नाव : हिटलर पेशवे ऊर्फ अण्णा तृतीय.

शाळा : अंगठा द्या एकलव्याला जिल्हा परिषद शाळा, वॉशिंग्टन डीसी खुर्द.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

शिक्षण : बॅरिस्टर, डीएड, बीएचएमएस, भाप्रसे.

जन्मगाव : लुबूंम्बासी.

जन्मवर्ष : २०८०.

छंद : खून करणे, अरुंद रस्त्यावरून ऐंशी चाकांचा ट्रक वेगाने हाकणे, सिंहाच्या आयाळीचा गुंता सोडवणे, नदी प्रदूषित करणे, मार्क झुकेरबर्गला दिवसातून पाच वेळा आई-बहिणीच्या शिव्या देणे, विरहाच्या कविता करणे.

व्यवसाय : मानवी अवयवांची तस्करी, पेट्रोल भेसळ आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पसे खाणे.

जीवनविषयक तत्त्वज्ञान : किडनी विकायला लागली तरी चालेल, पण रुबाब सोडायचा नाही.

आदर्श : अण्णा हजारे, जग्गी वासुदेव, निरव मोदी, पूनम पांडे.

– आज एक एप्रिल. सकाळी लवकर उठलो आणि फेसबुकवरच्या माझ्या प्रोफाइलमध्ये वरील सारे बदल करून टाकले. ‘फूल्स डे’ला वेडय़ात काढायचे तर गुगल आणि फेसबुकलाच काढावे, हे मी ठरवले होते. उगा साध्यासुध्या लोकांची आवाज-बिवाज बदलून फसवणूक का करायची? त्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा लोकांना वेडय़ात काढायला काय हरकत आहे? या विचाराने फेसबुक आणि गुगललाच वेडय़ात काढायचे ठरवले. माझा डीपी म्हणून मी ‘कोसला’ वाचणाऱ्या सनी लिओनीचा फोटो एडिट करून टाकला!

आता माझे प्रोफाईल वाचून गुगल अ‍ॅनालिटिक्सवाले काय निष्कर्ष काढतील?

फेसबुक, गुगल हे सारे आपण त्यांना जी माहिती पुरवतो त्याचे विश्लेषण करतात आणि त्यावरून काहीतरी निष्कर्ष काढतात, असे मागच्याच आठवडय़ात वाचले आणि मी खूप दुखावला गेलो होतो. माझ्या मते, सगळ्या जगाला कायम एप्रिल फूल करण्यासाठी तमाम भारतीयांचा जन्म झालाय. गरज असो अथवा नसो, परंतु आपल्याबद्दल कधीच आणि कोणालाच पूर्ण आणि व्यवस्थित काहीच कळू द्यायचे नाही ही तर भारतीय माणसाची खासीयत आहे. आपला आणि आपल्या आजूबाजूच्या जगण्याचा डेटा अनाकलनीय पद्धतीने भोंगळ ठेवणे हे आमचे राष्ट्रीय वैशिष्टय़ आहे! या डेटातून सुसंगत अर्थ आम्हालाच कधी काढता आला नाही; मात्र तो गुगलला काढता आला आणि त्यावर लोकांचा विश्वासही बसला, याने मला फारच अपमानित झाल्यासारखे वाटले. सलग दोन निवडणुकांना साधे मतदार यादीत माझे नाव कधी व्यवस्थित आले नाही आणि माझ्या वर्तनाचा अभ्यास करून माझे मत प्रभावित करण्याचा प्रयत्न केंब्रिज अ‍ॅनालिटिका करू शकते यावर माझा विश्वास बसू शकत नाही.

साधे फेसबुकवर शोधायला गेलो तर माझ्या सहा मत्रिणींनी लग्नानंतर त्यांचे नाव आणि आडनाव बदलले होते. मला जिथे माझ्या मत्रिणी धड सापडत नाहीत तिथे फेसबुकला इतक्या गोंधळाच्या नावाच्या माझ्या मत्रिणींच्या वर्तनाचा अंदाज येईल, यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही.

