13 December 2019

News Flash

प्रत्यक्ष आणि भासातला अदृश्य आशय

काळाचाच विचार केला, तर लाखे साठोत्तरी कवितेच्या कालखंडातले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

दीपक घारे

प्रायोगिक रंगभूमीवरचे दिग्दर्शक म्हणून आज परिचित असलेले, पण त्याआधीपासून काव्यप्रकाराकडे तितक्याच गांभीर्याने पाहणारे कवी रवींद्र लाखे यांचे दोन संग्रह – ‘अवस्थांतराच्या कविता’ व ‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर’ अलीकडेच प्रकाशित झाले. ‘जिव्हार’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहानंतर जवळपास ३५ वर्षांनी हे संग्रह आलेले आहेत. नाटकासारख्या बहुरूपी मंचीय आविष्कारात व्यग्र असताना अंतर्मनात कविता त्यांच्या अस्वस्थतेला कसा आकार देत होती, त्याचा प्रत्यय या संग्रहांमधून येतो.

काळाचाच विचार केला, तर लाखे साठोत्तरी कवितेच्या कालखंडातले आहेत. परंतु त्यांची कविता कोणत्याही वाङ्मयीन प्रवाहात वा वादात बसवता येत नाही. तिला या सर्व आधीच्या आणि समकालीन प्रवाहांचं भान आहे. परंतु त्यांच्या कवितेची मुख्य प्रेरणा ही त्यांच्या स्वानुभवातून आणि अस्वस्थतेतून आलेली आहे. त्यांच्या कवितेच्या वेगवेगळेपणाला कारणीभूत असणारे तीन महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी सर्व कवितेला व्यापून उरणारा घटक म्हणजे – आयुष्यातल्या कडेलोटाच्या क्षणी साक्षात्कारासारखी जागी होणारी, सुरक्षित, सुरचित भ्रामक जगाआड दडलेली अज्ञात, अंध:कारमय पोकळीची भयकारी जाणीव. याला जोडूनच दुसरा एक घटक येतो, तो म्हणजे अवकाशाचा! कवी म्हणून लाखे यांना झालेली अवकाशाची व्यापक जाणीव स्तिमित करणारी आहे. तिसरा घटक आहे तो सर्जनाचं आणि जीवनाचं प्रतीक असलेल्या स्त्री प्रतिमांचा! आई आणि प्रेयसी यांची एकरूपता या प्रतिमांमध्ये आहे. या तीनही घटकांच्या आविष्कारातून जी कविता निर्माण होते ती एका संभ्रमित (Confused), सनातन प्रश्नांमध्ये गुरफटलेल्या कवीची!

चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या कवितेला अद्भुत आणि भव्य विश्वरचनेचं परिमाण होतं, तर पु. शि. रेगे यांची कविता सारे विरोधाभास पचवून एक आध्यात्मिक, परिपूर्ण रचनासौंदर्याची पातळी गाठते. लाखे यांची कविता या दोन ध्रुवांमध्ये कुठेतरी चाचपडणारी आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न कविता वाचून संपल्यानंतरही मनाला कुरतडत राहतात. प्रत्यक्ष आणि भास यांच्यामधला अदृश्य आशय जिवंत करण्याचा प्रयत्न करतात.

‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’मधल्या मनोगतात लाखे लिहितात, ‘कवी किंवा रंगकर्मी किंवा आणखी कुणी होण्याची महत्त्वाकांक्षा मला कधीच नव्हती. कारण आतमधली वादळं इतकी भयंकर होती नि आहेत, की त्यातून बाहेर पडणं किंवा ती समजून घेणं हे माझ्या जगण्यासाठी गरजेचं होतं. अजूनही आहे.’ ‘अवस्थांतराच्या कविता’मधल्या मनोगतात यालाच पूरक असं एक विधान येतं- ‘केव्हातरी ध्यानात बसलेलो असताना ध्यानातला प्रवास खूप पुढं गेला नि मी घाबरून ध्यानाबाहेर आलो. त्या प्रवासात काळ नव्हताच. आणि मग लक्षात आले, की काळाचा संदर्भ घेऊन कशाचाही अर्थ लावणे म्हणजे ती गोष्ट पृथक करणे होय.’ लाखे यांच्या आयुष्यात असे काही मोजकेच प्रसंग आले, की त्यात ते कोलमडून गेले. त्या अवस्थेतून बाहेर यायला कविताच त्यांच्या मदतीला आली. नाटक आणि कविता यांच्याकडे एक आत्मशोधाचं साधन म्हणूनच त्यांनी पाहिलं.

