चाळीस वर्ष होतील या घटनेला. २५ जून १९७८ रोजी इंग्लंडमध्ये एका स्त्री अर्भकाचा जन्म झाला, ज्याची नोंद संपूर्ण जगानं घेतली. एक चमत्कार म्हणून याकडे पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर चंद्रावर मानवी पाऊल पडण्याइतकाच हा क्रांतिकारी शोध, असं म्हटलं गेलं. असं काय विशेष घडलं होतं? वैद्यकशास्त्राच्या वंध्यत्व चिकित्सेच्या क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला होता. लुईस ब्राउन नावाची ही बालिका जगातली पहिली ‘टेस्ट टय़ूब बेबी’ होती.

मानवी शरीराबाहेर स्त्रीबीजाचं फलन, अर्थात आय.व्ही एफ. तंत्रज्ञानाचा उदय झाला होता. ज्या स्त्रियांच्या गर्भनलिका क्षय, जंतुसंसर्ग किंवा अन्य कारणांनी बंद आहेत त्यांना प्रथमच माता होण्याची संधी या उपचारांनी मिळाली होती. लुईसची आई लेस्ली ब्राउन हिनं असा उपचार मिळेपर्यंत नऊ वर्षांची प्रतीक्षा केली होती. नंतरच्या काळात जगात लक्षावधी बालकांचा जन्म या पद्धतीनं झाला आहे, प्रत्यही होत आहे. सुरुवातीला या पद्धतीत केवळ १५ ते २० टक्के यश मिळत होतं, आता या उपचार पद्धतीत नवनव्या सुधारणा होत होत यशस्वी उपचारांचा टक्का ४० ते ४५ पर्यंत पोचला आहे.

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वंध्यत्व चिकित्सेमध्ये आता एव्हढी नेत्रदीपक प्रगती झालीय की स्त्रीबीजांची संख्या वाढण्यासाठी औषधं दिली जातात, गर्भाशयाचं आतलं अस्तर गर्भवाढीसाठी अनुकूल व्हावं म्हणून संप्रेरकं (हॉर्मोन्स) देऊन गर्भधारणेची उत्तम तयारी केली जाते. वीर्यामधील शुक्रजंतूंची संख्या कमी असेल किंवा ते नि:शक्त असतील तर इष्ट परिणाम साधण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. एका पद्धतीत विशिष्ट रसायन मिसळून सेंट्रीफ्यूज पद्धतीने त्या मिश्रणातील खालचा जड भाग (ज्यात निरोगी सशक्त शुक्रजंतू असतात) इंजेक्शनसाठी वापरला जातो. दुसऱ्या पद्धतीत जे शुक्रजंतू चपळ हालचाली करून वरच्या दिशेने पोहत निघाले आहेत त्यांचाच वापर फलधारणेसाठी केला जातो. यापुढची प्रगती म्हणजे इक्सी ऊर्फ इंट्रा सायटो प्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. स्त्रीबीजावरील संरक्षक आवरण भेदून शुक्राणूला थेट बीजांडामध्ये पोचवता येऊ लागलंय. विशिष्ट तापमान राखलेल्या पेटीत (इन्क्यूबेटर) जेव्हा फलित स्त्रीबीजं ठेवली जातात, त्यानंतर त्यांची अपेक्षित प्रगती म्हणजे एका बीजामधून आठ पेशींचा ‘ब्लास्टोसिस्ट’ (आपण याला भ्रूण म्हणू या) तयार व्हायला पाहिजे. आता ही स्थिती नेमकी कधी येते हे एका खास कॅमेऱ्यातून फोटो काढून बाहेरूनच कळायला लागलंय आणि त्याच सुयोग्य वेळेला हा भ्रूण गर्भाशयात पुन्हा रोपित करता येऊ लागला आहे.  वैज्ञानिक प्रगती दिवसेंदिवस अशी होतेच आहे.

