हरियाणा म्हटलं की डोळ्यासमोर प्रामुख्यानं उभं राहतं तेथील वैचारिक मागासलेपण, जातिभेद, खाप पंचायतीचा प्रभाव आणि स्त्री अत्याचार यांचे प्राबल्य. दररोज घडणारे सामूहिक बलात्कारांचे प्रकार आणि मुलींच्या भ्रूणहत्या तर नेहमीच्याच. अजूनही तब्बल येथील ६२ टक्के स्त्रियांना मुलगाच हवा असतो. परिणामी, तेथील मुलींचा हजारी जन्मदर ८०० पेक्षा कमी होत गेला. तेव्हा मात्र सर्वाचेच डोळे उघडले. मुली वाचविण्याबरोबर त्यांच्या सक्षमीकरण तथा आत्मसन्मान वाढविण्याचे प्रयत्न सांघिक अभियानाच्या माध्यमातून सुरू झाले. त्याचे सकारात्मक परिणाम नुकतेच हरियाणा दौऱ्याच्या दरम्यान दिसून आले.  मुलीच्या जन्माने ‘इज्जत का टोकरा’ म्हणून भयकंपित होणारं मन ते टाकून परिवर्तनास तयार असणाऱ्या ‘तारों की टोली’मध्ये परावर्तित झालेलं दिसून आलं.

मुलींच्या घटत्या जन्मदराचे गांभीर्य लक्षात घेऊन याच हरियाणातील पानिपतमधून २०१५ मध्ये ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाचा प्रारंभ केला गेला. शासनाचे प्रोत्साहन, सजग प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, युवक व विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांचा सामूहिक सक्रिय व प्रभावी सहभाग, यामुळे मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ होत असल्याचे सुखद चित्र पानिपतसह सोनिपत, रोहटक, झज्जर आदी ‘बदनाम’ परिसरांत पाहावयास मिळाले. मुलींच्या वाढलेल्या जन्मदराबरोबरच मुलींचे शिक्षण व चक्क मुलांसोबत एकत्रपणे कबड्डी-कुस्तीसारख्या खेळांत सहभाग इतका मोठा बदल अगदी ग्रामीण भागातही दृष्टिक्षेपास आला. हे बदलते आशादायक चित्र उद्याच्या हरियाणातील मुलींची  गगनभरारी ठरेल, अशी आशा जनवादी स्त्रिया संघटनेच्या कार्यकर्त्यां जगमती संगवान व ‘यूएन वुमन’च्या अंजू पांडे यांनी व्यक्त केली.

‘गर्ल्स काऊंट कोलिशन’, ‘भारतीय प्रतिष्ठान’, ‘यूएन वुमन’, ‘ब्रेक थ्रू’ आणि ‘प्रिया’ (Participatory Research in Asia-PRIA) या अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हरियाणात मुलींच्या जन्मदरवृद्धीसह त्यांचे शिक्षण, खेळातील सहभाग आणि एकूणच ज्ञान आणि लोकशाहीत स्त्रियांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न होत आहेत. ‘गर्लस् काऊंट’चे रिझवान परवेझ व गरिमा कौर यांच्या मदतीने अशा महत्त्वाकांक्षी व सामाजिक सकारात्मक बदल घडविणाऱ्या काही प्रकल्पांचे काम प्रत्यक्ष फिरून पाहता आले. तेथील ही दिलासादायक वाटचाल आपल्या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठीही तेवढाच बोध घेण्याइतपत महत्त्वाची ठरावी.