सुनील आव्हाड असे ज्याचे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नाव आहे त्याचे ‘पिंटू आव्हाड’ म्हणून फेसबुक खाते आहे. त्यावर छाती फाडून राम दाखवणाऱ्या हनुमानाचा डीपी आहे आणि ‘तुमच्यासाठी कायपण – कुठेपण -कसेपण, फक्त उधार मागू नका कधीपण!’ असे स्टेटस आहे. पिंटूच्या मनात काय चाललंय हे पिंटूच्या बापाला जिथे कळत नाही; पिंटूला आपण एमपीएससी द्यायची की ऊस करायचा याचा गोंधळ आहे, तिथे गुगलला पिंटूच्या मनातले कळले असेल हे कसे मानायचे? आधार कार्डवर ज्याचे महिपतराव नाव आहे, त्याला फ्लेक्सवर बाळासाहेब म्हणतात आणि जवळचे तात्या म्हणून हाक मारतात. महिपतराव हेच बाळासाहेब ऊर्फ तात्या आहेत, हे गुगलला कळले असेल असे मला अजिबात वाटत नाही!

माहितीच्या बाबतीत सगळ्या जगाला बाराही महिने एप्रिल फूल करण्यात आमची हयात गेली. स्वत:बद्दल काही म्हणता काहीही सुसंगत आपण कधीही जगाला कळू देत नाही. लग्नात नवऱ्याचे नाव घ्यायचे तर – ‘हिरव्या हिरव्या रानात मोहक मोहक फुले, बंडूरावांचे नाव घेताना मन हिंदोळ्यावर झुले!’ आता अमेरिकी गुगल शोधायला लागला तर हिच्या नवऱ्याचे नाव हिरव्या आहे, रान आहे, मोहक आहे की बंडूराव हे त्याला कसे कळणार? तेहेतीस कोटी देव, त्यातल्या बहुतेकांची सहस्र नामे किंवा गेला बाजार किमान चाळीस नावांची स्तोत्रे. सत्तरीला आलेला माणूसही अंदाजाअंदाजाने देवांच्या पाया पडत जातो. ज्याच्या पाया पडतोय त्याचे नाव जिथे त्यालाच वेळेवर आठवत नसते तिथे गुगलला काय आठवणार आहे? हाजी काझी मियाँ अब्दुल रशीद- यात बाप, मुलगा, आजा, आडनाव याचे काय वाटप आहे?

आमच्या गावच्या बबलीचे लग्न झाले. प्रथा-परंपरेप्रमाणे मनालीला ती हनिमूनला गेली. फेसबुकवर स्टेटस नाही टाकला तर आपण हनिमूनला गेलोच नाही असे लोकांना वाटेल, त्यामुळे तिथले फोटो टाकणे आणि मित्र-मत्रिणींना टय़ॅग करणे स्वाभाविक होते. त्याप्रमाणे तिने कुडकुडणाऱ्या थंडीत मिनी स्कर्ट घालून फोटो टाकले आणि कॅप्शन लिहिली- ‘एन्जॉयिंग हनिमून अ‍ॅट मनाली विथ बंटी अ‍ॅण्ड टेन अदर्स.’ तिचे स्टेटस पाहून जिथे तिच्या आईबापाला झीट आली तिथे फेसबुकचे काय होणार? या असल्या स्टेटसना टाकून फेसबुक आणि गूगलला गंडवण्यात आपल्या लोकांची हयात चालली आहे. भारतातल्या लोकांसमोर गुगल-फेसबुक कायमचे एप्रिल फूल झालेत!