ज्ञात जगाची सुरक्षित चौकट मोडून टाकणाऱ्या आणि अज्ञाताच्या पोकळीतला शाश्वत अंधार दृग्गोचर करणाऱ्या कविता या संग्रहांमध्ये आहेत. एका कवितेत पुढील ओळी येतात –

‘वर्णू शकतो फक्त काळोखाचे अंग

त्याचा गडद वास

न झेपणारे दीर्घ श्वास

आणि स्वत:चाच भास

अर्थात

आपण नसण्याची खात्री’

आणखी एका कवितेत ‘माझ्यापुरता काळ म्हणजे एक भयाण खोरं’ अशी ओळ येते. तर ‘मी होतो अधांतर सांजप्रकाशासारखा/ प्रचंड भयानं’ असंही कवी सांगतो. ‘काळोख आणि बाई..’ अशीही एक कविता संग्रहात (‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर’) आहे. वास्तव आणि वास्तवाचा आभास, शारीर वासनांचं भौतिक जग आणि आदिम सामूहिक नेणिवेशी नाळ जोडणारं मन यांच्या ताणातून एक संभ्रमित अवस्था निर्माण होते. त्याचं कधी अतिवास्तव पद्धतीने, तर कधी आध्यात्मिक अंगाने, तर कधी खेळकर उपरोधिकपणाने ते या कवितांमधून शब्दबद्ध होतं.

या कवितांमधला दुसरा – लाखे यांच्या कवितांना वेगळी ओळख देणारा – महत्त्वाचा घटक आहे तो अवकाशाचा! अवकाश हा कलानिर्मितीमधला प्रत्यक्ष न दिसणारा, पण कलाकृतीला आकार देणारा सर्वात निर्णायक घटक आहे. साहित्यात तो विराम, विरामचिन्हे यांच्या रूपाने अस्तित्वात असतो; तर नाटक आणि चित्रकलेत तो अधिक स्पष्टपणे आणि विविध प्रकारे येतो. दृश्यकलेतील ही अवकाशाची जाणीव लाखे यांच्या कवितेमध्ये प्रकर्षांने दिसते. त्याचं एक कारण त्यांना नाटकाच्या प्रयोगक्षम शक्यतांची असलेली प्रगल्भ जाणीव, हे असू शकेल.

‘वास्टनेस’ (‘अवस्थांतराच्या कविता’) या कवितेत अवकाश थेटपणे आलेला आहे –

‘वास्टनेसला मी जाणवतो कधी कधी.

तेव्हा प्रचंड म्हणजे विश्वाएवढय़ा भयानं,

की विश्वापेक्षा प्रचंड भयानं पळून जावंसं

वाटतं.’

वास्टनेस म्हणजे असीमता, वास्टनेस म्हणजेच डेप्थ, वास्टनेस म्हणजे शरीराच्या अस्तित्वालाच गिळून टाकणारी पोकळी अशी अनेक अंगांनी त्याची व्याख्या होते. एकमेकांचं एकटेपण अबाधित ठेवणारा, ताट, वाटी, कपाट, कॉम्प्युटर अशा वस्तूंभोवती असणारा वास्टनेस ‘बेखबर’ (‘अवस्थांतराच्या कविता’) कवितेत येतो’. ‘अनंत’ (‘अवस्थांतराच्या कविता’) कवितेत अगणित क्षणांना जन्म देणारा अवकाश अनंतरूपाने येतो. ‘रेष’ (‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर’) कवितेत श्वास-नि:श्वासातला, दोन रेषांच्या विरामातला, जीवन-मरणातला संवेदना जिवंत करणारा अवकाशही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘आनंदजीन’ (‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर’) या कवितेत ‘जिवंत / सळसळते / अवकाश’ आलेलं आहे. यातली मिताक्षरी रचना प्रत्येक शब्दाभोवती विस्तारणारा, कधी एकमेकांना छेद देणारा विस्तीर्ण अवकाश घेऊन येतो. ‘मांजर’ (‘अवस्थांतराच्या कविता’) या कवितेत अवकाशाचे नेमके ज्ञान आलेलं आहे –