‘प्रिया’ संस्थेच्या नंदिता भट्ट व यश्वी शर्मा गेली १२ वर्षे इथे सामाजिक बदलाचं काम करत आहेत. त्यांनी सांगितलं, सोनिपत व पानिपत जिल्ह्य़ातील बालविवाह, मुली व स्त्रियांवरील अत्याचार रोखताना आजही अनेक अडचणी त्रास देतात. चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या ‘निर्भया’ बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याच वेळी सोनिपत व पानिपतच्या वेगवेगळ्या २० गावांमध्ये मुला-मुलींचे गट तयार करून त्यांच्यात स्वतंत्र बैठकांद्वारे चर्चा-संवाद सुरू केले. मुलींच्या घटत्या जन्मदरासह गर्भलिंग चिकित्सांच्या वाढत्या प्रकारांविषयी मुलांना बोलतं केलं. ‘हे तर असंच चालायचं’ अशी परंपरागत मानसिकता मुलांमध्ये होती. त्यावर पुन्हा चर्चा-संवाद होऊन मुलांच्या मानसिकेत बदल होत गेला. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. गावात जातीयवाद होता. त्याकडे मोर्चा वळविला. राज पंचायतींची साथ मिळू लागली. त्यातूनच मुला-मुलींमध्ये कोणताही भेदभाव न मानता त्यांना एका समान पातळीवर आणण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. कट्टर जातीय व्यवस्थेतली होरपळ पाहिल्याने इथल्या तरुणाईने नावामागील आडनाव कायमचे पुसून टाकले आहे. आडनावाने जात समजते. त्यामुळे आमची ओळख आमच्याच नावाने होईल, असे त्यांनी ठरवले आहे.