गुगलला वेडय़ात काढायचे म्हणून मी दादरहून विरारचा रस्ता गुगल मॅपवर लावला आणि चर्चगेटच्या दिशेने गाडी चालवायला सुरुवात केली. गुगलची बाई किंचाळून किंचाळून ‘राँग रूट राँग रूट, टेक अ यू टर्न, टेक अ यू टर्न’ सांगत राहिली. मला रस्ता माहीत होता, तरीही मी नेव्हिगेशन बंद केले नाही आणि तिला तसेच आरडत ओरडत तासभर चर्चगेटपर्यंत घेऊन गेलो. मध्ये तर, तिने इतक्या वेळा सांगूनही मी तिचे ऐकतच नाहीये म्हटल्यावर ती मला एखादी इरसाल शिवी देईल, असे वाटले! पण मी नाही म्हणजे नाही जुमानले. गुगलच्या पत्ता सांगणाऱ्या बाईवर माझा जुना राग आहे. मागे एकदा सांगलीला मी माझ्या बहिणीचे घर शोधत होतो, तर गुगलताईने ते मला सॅन होजेमध्ये आहे असे अगदी आत्मविश्वासाने सांगितले होते. दारात उभी राहून माझी बहीण माझी तासभर वाट बघत होती आणि मी मोबाइलमध्ये डोके खुपसून तिच्यासमोरून तीन-तीन वेळा पत्ता शोधत होतो. शेवटी जेव्हा माझ्या बहिणीने मला पाहिले आणि थांबवले तेव्हा मी माझ्या बहिणीच्या घरापासून पायी चालत सहाशे दिवसांच्या अंतरावर आहे, असे गुगलताई दाखवत होत्या! शे-दोनशे उपग्रह, पाच-पन्नास हजार लोक, लाखभर संगणक बसवून आणि आता पंधरा-वीस र्वष झाल्यावरही साधे सांगलीतले पत्ते गुगलला अजून कळले नाहीत, तर त्याला माझ्या मनाचा थांग लागला असेल यावर विश्वास कसा ठेवावा? आपला आयकर विभाग गेली अनेक र्वष आपल्या लोकांकडे किती पसा आहे याबद्दल उत्सुकता बाळगून आहे. परंतु आपल्या लोकांनी जाम त्यांना कधी कळू दिलेले नाही. एखाद्याकडे लग्नाला गेलो तर जो राजा-महाराजांसारखा श्रीमंत वाटतो तोच अगदी मरतुकडे रिटर्न कसे काय भरतो? आजवर आयकरवाल्यांना न उलगडलेले हे कोडे आहे.

एका जाणत्या माणसाने म्हणून ठेवलेय की, ‘तुमच्या तरुणांच्या ओठी कोणती गाणी आहेत ते मला सांगा, मी तुमच्या राष्ट्राचे काय भवितव्य आहे ते सांगतो.’ ‘पप्पी दे पारूला’ हे ते गाणे आहे, असे जर सांगितले तर जाणता माणूस काय निष्कर्ष काढेल?

लोकांनी आपल्याबद्दल अंदाज बांधायचा प्रयत्न केला, की त्यांना गंडवायचे ही तमाम भारतीयांची वंशपरंपरागत सांभाळलेली विरासत आहे. महाराजांबरोबर जे अगदी लढवय्ये आणि प्रामाणिक होते, ते इंग्रजांसमोर शेपूट घालून फिरत होते. गांधींच्या काळात देशासाठी जे घरादाराची होळी करायला तयार होते, ते स्वातंत्र्यानंतर घरादारासकट त्याच देशाला लुटायला लागले होते. कोणते भारतीय खरे? घरादाराची होळी करायला तयार असणारे, की घरादारासकट देशाला लुटायला निघालेले? याचा पत्ता आपण जगाला लागू दिलेला नाही. ‘सर्वेत्र सुखिन: संतू सर्वे संतू निरामय:’ असे ज्याच्या स्कॉर्पिओवर लिहिले आहे तो संतू पाटील बांधावरून सख्ख्या भावाच्या डोक्यात दांडुका मारतो आणि गणपतीच्या मिरवणुकीत मस्जिद आली की डीजेचा आवाज वाढवणारेच संध्याकाळी ट्रेन पकडून अजमेरच्या दग्र्यावर चादर चढवायला जातात. आमचे लोक तरी कोणते- डीजेचा आवाज वाढवणारे की चादर चढवायला जाणारे? आता या असल्या लोकांचा डेटा चोरून गुगलच्या डोक्यात काय उजेड पडणार आहे?