महर्षी व्यासांनी गांधारीचा एकच गर्भ विभाजित करून १०१ घडय़ात ‘इन्क्यूबेट’ करत ठेवला आणि त्यातून १०१ कौरव जन्मले ही महाभारतातील कथा एक मिथक म्हणून सोडून देऊ (घट हा गर्भाशयाचं प्रतीक आहे.) पण मिथ्यकथा जेव्हा वास्तव म्हणून पुढे येऊ लागतात तेव्हा भले भलेसुद्धा चक्रावून जातात. हे चाललंय काय असं वाटायला लागतं. आज आपण एका अशा परिस्थितीकडे बघत आहोत की कोणा एकाचे शुक्राणू, कोणा एकीचं स्त्रीबीज, यांचं मीलन प्रयोगशाळेमध्ये आणि पुढची वाढ तिसऱ्याच स्त्रीच्या गर्भाशयात (अशा स्त्रीला ‘सरोगेट मदर’ म्हणतात.) गेल्या पाच एक वर्षांत शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, तुषार कपूर इत्यादी सेलेब्रिटीजना आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि सरोगसीचा वापर करून अपत्यलाभ झाला आहे हे आपण जाणतोच.

कर्करोगग्रस्त जर तरुण असतील, त्यांना अद्यापि मुलं झाली नसतील तर त्यावरची जालिम औषधं सुरू करण्यापूर्वी रुग्णाचं वीर्य किंवा स्त्रीबीज काढून अतिशीत तापमानाला गोठवून ठेवतात. याचं कारण केमोथेरपीनंतर प्रजनन ग्रंथींमध्ये विघातक बदल होऊन सदोष शुक्राणू किंवा स्त्रीबीज तयार होण्याची किंवा मुळीचच निर्माण न होण्याची शक्यता असते. ही पद्धत आता कर्करोग उपचारांचा एक नित्य भाग बनून गेलीय. पण तसं होण्यापूर्वी, म्हणजे सुमारे दहा वर्षांपूर्वी एक तरुण नवविवाहित रुग्ण स्तनाच्या कर्करोगानं आजारी झाली. ही मुलगी इंग्लंडमध्ये राहात असे. तिथून शस्त्रक्रियेसाठी पुण्याला आली होती, मला स्पष्ट आठवतंय की शस्त्रक्रियेनंतर तीन-चार दिवसांनीच तिनं तिची स्त्रीबीजं दुर्बणिीतून काढून घेऊन गोठवण्याची प्रक्रिया कुठे होऊ शकेल याची माझ्याकडे विचारणा केली तेव्हा मी चकित झाले होते. अर्थात तिच्या केमोथेरपीनंतर पुढे त्या बीजांचा यथायोग्य वापर तिनं केला असेलच. त्यानंतर माझ्या वाचनात आलं लान्स आर्मस्ट्राँग या विख्यात सायकलपटूचं चरित्र. त्याला जननेंद्रियाचा कर्करोग झाला. तेव्हाही डॉक्टरांनी ‘केमो’ उपचार करण्याआधी त्याचं वीर्य अशाच पद्धतीनं गोठवलं होतं. सर्व उपचार संपल्यावर त्याच्या मत्रिणीला त्या वीर्याचा वापर करून एक नव्हे तर तीन मुलांचा लाभ झाला.

मध्यंतरी पुण्यात एक नवल घडलं. आजवर आपण मूत्रिपड, यकृत, हृदय रोपणाच्या शस्त्रक्रियांबद्दल ऐकलं आहे. इथे गर्भाशयाच्या जन्मजात दोषामुळे वंध्यत्व पदरी आलेल्या तरुणीच्या शरीरात तिच्या आईचं गर्भाशय रोपित करण्यात आलं. यानंतर आयव्हीएफ पद्धतीनं शरीराबाहेर तयार झालेला भ्रूण या तरुणीच्या नवीन गर्भाशयात स्थापित करण्यात आला. आणि आता तो गर्भ आईनं मुलीला दिलेल्या गर्भाशयात सुखरूप वाढतो आहे. अशाच प्रकारचा दोष असलेल्या आणखी दोन केसेसमध्ये या शस्त्रक्रिया त्यानंतर झाल्या आहेत. याआधी  स्वीडन देशामध्ये गर्भाशय रोपण केलं गेलं आहे.

