07 July 2020

News Flash

मानसिक हिंसा

अगं, अगं जरा नीट ठेव. वेंधळी कुठली! एक काम धड जमत नाही.

‘‘अगं, अगं जरा नीट ठेव. वेंधळी कुठली! एक काम धड जमत नाही. एवढय़ा मोठय़ा बारा वर्षांच्या मुलीला सारखं सारखं सांगायची मला लाज वाटते. पण तुला त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करायला जराही काही वाटत नाही. त्या मिनूकडे बघ. तुझ्याहून दोन वर्षांनीच लहान आहे. पण सगळं कसं पटापट करते. काय तुझं होणार, देवास ठाऊक!’’ रंजना तिच्या मोठय़ा मुलीवर – नेहावर ओरडत होती. नेहाकडून फार मोठी चूक झाली नव्हती. डावीकडे ठेवायची वस्तू उजवीकडे कपाटात ठेवली गेली होती. रंजनानंतर मिनूचा जन्म झाला आणि पाठोपाठच्या दोघींचं करताना ती दमू लागली. त्यात मिनू गोरीगोमटी आणि एकदम चटपटीत होती. तिच्या मानाने नेहा तिच्या बाबांसारखी सावळी आणि अबोल होती. नेहाला वाचनाची आवड होती. मिनू खेळण्यात रमायची.  गुण कमी मिळायचे. पण आईसारखी दिसायला छान आणि वागायला चतुर होती.  दोघी मुलींशी वागण्यात मुद्दाम नाही पण नकळत रंजना भेदभाव करत होती. हळूहळू नेहाचा आत्मविश्वास कमी होऊन ती आणखी कोशात गेली तर नवल नव्हतं.

दिनेश अभ्यास करत होता. या वेळी काहीही करून त्याला उत्तीर्ण होणं महत्त्वाचं होतं. नापास झालो तर जीव देणं किंवा घर सोडून पळून जाणं हेच पर्याय आहेत, असं त्याला मनापासून वाटत होतं. बाबांनीच त्याला हे किती तरी वेळा सांगितलं होतं. तेही लोकांसमोर आणि वाईट शब्दांत! घरी आलेल्या त्याच्या मित्रांचा ते अपमान करत म्हणून दिनेश कुणा मित्राला घरी बोलवत नव्हता. पण नातेवाईक आणि आई-बाबांच्या ओळखीचे घरी यायचे. त्या वेळेस त्यांच्या समोर बाबा मुद्दाम त्याचं नापास होणं सांगायचे. त्यांच्या वेळेस ते कसे हुशार होते, मेहनती होते ते सांगायचे. दिनेश आळशी आहे, बापाच्या जिवावर जगतो, असा मुलगा म्हणजे घराण्याला कलंक वगैरे.. बाबा घरी आलेल्यांना हे मुद्दाम सांगायचे. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर खंत, खेद नसून दिनेशचा पार कचरा केल्याचा राक्षसी आनंद दिसायचा. या सगळ्याला दिनेशला कंटाळला होता.  नापास झालो तर काय याचा इतका धसका त्याने घेतला होता की धड अभ्यासात लक्षही लागत नव्हतं.

नीलिमाला बाहेरचं जग, एक खूप हुशार, कर्तृत्ववान, मेहनती आणि सुशील अधिकारी म्हणून ओळखत होतं. पण घरात शिरताना बाहेर काढून ठेवलेल्या चपलांइतकीही आपल्याला किंमत नाही, असं तिला वाटायचं. लहान सहान गोष्टींवरून तिचा आणि तिच्या आई-वडिलांचा उद्धार करायची एकही संधी तिचे सासू-सासरे सोडत नव्हते. त्यांच्या नात्यातली त्यांना पसंत असणारी मुलगी नाकारून हर्षवर्धनने नीलिमाला पसंत केल्याचा राग त्यांच्या मनात होता. घरातल्या कटकटींना कंटाळून तिचा नवरा हर्षवर्धनही तिलाच जबाबदार धरून वैतागत होता. माहेरचं कुठलंच पाठबळ नसलेली नीलिमा रोज थोडी थोडी मरत होती.

अशी अनेक घरं, कुटुंबं आपल्याला माहीत असतात. कधी तरी आपल्याही घरात आपल्या किंवा दुसऱ्या कुणाच्या बाबतीत असं घडत असतं. असं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जवळच्या व्यक्तींनी केलेले मानसिक आघात. शाब्दिक आणि वर्तणुकीचे घाव. कधी उपहासात्मक खोचक बोलणं, कधी मर्मावर बोट ठेवणं, कधी आनंदावर उत्साहावर पाणी ओतणं ही तर मानसिक हिंसा आहे. मानसिक असल्याने वार, घाव दिसत नाहीत. जखम झाली, रक्त वाहिलं असंही दिसत नाही. पण मार किंवा घाव असा काही असतो की तो मनाला जखमच करतो. हळूहळू आत्मविश्वास कमी करतो. आनंद, उत्साह, आशा, प्रेरणा यांच्याऐवजी नाउमेद, निराशा, हतबलता, दु:ख, विषाद यांसारख्या भावना मनात वस्तीला येतात. याचा एक परिणाम म्हणजे नातेसंबंध दुबळे नकारात्मक होत जाणे आणि दुसरा परिणाम म्हणजे जगण्याच्या उमेदीचं खच्चीकरण होणं. ‘तुला काय कळतंय?’, ‘तुझा काही उपयोग नाही’, ‘तू बावळट/ वेंधळा/ मूर्ख/ बेअकली इत्यादी आहेस’, ‘तुझ्यामुळे माझं नुकसान होतं.’, ‘तू जगायलाच नालायक आहेस’, ‘तुझ्यामुळे आमची मान खाली होते,’ तुझ्यामुळे लोक आम्हाला नावं ठेवतात’ यासारखी कित्येक वेळा उच्चारलेली वाक्यं हे मानसिक हिंसा करणारं शस्त्रच असतं. वाईट असं की, ही हिंसा करणाऱ्यांचं प्रेमही असू शकतं. ही माणसंही जवळची असतात म्हणून त्यांच्या या उद्गारांना जखम करण्याची जास्त धार असते.

