नामजोशी पती-पत्नी वयाने वृद्धत्वाकडे झुकले होते. पण आता वाढलेली आयुर्मर्यादा लक्षात घेतली तर ते इतकेही म्हातारे नव्हते. पाठ झुकलेली, मान झुकलेली, खांदे पडलेले, संपूर्ण शरीर निरुत्साही आणि डोळ्यांमध्ये पाणी. अर्थात् झालंही तसंच होतं. त्यांच्या एकुलत्या एका मुलाने- साहिलने आत्महत्या केली होती. ‘‘तुमच्याकडे साहिल नववीत असताना घेऊन आलो होतो. तेव्हा तो अजिबात अभ्यास करत नव्हता. सारखा शाळा बुडवून बाहेर भटकायचा. बाहेर खायचा. त्याने हिच्या पर्समधून पैसे चोरले होते म्हणून तुमच्याकडे आणला होता.’’ वसंतराव नामजोशी म्हणाले.

मी म्हटलं, ‘‘हो आठवतंय मला. त्याला आता बरीच वर्षे झाली. मला वाटतं, नंतर साहिल सुधारला आणि त्याला दहावीत चांगले मार्क मिळाले होते. आईबरोबर पेढे देऊन गेल्याचं स्मरतंय. नंतर काय केलं त्यानं?’’ सरोज नामजोशींनी, साहिलच्या आईने डोळे पुसत म्हटलं, ‘‘नाही तो तसा वांडच होता लहानपणी. पण हुशार होता. दहावीनंतर बारावीलाही त्याला चांगले मार्क मिळाले होते. इंजिनीअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली. पण जात्याच त्याला अभ्यासाचा कंटाळा होता. इतर गोष्टींचाच मोह होता. त्यामुळे त्याने मित्रांचा ग्रुपही तसाच उनाड मुलांचा जमवला. सहा वर्षांनी एकदाचा पास झाला. इंजिनीअर झाला.’’ मी म्हटलं, ‘‘ठीक आहे. उशिरा का होईना, इंजिनीअर झाला हे बरं झालं. मग कुठे नोकरी लागली त्याला?’’ वसंतराव म्हणाले, ‘‘नाही ना! मी त्याला आता नोकरी बघ म्हटले याचाच त्याला राग आला. मीही माणूसच आहे. मला काही वडिलोपार्जित इस्टेट मिळाली नव्हती. आधीच जास्तीच्या वर्षांच्या फीचा खर्च होता. म्हणून म्हटलं त्याला की मी किती दिवस पोसायचं तुला? आता लवकर नोकरी मिळव.’ हे असं सांगितलं तेच माझं चुकलं! ‘‘सरोजताई त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या, ‘‘अहो, तुमचं काहीसुद्धा चुकलं नाही. कुणाही वडिलांनी असंच म्हटलं असतं. तोच आळशी होता. म्हणून त्याने तुमचं म्हणणं वाईट प्रकारे घेतलं. नाही म्हणजे, त्याने जो काही धिंगाणा घातला- आरडाओरडा, वस्तूंची फेकाफेक आणि मग चप्पल घालून बाहेर जाणं. अगदी आमचा जीव वाट बघून बघून टांगणीला लागला तेव्हा घरी परत आला.’’