या सगळ्या गोष्टी आठवायचं कारण म्हणजे १५ फेब्रुवारीला विविध वृत्तपत्रांत एकाच वेळी प्रसिद्ध झालेली बातमी. यात झालं असं – ४९ वर्षांची एक आई आपल्या २७ वर्षीय अविवाहित मुलाला मेंदूचा कर्करोग झाल्यानं गमावून बसते. आजच्या पद्धतीप्रमाणे मुलाचं वीर्य परदेशातल्या एका वीर्यपेढीत साठवलेलं असतं. कारण निदान झालं तेव्हा तो त्या देशात होता. मुलाच्या मृत्यूनंतर आई दु:ख करत बसत नाही तर ती त्याचं मरणच नाकारते. आणि विज्ञानानं दिलेल्या संधीचा फायदा घेऊन त्याच्या संततीला जन्म द्यायचं ठरवते. यासाठी तिचा पती, तिची मुलगी व इतर कुटुंबीय साथ देतात. परदेशातील वीर्यपेढीकडून खूप अवघड प्रक्रियेतून जाऊन ते वीर्य भारतात आणलं जातं. यासाठी ‘कोल्डचेन’  म्हणजे अतिशीत तापमान कायम राखून ठेवलं जाईल अशी काळजी घ्यावी लागते. नंतर त्याच्याशी जुळणाऱ्या अज्ञात स्त्रीबीजांशी फलन केलं जातं. त्यातून तयार झालेले दोन भ्रूण वास्तविक आपल्याच गर्भाशयात वाढवावे, अशी त्या मातेची इच्छा होती. पण तिची रजोनिवृत्ती झाली असल्यानं तिचं गर्भाशय गर्भाची वाढ होण्यासाठी सक्षम नव्हतं. तरी ती हिम्मत हारली नाही. तिनं ‘सरोगेट’चा शोध चालू केला. सुदैवानं तिच्या नात्यातलीच एक ३८ वर्षीय तरुणी ‘सरोगेट मदर’ बनायला राजी झाली. आवश्यक वैद्यकीय सक्षमता चाचण्यांची पूर्तता करून त्या तरुणीच्या गर्भाशयात दोन भ्रूण आरोपित केले गेले आणि आत्ता याच महिन्यात एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या भावंडांचा जन्म झाला.

प्रसारमाध्यमांनी ही बातमी अर्थात उचलून धरली. सर्वत्र संबंधित व्यक्तींचे आनंदी आणि विजयी मुद्रेचे फोटो छापून आले. ४९ वर्षांची नूतन आजी म्हणाली की, ‘‘माझा मुलगाच मला परत मिळाला आहे आणि बरोबर एक मुलगीसुद्धा. या मुलाचं संगोपन मी करीनच पण जेव्हा मी थकेन तेव्हा माझी मुलगी हे काम करेल असं तिनं मला आश्वासन दिलं आहे.’’ या बातमीत तिनं ‘मला नातू आणि नात मिळाली आहे’ असं म्हटलं नाही हीसुद्धा एक उल्लेखनीय बाब.

या बातमीनंतर समाजात उलट सुलट चर्चा सुरू होणार हे गृहीत धरायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं वीर्य गोठवता येतं आणि पुन्हा सुयोग्य तापमानाला आणून बीजफलनासाठी वापरता येतं, हे तंत्रज्ञान वापरून मुलं झाली यात काही नवीन गोष्ट नाहीये. सरोगेट गर्भाशयाचा वापर यातही काही नावीन्य नाही. मग इथे वेगळं काय झालं? तर वापरलेलं वीर्य हे आता मृत झालेल्या व्यक्तीचं होतं. ‘आपल्या मृत्यूनंतर याचा वापर व्हावा’ या इच्छेनं त्यानं ते दिलं का? हा मुलगा अविवाहित होता. ‘कधीतरी आपण या आजारातून बरे होऊ, त्यानंतर विवाह आणि मग वीर्याचा वापर करून मूल’ असा प्रवास त्याच्या मनात उमटला असणार. या ठिकाणी असं घडलं नाही. मृत मुलाचं वीर्य वापरून बाळ जन्माला घालावं, असं भावी अपत्याच्या आजी-आजोबांनी ठरवलं. माता-पिता होण्याची इच्छा  एक हक्क मानला गेलाय. पण आजी-आजोबा होण्याचा ‘हक्क’? या घटनेतील आजी-आजोबांची वयं आता ४९-५० आहेत. ही मुलं मोठी होताना त्यांना आई-वडील मिळणार नाहीत तर वृद्धत्वाकडे झुकू लागलेले आजी-आजोबा मिळतील. पशानं, ताकदीनं, उत्साहानं, नवविचारानं ते तरुण आई-बापांपेक्षा कमी पडणार नाहीत का? मुलांची आजारपणं, शिक्षणं, प्रवेशप्रक्रिया.. कुठवर आजी-आजोबा पुरे पडणार? या मुलांच्या मानसिकतेचं काय? त्यांना आई-वडील असण्याचा ‘हक्क’ नाही का? मोठी होत असताना इतर चारचौघांप्रमाणे आपल्याला तरुण आई-वडील नाहीत, इतकंच काय आपला जन्मही आपल्या ‘जन्मदात्यांनी’ पाहिलेला नाही हे सत्य पचवणं त्यांच्यासाठी किती अवघड असेल याचं उत्तर मानसतज्ज्ञांनाच विचारायला हवं. त्यांनाही नीट उत्तर देणं कठीण आहे. कारण अशा केसेसच आजवर झाल्या नाहीत.