‘कदम बढाते चलो’ (केबीसी) यांसारख्या अभियानाच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले. त्यास चांगली फळे येत असतानाच २०१५ मध्ये बालविवाहांचे सर्वेक्षण केले असता हे प्रकार वाढतच चालल्याचे व त्यावर काम करण्याची गरज असल्याचे लक्षात आले. त्यासाठी सुरुवातीला मुली व स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांच्या आरोग्यावरील घातक परिणामाचा धोका नजरेस आणून दिला. गावातील सरकारी शाळांतूनही मनोरंजनातून प्रबोधन होण्यासाठी संवाद वाढविला. स्त्री-अत्याचार, सार्वजनिक ठिकाणची मुलींची असुरक्षितता आणि बालविवाह या तीन मुद्दय़ांवर पालकांची मानसिकताही जाणून घेतली. पालकांशी सतत बोलल्यानंतर मुलगी म्हणजे ‘इज्जत का टोकरा’ ही पूर्वापार मानसिकता बदलण्यास विलंब लागला नाही. पालकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे मुलींना शिक्षणातून ऊर्जा मिळत गेली. किशोर व तरुण मुला-मुलींना घर, समाज, शासन, पोलीस, न्यायपालिका व इतर संस्थांशी संबंधित पूरक कामात जोडून बदल घडविणाऱ्या ‘कदम बढाते चलो’ अभियानाशिवाय ‘तारों की टोली’ हे अभियानही तितकेच उपयुक्तठरले आहे. हे अभियान ‘ब्रेक थ्रू’ संस्थेच्या माध्यमातून १५० शाळांतून सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांसाठी चालविले जाते. १० ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये एकत्र व समान पातळीवर शिक्षण, न्याय हक्क शाळा व समाजातून मिळण्यासाठी जाणीव-जागृती केली जाते. खेळ, गाणी, नृत्य, नाटिका, चित्रकला, कार्यानुभव व अन्य कृतींच्या माध्यमातून हा पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे राबविला जात असताना त्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ही केले जाते. या पथदर्शी प्रकल्पाचा विस्तार लवकरच उत्तर प्रदेश, झारखंड व बिहारमध्ये केला जाणार आहे. सोनिपत जिल्ह्य़ातील राजपूर या सहा हजार लोकसंख्येच्या गावात ‘प्रिया’ संस्थेने या गावात सहा वर्षांपूर्वी ‘कदम बढाते चलो’ मोहीम हाती घेतली. त्या वेळी गावात मुले-मुली एकमेकांशी बोलणेच काय, एकमेकांकडे पाहातदेखील नव्हते. त्यामुळे त्यांना एकत्र करून काम करणे कठीण होते. ‘प्रिया’ने यशस्वी समुपदेशन करून मुला-मुलींना एकत्र आणले. उपयुक्त खेळ तयार केले. साहजिकच मुलींची शिक्षणगळती टाळण्यासाठी मुलगेच पालकांना भेटून आर्जव करू लागली, मुलींच्या शिक्षणाचा आग्रह करू लागली. गावच्या सरपंच राजकुंवर यांचे पती भेटले. ‘स्वत: केले, मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वत: शिक्षणाचे महत्त्व ध्यानात घेऊन सरपंच पत्नीला नर्सिग कोर्स शिकविला आहे. इतकंच नव्हे तर मुलींना शिक्षणासह निर्भयपणे वावरता यावे म्हणून गावातील दारूचे दुकान हटविले आहे. मुलींना चार किलोमीटर अंतरावरील माध्यमिक शाळा व कॉलेजला जाण्यासाठी रिक्षा वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण घेणाऱ्या सुरुची, संजू, सरिता, पूजा या मुलीही मोकळेपणाने बोलल्या. म्हणाल्या, जेव्हा ‘प्रिया’शी जोडले गेलो, तेव्हापासून शिक्षणाच्या प्रवाहात येऊन किमान कौशल्य आत्मसात करता आले. ‘प्रिया’शी जोडले गेलो नसतो तर आतापर्यंत आमचा विवाह होऊन कदाचित अपत्येही जन्माला आली असती. अर्थात ‘प्रिया’शी निगडित नसलेल्या अनेक मुली शिक्षणापासून आजही दूरच असून घरात जणू बंदिस्त झाल्या असल्याचंही त्यांनी सांगितले. याच दौऱ्यात कोमल भेटली. फावल्या वेळेत ती कागदावर मेंदीचे नाजूक नक्षीकाम उतरविते. तिच्यातील नितांत सुंदर कलात्मकता अभिजात प्रतिभेचे दर्शन घडविते. गरीब कुटुंबातील कोमलला आठवीनंतर शाळा सोडण्यासाठी वडिलांनीच दबाव टाकला होता. यामागे घरच्या गरिबीबरोबरच एकूणच मुलींच्या सुरक्षिततेविषयीची काळजी होती. शिक्षण घेण्याची आस असूनही घरातून विरोध होऊ लागल्याने कोमल निराश होती. सुदैवाने ती ‘प्रिया’शी जोडली गेली आणि तिचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. कमी कालावधीतील किमान कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम पूर्ण करून घरासाठी थोडा-बहुत आर्थिक हातभार लावण्याची तिची इच्छा आहे. शिक्षण घेऊन कर्तृत्ववान बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या अशा अनेक मुली भेटल्या. तसेच अनेक मुलगे भेटले. अमन, रोहित, राकेश या दहावी ते बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलांनाही आता मुलींशी बोलण्याची सवय झाली आहे. गावात मुलांकडून मुलींची होणारी छेडछाड बंद केल्याने त्यांच्यात परस्परविश्वास वाढला आहे. मुले-मुली समान दर्जा, हक्क आत्मसात करून आनंदाने जीवन जगताहेत, बारावीत असूनही इतरांची दहावीची शिकवणी घेणारा राकेश सांगत होता.

