आनंद कानिटकर

श्री गणेश या देवतेचा प्राचीन काळापासूनच सध्याच्या भारताच्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील अन्य देशांतही  प्रसार झालेला दिसून येतो. अफगाणिस्तानातसुद्धा प्राचीन काळातील तीन गणेशमूर्ती आढळून आल्या होत्या. त्यांची वैशिष्टय़े आणि त्यांच्या रचनेविषयी..

गणेश ही देवता प्राचीन काळापासून इतकी प्रसिद्ध आहे, की सध्याच्या भौगोलिक भारताच्या बाहेरही तिचा प्रसार त्याकाळी  झालेला दिसून येतो. ही देवता अगदी चीन, तुर्कस्तान, अफगाणिस्तानपासून आग्नेय आशियातील थायलंड, कंबोडिया या देशांमध्येही प्राचीन काळातच प्रसिद्धी पावलेली दिसून येते.

अफगाणिस्तानचा विचार केला तर तिथे प्राचीन काळातील (म्हणजे इ. स. पाचवे शतक ते नववे शतक) तीन गणेशमूर्ती सापडल्या होत्या. यापैकी अफगाणिस्तानातील गार्देज येथे सापडलेल्या इ. स. पाचव्या-सहाव्या शतकातील गणेशमूर्तीच्या पीठावर संस्कृत भाषेतील आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख असून, ती मूर्ती महाराजाधिराज परमभट्टारक शाही श्री खिंगल या राजाने स्थापन केल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात या प्रतिमेला महाविनायकाची प्रतिमा असे म्हटले आहे. त्यामुळे ही मूर्ती ‘काबूल महाविनायक’ म्हणून संशोधकांत प्रसिद्ध होती. काबूलमधील बाबा पीर रतननाथ दग्र्यात ती ठेवण्यात आलेली होती आणि तिचे १९७० च्या दशकापर्यंत पूजन होत होते. याशिवाय काबूलमधील शोर बाजार या परिसरातील एका छोटेखानी मंदिरात गणेशाची एक छोटेखानी मूर्ती पुजली जात होती. डॉ. म. के. ढवळीकर यांच्या मतानुसार, शोर बाजारातील मंदिरामधील मूर्ती इसवी सन चौथ्या शतकातील असावी.

अफगाणिस्तानवरील सोव्हिएत रशियाच्या आक्रमणानंतर १९८० मध्ये या दोन्ही मूर्ती काबूलमधील राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आल्या. त्यानंतर आलेल्या तालिबान राजवटीत काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाची मोठय़ा प्रमाणावर नासधूस करण्यात आली. तालिबानविरुद्धच्या युद्धात या संग्रहालयावर बॉम्ब पडला आणि संग्रहालयाची इमारत उद्ध्वस्त झाली. संग्रहालयातील रजिस्टरमध्ये या मूर्तीची नोंद आहे, परंतु दुर्दैवाने तालिबान राजवटीनंतर या मूर्तीचा ठावठिकाणा अद्याप लागू शकलेला नाही. त्यामुळे या मूर्तीच्या छायाचित्रांवरच आता समाधान मानावे लागते.

या दोन मूर्ती संशोधकांत प्रसिद्ध आहेत. परंतु इटालियन संशोधक डॉ. जिओवान्नी वेरार्दी यांना १९७४ साली काबूलमधील बाजारात फिरताना गणेशाची अजून एक संगमरवरी प्रतिमा आढळली होती. त्यांनी लगेच या प्रतिमेची छायाचित्रे काढून निरीक्षणे नोंदवून घेतली. मात्र, ही मूर्ती अफगाणिस्तानातील कोणत्या भागातून काबूलमध्ये आणण्यात आली होती आणि नंतर त्या मूर्तीचे काय झाले, याची माहिती मिळत नाही.

या मूर्तीची उंची २९ सेंटीमीटर होती, तर मूर्तीखालील दगडाच्या भागासमवेत ही मूर्ती ३९ सेंटीमीटर उंचीची होती. हा गणेश ललितासनात बसलेला असून त्याला चार हात होते. मूर्तीची सोंड तुटलेली असून तिचा उजवीकडील हस्तिदंत दिसत होता. मूर्तीच्या मस्तकावर वैशिष्टय़पूर्ण असा मुकूट कोरलेला असून, मूर्तीच्या गळ्यात एक साधा हार आहे. मूर्तीच्या शिल्लक राहिलेल्या उजवीकडील वरच्या हातात परशूचा दंड दिसून येतो, तर डावीकडील खालच्या हातात मोदकपात्र दाखवलेले आहे. मूर्तीच्या तुटलेल्या दोन हातांत पाश आणि अक्षमाला दाखवलेली असावी. याशिवाय मूर्तीच्या अंगावर सर्पयज्ञोपवितदेखील कोरलेले आहे. या मूर्तीला मागे प्रभावलय दाखवले असून त्याच्या कडेला असणाऱ्या मण्यांच्या नक्षीखेरीज त्यावर कोणतीही नक्षी नाही. नेहमीप्रमाणे गणेशाच्या मूर्तीत आढळते तसे या गणेशाच्या मूर्तीला धोतर नेसलेले दाखवले नसून अफगाणिस्तानातील तत्कालीन वेशभूषेनुसार तो गुडघ्यापर्यंत असलेला ‘पायजमा’ असावा असे वेरार्दी यांचे मत आहे. हा पायजमा मूर्तीच्या मागील बाजूनेही कोरलेला दिसून येतो. प्राचीन इराण, अफगाणिस्तानात असा पायजमा आणि शिवलेला अर्ध्या किंवा पूर्ण बाह्यंचा शर्ट घालण्याची पद्धत होती, हे तत्कालीन शिल्पं- चित्रांवरून तसेच नाण्यांवरून दिसून येते.