‘‘मग नंतर कुठे अर्ज केला होता? इंटरव्ह्य़ूला गेला होता? नोकरी कुठे मिळाली?’’ मी विचारलं. वसंतराव म्हणाले, ‘‘आईने समजूत घालून राजी केला. मग दोन चार ठिकाणी अर्ज केला. पण एक तर त्याची गुणवत्ता बघून इंटरव्ह्य़ूला बोलवणं यायचं नाही. दोन-तीन ठिकाणी बोलावलं, पण आल्यावर यानेच त्यांना नावं ठेवली. एकूणच त्याचा  रागरंग पाहून मीच माझ्या ओळखीच्या एका कारखानदाराकडे नोकरीला लावलं. जेमतेम एक महिना नोकरी केली असेल. तीसुद्धा जणू आमच्यावर उपकार म्हणूनच! एक दिवस रागाने घरी आला आणि गेलाच नाही परत. विचारलं तर म्हणाला, ‘‘माझा अपमान करतात.’’ मी जाऊन मालकांना भेटलो. ओळखीचे म्हणून आणि तसे साहिलला नोकरी देऊन त्यांचे उपकारच होते म्हणूनही. ते म्हणाले, ‘‘फार बेशिस्त आहे. टीमवर्क मुळीच करत नाही. सहकाऱ्यांच्या सारख्या तक्रारी येतात.’’ शेवटी मी त्यांची माफी मागितली, आभार मानले आणि घरी आलो. तेव्हापासून साहिलने नोकरीसाठी प्रयत्नही केला नाही. नुसता इकडे तिकडे हिंडायचा. घरी येऊन झोपायचा. वय वाढलं तसे त्याचे मित्र त्यांच्या त्यांच्या व्यवसायात, लग्न होऊन त्यांच्या संसारात गुरफटले. याच्यासारखा रिकामा वेळ कुणाकडे असणार? पुन्हा त्यांनी काही कार्यक्रम ठरवला तर ते सगळे सहकुटुंब येणार. त्यांच्या गप्पा वेगळ्या. त्यात साहिलला काय रस असणारे, मग तो जाईनासा झाला. हळूहळू एकटा पडायला लागला. अहो आपण थांबलं म्हणून जग आपल्यासोबत थांबत नाही. पुढेच जातं. मी त्याला सारखं सांगायचो, सुचवायचो, छोटासा एखादा व्यवसाय कर- मी भांडवल देतो म्हणायचो. पण तो ऐकतच नव्हता.’’

‘‘मग माझ्याकडे किंवा दुसऱ्या कुणाकडे मदतीसाठी नेलं का नाहीत?’’ मी विचारलं. सरोजताई उसासा टाकत म्हणाल्या, ‘‘अहो कुणाचंच ऐकत नव्हता. येणार नाही म्हणाला. मी तुमचा एकच मुलगा आहे आणि मी तुम्हाला काय जड झालोय का असं विचारायचा. माझा आणि यांचा सारखा राग राग करायचा. जणू आम्ही त्याचे शत्रूच होतो. त्याच्याशी काही बोलायची, त्याला काही सांगायची भीती वाटू लागली. नातेवाईकांकडे ज ाणं नकोसं झालं. कारण कुणी भेटलं की विचारणार, ‘‘साहिल काय करतो आता?’’ आधी त्याला आपण काही करत नाही याची थोडी लाज वाटायची. निराश व्हायचा. पण हळूहळू त्याच्या या अवस्थेला तो आम्हा दोघांनाच जबाबदार धरू लागला. तरुण मुलगा दिवसभर काही न करता घरात बसलेला बघवत नाही हो! मी त्याला म्हणायचे, अरे व्यायाम कर, बाहेर चालून ये, घरातली थोडी कामं कर, पण त्याचा त्याला फार राग यायचा. निवृत्तीनंतर यांनी एका ठिकाणी पार्ट टाईम नोकरी धरली. पण त्याला स्वत: काही नोकरीसाठी प्रयत्न करावे असं वाटलं नाही.’’

‘‘मग एवढं असं काय झालं की एकदम त्यानं असं टोकाचं पाऊल उचललं?’’ मी विचारलं. वसतंराव म्हणाले, ‘‘सगळ्या मित्रांनी गेट टुगेदर ठरवलं होतं. हा जाणार नाही म्हणाला, पण दोघा मित्रांनी घरी येऊन त्याला नेलं. तिथून आल्यावर एकदम गप्प गप्प होता. दोन दिवस काही बोललाच नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी ही देवपूजा करत होती. मी अंगण झाडत होतो. घरात आलो आणि हातपाय धुवून त्याच्या खोलीत गेलो तर साहिल पंख्याला – माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आमच्यासाठी चिठ्ठी ठेवून गेला- ‘मला क्षमा करा. मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही. माझे सगळे बरोबरीचे मित्र उत्तम प्रगती करून जगताहेत. फक्त मी असा आरटी- रिकामटेकडा. या असल्या जगण्याचा, तुम्हाला, आणि जगाला काहीच उपयोग नाही. म्हणून थांबतो.’ वसंतराव-सरोजताई रडू लागले.