रोहतक जिल्ह्य़ातील कलानौर तालुक्यात गुढाण येथे सरपंच अशोक धानक, माध्यमिक शाळेचे प्राचार्य कर्मवीरसिंग यांच्यासह अंगणवाडी सेविका तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला असता गावात मुलींच्या शिक्षणासह खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याची साक्ष पटली. ‘ब्रेक थ्रू’ संस्थेने मुलींचा जन्मदर अत्यल्प असलेल्या पानिपत, सोनिपत, रोहतक, झज्जर या भागांत चार वर्षांपूर्वी ‘तारों की टोली’ नावाचे अभियान हाती घेतले. ‘लिंगाधारित भेदभाव’ या विषयावर काम करताना त्याचे नेतृत्व शिक्षकांसह मुलग्यांकडेच सोपविण्यात आले. मुलांची मानसिकता बदलली आणि मुलींकडे समान नजरेने पाहता येऊ लागले. शाळेकडे जाणारा रस्ता खराब होता. तो मुलांच्या तक्रारीवरून तोही दुरुस्त झाला. गंमत म्हणजे शिक्षण घेण्यासाठी मुलींना मुभा देणारा पालकवर्ग खेळांसाठी मात्र परवानगी देत नव्हता. गावात कबड्डी खेळासाठी क्रीडांगण आहे; परंतु तेथे मुलींना खेळण्यास बंदी होती. मुलांनी ही बाब सरपंच धानक यांच्या कानावर घातली. शेजारच्या एका गावात कबड्डीचे सामने होणार होते. जर शेजारच्या गावातील साक्षी मलिक ही कुस्ती खेळात हरियाणाचे नाव जगात रोशन करीत असेल, तर आमच्या गावातील मुली कबड्डी का खेळू शकत नाहीत, असा सवाल करीत सरपंच धानक हे प्रत्येक मुलीच्या घरी गेले आणि त्यांनी पालकांना राजी केले. खेळासाठी मैदान होतेच. कबड्डी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर होती. मुलींनी धडपडत कबड्डीचा जोरदार सराव केला. सरपंचासोबत गाडीत बसून खेळायला गेल्या. चिवटपणे खेळून यश मिळविले. हा खूप मोठा बदल आहे. आता ‘तारों की टोली’ने या गावात मुलींसाठी हक्काचे स्वतंत्र क्रीडांगण मिळविण्यासाठी चिकाटीचे प्रयत्न चालविले आहेत. कबड्डीसह कुस्ती व पतंगबाजीच्या खेळात मुले-मुली पुढे येत असून अलीकडेच गावातील काही मुली विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. हिमतीच्या बळावर काही मुलींनी लष्करात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. ‘तारों की टोली’च्या मोहिमेची ही कमाल आहे. धनवान असलेले सरपंच धानक यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी गावातील सरकारी शाळेतच घातले आहे. नजीकच्या गावातील मोठय़ा खासगी शाळेत किमान मुलाला तरी पाठविता आले असते; परंतु मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही गावातील सरकारी शाळेतच पाठविण्यामागे त्यांची ‘एक आँख की दृष्टी’ जाणवते. शिवाय त्यातून समाजात तसा सकारात्मक संदेशही जातो.

असे असले तरी आणि हरियाणातील सकारात्मक बदलाचे पैलू उलगडून पाहताना सामाजिक विसंगतीही दिसून येते. देशात उत्पन्नाच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर असलेला हरियाणा आर्थिकदृष्टय़ा जेवढा शक्तिशाली आहे, तेवढाच सामाजिकदृष्टय़ा मागासलेला आहे. आज येथे विवाहासाठी मुली मिळत नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत एका सत्ताधारी बिहारी नेत्याने प्रचारसभेत बोलताना हरियाणातील तरुणांच्या विवाहासाठी बिहारातून मुली ‘आणण्याचे’ आश्वासन दिले होते म्हणे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हटले पाहिजे; पण परिस्थिती बदलते आहे. आज प्रत्येक जिल्ह्य़ात स्त्रियांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आहे. ‘ऑनर किलिंग’च्या घटना पाहता दाम्पत्य संरक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र अद्याप विद्यमान शासनकर्त्यांची आणि खाप पंचायतींची वैचारिकता एकाच प्रकारची असल्याने बदलात विलंब आणि अडचणी जाणवतातच. तेथील प्रसारमाध्यमांची मानसिकताही दाबली जाते. अलीकडे काही वर्षांत स्थानिक राज पंचायतीमध्ये आरक्षणामुळे स्त्रियांचा सहभाग सक्रिय होत आहे. अर्थात, ही झेप घेताना अजून बरीच आव्हाने पेलावी लागणार आहेत. विशेषत: काही भागांत दारिद्रय़ात पिचलेल्या भटक्या विमुक्त जमातीच्या स्त्रियांची दररोजच्या आयुष्यात अस्तित्वासाठी संघर्षांची लढाई पाहता त्याकामी बळकटी येणे जरुरीचे वाटते. लिंगआधारित भेदभाव न करता मुला-मुलींसाठी समान दृष्टिकोन बाळगणाऱ्या गुढाणसारखी अन्य काही गावे हरियाणात दिसतात. जसजशी त्यांची संख्या वाढत जाईल तसतशी त्यांची वाटचाल हरियाणाची उद्याची ‘नई उडान’ असेल.