‘अवकाशाचे भान

फक्त काळाला असते

अवकाश कधीही विस्कटत नाही

आकार बदलत नाही.’

कारण अवकाश आणि अंधाराचे अस्तित्व कायमस्वरूपी आहे. प्रकाश किंवा जीवन क्षणक आहे. या निमित्ताने आकार – अवकाश यांचं नातं आणि त्याहूनही महत्त्वाचं काळ – अवकाशाचं नातं लाखे यांच्या कवितांमधून वारंवार येतं. काळाचं एकाच वेळेस भासणारं सूक्ष्म आणि व्यापक स्थूल रूप ‘बिंदू’ (‘अवस्थांतराच्या कविता’) या कवितेत आलेलं आहे. एका अर्थाने बिंदूत सामावलेल्या फिजिकल प्रॉपर्टीज त्यात येतात आणि ‘परिघाबाहेर जाण्याचा प्रयत्न सोडून/ मीच मटेरिअल व्हायला हवे’ ही आत्मभानाची जाणीवही! ‘काय माहीत’ (‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर’) कवितेत घडय़ाळ रंगवणाऱ्या माणसाच्या निमित्ताने घडय़ाळाच्या काटय़ातला बंदिस्त काळ आणि त्यापलीकडचा शाश्वत काळ दोन्ही आले आहेत.

लाखे यांच्या कवितेत तिसरा घटक अर्थातच स्त्री प्रतिमेचा आहे. आई आणि प्रेयसी किंवा आई आणि पत्नी यांची एकरूपता बऱ्याच वेळा येते. याचं कारण लाखे यांनी आईच्या गर्भाशयाचं नातं आदिम मातृत्वाशी आणि जन्मापूर्वीच्या आणि मृत्यूनंतरच्या आदिम अंधाराशी जोडलेलं आहे. ‘मेंदू’. ‘जगन्माता’, ‘जन्मदिवस/ दोन एप्रिल १९५३’ या अशा काही कविता आहेत. ‘आपण’ (‘अवस्थांतराच्या कविता’) ही अशीच एक प्रेमवासनेची सनातन ओढ व्यक्त करणारी कविता आहे. ‘निर्मळ’ (‘अवस्थांतराच्या कविता’) ही वरवर पाहता हलकीफुलकी वाटणारी, पण पुरुषी नजरेतली मलीनता टिपणारी अर्थपूर्ण कविता आहे.

खरं तर रवींद्र लाखे यांच्या कवितेची अधिक सविस्तरपणे आणि सखोलतेने समीक्षा व्हायला हवी. वर सांगितली ती वरवरची निरीक्षणे आहेत. त्यांच्या कवितेची मानसशास्त्रीय दृष्टीने किंवा आध्यात्मिक, तात्त्विक दृष्टिकोनातून समीक्षा करता येईल. पण त्यांच्यावर असे काही अर्थ लादण्यापेक्षा त्यांच्या अनुभवाचा अंत:स्वर त्याच निखळ पद्धतीने समजून घ्यायला हवा.

‘अवस्थांतराच्या कविता’, ‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर’ – रवींद्र दामोदर लाखे,

कॉपर कॉईन पब्लिशिंग प्रा. लि., दिल्ली,

पृष्ठे – अनुक्रमे १९६, १९२,

मूल्य – प्रत्येकी ३५० रुपये.

gharedeepak@rediffmail.com

First Published on November 11, 2018 12:10 am

Web Title: article about recently published poetry collection book
Just Now!
X