे विषय तुम्ही मेल करून सुचवू शकता.)

अंजली पेंडसे anjupen60@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2017 1:31 am

Web Title: right ways to overcome depression and sadness
Next Stories
1 सोळा वर्षांचा अवघड, अस्वस्थ, पण कृतार्थ प्रवास
2 पुरुषभानाच्या वाटेने, माणूसपणाच्या दिशेकडे
3 बँक परिघाच्या आत-बाहेर
Just Now!
X