भीषण दारिद्रय़ात जगण्याचा संघर्ष

हरियाणातच पानिपत जिल्ह्य़ातील मनाना यांसारख्या गावात लोहडा वस्तीत कमालीच्या दारिद्रय़ात राहणाऱ्या स्त्रियांचा दररोजच्या जगण्याचा संघर्ष पाहावयास मिळाला. सुमारे शंभर घरांच्या या वस्तीत प्रत्येक कुटुंबात बालविवाह होतात. देशाची राजधानी नवी दिल्लीपासून शंभर किलोमीटर अंतरावरचे हे लाजिरवाणे सत्य आहे.

स्त्रिया किरकोळ भंगार माल गोळा करून विकतात, तर व्यसनात बुडालेले पुरुष फार तर म्हशी-शेळ्या सांभाळतात. चार-पाच दिवसांत एकदा पाणी मिळते. रस्ता, गटार, शौचालय कशाची सोय नाही. मुला-मुलींना शाळा माहीत नाही. मात्र रहिवाशांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. येथील दारिद्रय़ एवढे भीषण की, एखाद्या घरात व्यक्ती मृत्यू पावली तर ‘जग’च्या दिवशी (तेरावा) दिल्या जेवणातच घरातील मुलींची लग्ने लावून दिले जाण्याची पद्धत आहे. एकाच घरात दोन-दोन वेळा जेवण देणे शक्य नाही म्हणून सूतकातच घरातील मुलींची ‘बिदाई’ केली जाते. लग्न होणाऱ्या मुलींचे वय पाहिले तर ते जेमतेम ८-१० वर्षांचे. बालविवाहाचे प्रस्थ तेथील  दारिद्रय़ाशी निगडित आहे. अलीकडे या लोहडा वस्तीवर ‘प्रिया’ संस्थेने काम सुरु केले असल्याने लवकरच बदल दिसेल अशी अपेक्षा आहे.

मीसुद्धा.. आहेच तुमच्याबरोबर

‘मी टू’ मोहिमेने स्त्रियांना स्वत:वरील लैंगिक अत्याचाराविषयी बोलायला उद्युक्त केलं आणि स्त्रिया लिहित्या झाल्या, व्यक्त झाल्या. पण आजही स्त्रियांचा असा मोठा वर्ग आहे ज्यांच्या मनात भीती, घृणा, दडपण, अविश्वास आहे, ज्यामुळे त्यांनी गप्प राहणं स्वीकारलं आहे किंवा त्यांना गप्प बसवलं गेलंय. मैत्रिणींनो, ‘चतुरंग’ तुम्हाला देतंय व्यासपीठ. लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही सामोऱ्या गेलेल्या, विनयभंगापासून अन्य लैंगिक अत्याचारांपर्यंत कोणत्याही गोष्टीचा अनुभव तुम्ही इथे मांडू शकता. काय अनुभव होता तो? त्याला प्रतिकार करू शकलात का? तुम्ही त्याबद्दल कुणाशी बोललात का? त्यांची प्रतिक्रिया काय होती? या विरोधात आपण एकत्रित काय करू शकतो? सांगा आम्हाला.  हा अनुभव तुमच्या नावासह ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्ध करायचा नसेल तर तसंही कळवा. आयुष्यातल्या त्या काळ्याकुट्ट अनुभवाला कागदावर उतरवून मोकळ्या व्हा. हे व्यक्त होणं तुम्हाला त्या किळसवाण्या अनुभवापासून दूर व्हायला मदत करेल. कारण असंख्य जणी तुमच्याबरोबर आहेत. त्याही म्हणताहेत, मी टू.. पत्ता – प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०

– एजाजहुसेन मुजावर

aejajhusain.mujawar@expressindia.com