अशी मानसिक हिंसा आपल्याकडून होऊ नये म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे. दुसऱ्याची शाब्दिक हिंसा केल्याने आपला राग थोडा कमी होत असेल, कधी आपला अहंकारही सुखावत असेल, पण दुसऱ्याला दुखावल्याचं शल्य आपल्या मनात राहतंच. त्यापेक्षा एखादी व्यक्ती त्रुटी भरून काढत असेल तर नाउमेद करण्यापेक्षा प्रोत्साहन द्यावे. ‘‘तुला येईल, तुला जमेल,’’ ‘‘तू मनापासून प्रयत्न कर. काही अडचण आली तर मला सांग.’’ ‘‘तुझ्या समस्या सोडवायला इतरांचीही मदत होऊ शकते. तू सांगून तर पहा’’, ‘‘कशामुळे अपयश येतंय ते आपण शोधूया. त्या गोष्टींचं निराकरण केलं की यश मिळेल,’’ असे छोटे छोटे संवाद आपली त्या व्यक्तीविषयीची आपुलकी तर व्यक्त करतातच पण नकारात्मकतेच्या परिस्थितीत ती व्यक्ती एकटी नाही याचाही धीर त्या व्यक्तीला मिळतो. चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या छोटय़ा बाळाला ते कितीही वेळा पडलं तर आपण प्रोत्साहन देत आपलं बोट, आपला आधार पुन्हा पुन्हा आनंदाने देतो. ते मूल चालण्यास सक्षम होण्याचा आनंद घेतो. तसे आपण मोठय़ा माणसांच्या बाबतीत का करत नाही? कृतिशील शाब्दिक आधार देण्याने समस्या असणाऱ्या व्यक्तीला मानसिक आधार वाटतो.  टोमणे मारणे, तिरकस बोलणे, खोचक बोलणे या साऱ्यांनी आपला अहंकार कुरवाळला जातो. पण नात्यांमध्ये कडवटपणा येतो. त्यापेक्षा जे आपल्याला आवडत नाही, जे आपल्याला खटकते ते चांगल्या शब्दात, सरळपणे, चर्चा करून सांगावे. कृती असो वा उक्ती – एखाद्याचे वर्तन का आवडत नाही त्याचे कारणही आपल्याला देता आले पाहिजे. दुसऱ्याला तुच्छतेने वागवणे, अपमान करणे, हास्यास्पद ठरवणे हीदेखील मोठी मानसिक हिंसा आहे. यामध्ये आपण आपल्या अधिकाराचा, प्रतिष्ठेचा, यशाचा नकारात्मक वापर करतो.  एखाद्याचे म्हणणे, वागणे पटले नाही तर त्याचा दृष्टिकोन समजावून घेण्याची सहनशीलता आपल्याला दाखवता येते. नंतर जे पटत नाही त्याविषयी व्यवस्थित शब्दांत बोलताही येते. हाताची सगळी बोटं सारखी नसतात हे जेवढं सत्य – तेवढंच व्यक्तिपरत्वे निराळेपण असणार हेही सत्य. म्हणून आपल्याला एखाद्या व्यक्तीमधले जे खटकत असेल, सलत असेल, आवडत नसेल त्यासाठी शाब्दिक वा वर्तनाचा नकारात्मक हल्ला न करता आपुलकीने, प्रेमाने त्याची जाणीव करून द्यावी. आपल्या यशाचा, कर्तृत्वाचा गर्व न करता ते मिळवण्यासाठी आपण वापरलेल्या कृती, उक्ती, विचार आणि प्रेरणा मनापासून सांगाव्या. जगण्याच्या लढाईत माणूस एकटा पडला की भांबावतो. उणिवांवर बोट ठेवले की आणखी खचतो. तेव्हाच आपण प्रेमाने पाठीवर, खांद्यावर हात ठेवून ‘‘लढ – पुन्हा प्रयत्न कर. मी आहे तुझ्याबरोबर,’’ हे सांगितले तर मोठाच आधार व्यक्तीला मिळतो आणि त्याचे मनोबल वाढवताना आपणही आपल्या सकारात्मक निकोप मानसिकतेची जोपासना करतो!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2017 1:07 am

Web Title: what is mental violence
Next Stories
1 ‘मी सुद्धा’ची वाढती क्षेत्रं
2 पालकत्वाचे सार्वत्रिक आव्हान
3 ‘बॉयकोड’ पुरुष घडवताना
Just Now!
X