अरेरे. साहिलसारख्या मुलानं का असं करावं? जगण्याचा अर्थ याला का बरं समजला नाही? खरं तर आपण जगण्याला गृहीतच धरतो. काहीही नाही केलं तरी जिवंत आहोत तोवर वय वाढणार असतं. पण या जगात चांगलं आणि मनासारखं जगणं कुणी भेट म्हणून देत नाही! ते आपणच स्वत:ला घडवत मिळवावं लागतं. आपल्या स्वत:बद्दलच्या आणि जगाबद्दलच्या कल्पना आपण पुन्हा पुन्हा तपासाव्यात की त्या ‘यथार्थ’ वास्तवपूर्ण आहेत का नाहीत? फुकट काही मिळण्याची आस धरूच नये. अहो जगायचं तरी श्वास घ्यावा लागतो. पाण्यात पडलो आणि पोहायला येत नसेल तरी हातपाय हलवावेच लागतात. इथे या जगात आपण काही शिकण्यासाठी, काम करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आलो आहोत. सगळ्या प्राणिजगतात माणूस बुद्धिमान, दोन हातपाय असलेला-भावभावना असलेला. प्रगती करण्यासाठीची तयारी शरीर मनात जन्मत:च ठेवलेली असते. आपण फक्त सर्व शक्ती इतरांच्या मदतीने प्रयत्नपूर्वक विकसित करत न्यायच्या. शिक्षणाने मनाची, बुद्धीची प्रगल्भता वाढवायची आणि चांगल्या वर्तनाने सकारात्मक नातेसंबंध जोपासायचे. जमेल तसे श्रम करून, काम करून योग्य मार्गाने जगण्यासाठी आवश्यक पैसे आणि साधन उपलब्धी मिळवायची. आपण कष्टाने, मेहनतीने योग्य दिशेने केलेले प्रयत्न आपल्या ‘असण्याचे’  सार्थक करतात. जगण्यासाठी प्रेरित करतात. विशिष्ट ध्येय ठरवून उद्दिष्ट समोर ठेवून प्रयत्न करत गेलो तर हळूहळू आपल्या जगण्याला अर्थ मिळतो. आपल्या असण्याला प्रतिष्ठा आणि आदर मिळतो. आपल्या अस्तित्वाचे सार्थक होते.

पण हे सारं प्रयत्नांनीच कृतीने, वर्तनाने मिळवावे लागते. फुकट, शॉर्टकट्ने मिळत नाही. आपण नकारात्मक विचार केले, प्रयत्न कमी केले किंवा थोडय़ा अपयशाने सोडून दिले की नैराश्य येतं. राग येतो. आरोप-प्रत्यारोप चालू होतो. आपण कुठे कमी पडलो ते शोधून त्यात सुधारणा करण्याऐवजी आपण आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडू लागतो. आपलं जगणं खरोखर वाया घालवतो आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना दु:ख देतो. लहानपणी चालायला शिकताना आपण सारेच कितीदा पडलो असू, लागलं असेल, रडलोही असू. पण आपण चालण्याचा प्रयत्न सोडून न देता सुरूच ठेवला आणि प्रयत्नांने आपण चालूच काय पण धावूही लागतो! हीच प्रक्रिया आपण आपल्या जगण्यालाही लावायला हवी. मनासारखं जगायला मिळावं म्हणून पुढच्या जन्मात नाही- याच जन्मात प्रयत्न करायचा आणि हो अशा प्रयत्नाची सुरुवात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही क्षणी करता येते! अगदी या क्षणापासून..!!!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in