संगमरवरात कोरलेल्या शिव, दुर्गा इत्यादी हिंदू देवतांच्या मूर्तीदेखील अफगाणिस्तानात सापडल्या आहेत. या मूर्ती विशेषकरून इ. स. पाचव्या ते नवव्या शतकातील असाव्यात असे त्यांच्या शिल्पशैलीवरून लक्षात येते. या काळात अफगाणिस्तानात ‘शाही’ राजे राज्य करीत होते. त्यांच्या काळातच या मूर्ती निर्माण झालेल्या असाव्यात. अफगाणिस्तानातील या शाही राजांचे राज्य जरी मुख्यत: काबूल परिसरात असले तरी हिंदू आणि बौद्ध धर्माचा पगडा आणि त्यांचे अवशेष अफगाणिस्तानातील इतर भागांमध्येही सापडले आहेत.

या मूर्तीचा तीन भागांत विभागलेला मुकूटदेखील वैशिष्टय़पूर्ण आहे. असा तीन टोकं  असलेला मुकूट उत्तर गांधार (पाकिस्तानातील पेशावर भागातील प्राचीन राज्य) शिल्पकलेतील एक वैशिष्टय़ आहे. असा मुकूट काश्मीर, पाकिस्तान, अफगाणिस्तान या भागांत सापडणाऱ्या हिंदू आणि बौद्ध देवतांच्या प्राचीन शिल्पांमध्येही दिसून येतो.

अफगाणिस्तानात सापडलेल्या आणि वर उल्लेख केलेल्या काबूल महाविनायकाच्या मूर्तीचा मुकूटदेखील प्राचीन इराणी पद्धतीचा होता. हा मुकूट धातूच्या पत्र्याचा असून त्याच्या दोन्ही बाजूला लावलेल्या कापडी पट्टीने मस्तकाच्या मागील बाजूला बांधला जात असावा असे तत्कालीन चित्रांवरून व शिल्पांवरून दिसून येते. यामुळे अफगाणिस्तानातील या गणेशाच्या मूर्ती म्हणजे भारतीय हिंदू देवतेचे तेथील स्थानिक इराणी किंवा अफगाणी शिल्पकारांनी केलेले शिल्पांकन असावे हे लक्षात येते. या मूर्ती पूर्णपणे भारतीय वेशभूषेतील नाहीत. त्यामुळे भारतात निर्माण करून अफगाणिस्तानात नेलेल्या नाहीत हेही स्पष्ट होते.

डॉ. जिओवान्नी वेरार्दी यांना काबूलमधील बाजारात आढळून आलेल्या या गणेशमूर्तीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही सिंहावर बसलेली गणेशमूर्ती आहे! साधारणत: गणेशाचे वाहन उंदीर असते. परंतु इसवी सन बाराव्या ते चौदाव्या शतकात रचल्या गेलेल्या ‘मुद्गल पुराणा’त वर्णन केलेल्या गणेशाच्या ३२ रूपांपैकी ‘हेरंब’ हे रूप सिंहावर आरूढ झालेले दाखवले जाते. याशिवाय हेरंब या रूपातील गणपतीला दहा हात असतात. अर्थात मुद्गल पुराणाचा पुरावा या मूर्तीनंतरच्या काळातील असला तरी सिंह हे गणेशाचे वाहन म्हणून वापरले जाण्याचा प्रघात या शिल्पावरून दिसून येतो. याचाच परिपाक पुढे मुद्गल पुराणातील हेरंबरूपातील गणेश सिंहारूढ दाखवला जावा यात झाला असावा.

अफगाणिस्तानातील गणेशाच्या मूर्तीच्या शिल्पाच्या पीठावरील शिलालेखात उल्लेख केल्याप्रमाणे, ‘महाविनायका’ची मूर्ती किंवा छायाचित्रात दाखवलेली ही हेरंबाशी साम्य दाखवणारी सिंहारूढ मूर्ती या इ. स. पाचव्या ते नवव्या शतकातील मूर्तीच्या नावावर आणि रूपावर ‘गाणपत्य’ पंथाचा प्रभाव दिसून येतो, हे नक्की!

kanitkaranand@gmail.com