आयसीएमआर -‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ ही आपली शासकीय मध्यवर्ती वैद्यक संशोधन संस्था आयव्हीएफ उपचार पद्धतीची नियामक आहे. ‘ज्या जोडप्याला वंध्यत्वाची समस्या आहे, त्यांना मदत करण्यासाठी ही उपचारप्रणाली आहे’ असं आयसीएमआरचं मूलभूत तत्त्व आहे. मात्र तंत्रज्ञान इतक्या वेगानं विकसित होतंय की वंध्यत्व या प्रश्नाच्या नवनव्या बाजू उपस्थित होत आहेत. या क्षेत्रात खास प्रशिक्षण घेतलेले कुशल आणि बुद्धिमान डॉक्टर्स इच्छुकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून अपत्यप्राप्ती करून देत आहेत. या सगळ्या प्रकारात कायद्याचं उल्लंघन होतंय का? तसं म्हणता येणार नाही. कारण कायदा या बाबतीत सुस्पष्टपणे मांडला गेलाच नाही. याला ‘प्रीसिडेंट’ आहे का? म्हणजे यापूर्वी देशात अशा केसेस झाल्या आहेत का? परदेशात झाल्या असतील. परंतु असे उपचार आपल्या देशात अगदी अभिनव आणि नव्या दालनात पहिलं पाऊल टाकणारे असतील तर त्यावर योग्य-अयोग्य निर्णय तरी काय घेणार?

थोडक्यात काय, वंध्यत्व चिकित्सेतील अशा नव्या घटनांविषयी वैद्यकक्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांबरोबरच कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानसतज्ज्ञ , तत्त्वज्ञ, विचारवंत इत्यादी सर्वानी एकत्र येऊन विचारमंथन केलं  पाहिजे. चर्चा केल्या पाहिजेत. हे मंथन चालू असताना ‘मागणी तसा पुरवठा’ न्यायानं अशा केसेस घडतच राहणार. प्रथम महानगरात, आधुनिक सुविधा असलेल्या  केंद्रांमध्ये, मागाहून निमशहरी भागात आणि नंतर ग्रामीण भागापर्यंत झिरपत जाणाऱ्या या घटना आहेत. अशा घटनांतून नवीन नवीन वैद्यकीय, कायद्याच्या किंवा सामाजिक समस्या उभ्या राहणंही शक्य आहे. त्यांची उत्तरं शोधतानाच त्या अनुभवांवर आधारित मार्गदर्शक तत्त्वंही आयसीएमआरसारखी संस्था अमलात आणेल यात शंका नाही. किंबहुना विज्ञानानं टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक हे घडलेलंच आहे. मग तो अवयव रोपणाचा प्रश्न असो, आयसीयूमधल्या लाइफ सपोर्ट सिस्टीमचा असो किंवा अंतराळात झेप घेण्याचा. (लुइस ब्राऊनच्या आई-वडिलांनाही टीकेला तोंड द्यावं लागलंच होतं.) परंतु आजवर अशा टीकेला घाबरत बसलो असतो तर प्रगतीचा मार्ग खुंटलाच असता. दरम्यान, या नवजात बालकांच्या आजी-आजोबांच्या जिद्दीला दाद देऊ या आणि शुभेच्छाही व्यक्त करू या की या बाळांचं संगोपन ते खूप आनंदानं आणि समर्थपणे करतील.

– डॉ. लिली जोशी

drlilyjoshi@gmail.com