आपल्याबद्दल इतरांना अंदाज बांधायला लावायचे आणि त्यांना एप्रिल फूल करायचे हा खेळ आम्ही वर्षांनुवष्रे खेळतो आहोत. आम्हाला गंडवायचे असेल तर आम्हाला आमचेच लोक लागतात. ये औरो के बस की बात नहीं! चौपाटीवर गेलो तर जोरजोरात हसायचा आवाज आला. एका बाजूला पाचपन्नास जण, दुसऱ्या बाजूला पाचपन्नास जण एकमेकांकडे बघून हातवारे करत होते आणि खदखदून हसत होते. एका बाजूचे ओरडायचे ‘गरिबी हटाव’, की समोरचे जोरजोरात खिदळायचे. लगेच समोरचे जोरात ओरडायचे ‘अच्छे दीन आयेंगे’, की इकडचे जोरजोरात खिदळायचे. यांना वाटायचे आपण त्यांना गंडवले, त्यांना वाटायचे आपण यांना गंडवले.

गुगलताई, रविवारी काळ्या रस्स्यावर ताव मारणारा सोमवारी माळकरी असतो. मुंबईत हफ्ते खाणारा गावी जाऊन गरिबांसाठी शाळा बांधतो. जी गर्दी रात्री तमाशाला दिसते, तेच लोक सकाळी हरीनाम सप्ताहाला दिसतात. भ्रष्टाचारावर तावातावाने बोलणाऱ्याच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत शुभेच्छुक म्हणून पाच-पंचवीस भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे आपला रुबाब पडावा म्हणून टाकलेली असतात. चार गंडे, पाच माळा, सहा अंगठय़ा घालून घाबरत घाबरत जगणाऱ्याला इतका आत्मविश्वास येतो, की तो थेट दारू पिऊन तीन जणांना घेऊन मोटारसायकलवर हेल्मेट न घालता हायवेवरून प्रवास करतो. आम्ही कसे आहोत? त्यागी की भोगी? माळकरी की छंदीफंदी? भोळे की भामटे? लोभी की निस्वार्थी? हे अजून आम्हालाच कळलेले नाही. तर गुगलताई, तुला काय कळणार?

गुगलताई, तू उगा आम्ही कोणत्या चड्डय़ा विकत घेऊ किंवा पेप्सी जास्त पिऊ की कोक याचे अंदाज बांध, त्यापलीकडे तुझा जीव नाही. हजारो वर्षांची विरासत आणि कितीतरी द्रष्टय़ा संतांना आम्ही कोळून प्यायलो, पण आम्ही कसे आहोत हे आम्ही कोणाला कळू दिले नाही; तिथे तू कोण आहेस? एखाद्याने आमच्याबद्दल अंदाज बांधला, की आम्ही त्याला एप्रिल फूल करून गंडवतो. आम्ही कसे आहोत, काय आहोत याबद्दल तुझे अ‍ॅनालिटिक्स कामाला लावून उगा पळापळ करू नकोस. आमच्यातल्याच कोणीतरी, मागे कधीतरी ‘कोऽहं?’ असा प्रश्न विचारायचा. म्हणजे माणसाला स्वत:चा आणि मग सत्याचा शोध लागतो असा फॉम्र्यूला सांगून ठेवलाय. आम्ही फार मनावर नाही घेतला कधी तो! आम्ही कधीतरी तो मनावर घेऊ, म्हणजे आम्ही कोण आहोत हे आधी आम्हाला कळेल आणि मग असलीच तोपर्यंत तू तर तुलाही कळेल. आमच्या विराट राष्ट्रीय गोंधळाचे सूत्र आधी आम्हाला उलगडले तर तुलाही उलगडेलच! तोपर्यंत आमच्याकडून वारंवार एप्रिल फूल होत राहण्याशिवाय तुझ्या तरी हातात काय आहे? तू आमच्याबद्दल अंदाज वर्तवत राहा; आम्ही तुला खोटे ठरवून एप्रिल फूल करून तोंडावर पाडू!

चांगल्या मनाची असशील, आम्हाला फक्त ‘मार्केट’ नाही तर आपलं मानत असशील; तर या एक एप्रिलला आमचे वाटोळे होईल असा अंदाज वर्तव. मग बघ आम्ही कसे जीव काढून तुझा मोरू करतो ते!

mandarbharde@gmail.com