‘ग्रीक महाकाव्ये- महाकवी होमरकृत इलिअड व ओडिसी’ हा ग्रंथ ग्रीक महाकाव्यांचा काही प्रमाणात परिचय करून देईल, असे लेखिका स्मिता कापसे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये म्हटले असले तरी प्रत्यक्षात तो केवळ परिचय नसून, दोन पाश्चात्त्य आर्ष महाकाव्यांचा साद्यंत अभ्यास आहे. एकूण अकरा प्रकरणे, चाळीस उप-प्रकरणे, पाच परिशिष्टे असा हा तब्बल ३५७ पृष्ठांचा ग्रंथ वाचताना होमरच्या ‘इलिअड’ आणि ‘ओडिसी’ या दोन महाकाव्यांची बऱ्यापैकी ओळख असणाऱ्या वाचकाचीही दमछाक होण्याची शक्यता आहे. तशी ती महाभारताचे वाचन करतानाही होते. त्याचे कारण उघड आहे. घटना प्रसंगांची आणि परस्परांमधील संबंधांची विलक्षण गुंतागुंत प्रसंगी गोंधळवून टाकणारी ठरते. पण हेही खरे, की त्या गुंतागुंतीचे आकलन झाल्यानेच महाकाव्याचा समग्र, एकसंध अनुभव येऊ शकतो.

होमरच्या या दोन महाकाव्यांच्या मागे मोठा इतिहास आहे, असे सुरुवातीलाच सांगून लेखिका त्या इतिहासाचा मागोवा घेते. इ.स. पूर्व १९९० च्या सुमाराला ग्रीकांचे पूर्वज ग्रीसमध्ये आले. त्याच्या आधीपासून तिथे एक समृद्ध संस्कृती कशी अस्तित्वात होती त्याचा थोडक्यात उल्लेख लेखिका करते आणि प्रस्तुत दोन महाकाव्यांची मूळ कथानके त्या प्राचीन परंपरेमध्ये ओळखता येतात, असे स्पष्ट करते. श्रोत्यांना आधीच माहीत असलेल्या लोककथांच्या व पुराणकथांच्या प्रचंड संग्रहातून एकसूत्रात गुंफलेली, ऐतिहासिक भासणारी एक प्रदीर्घ वीरगाथा असे इलिअडचे स्वरूप असल्याचे सांगताना लेखिका एका मौखिक परंपरेकडे आपले लक्ष वेधते. पण त्याच बरोबर पुराणकथांमधील काही कथाभाग वगळून आणि मूळ पात्रांच्या व्यक्तिमत्त्वात काही बदल करून होमरने या रचना केल्या आहेत, हेही नोंदवते. आपल्या रामायण आणि महाभारतातील व्यक्तिरेखांसंदर्भात वेळोवेळी अतिहळवेपणा दाखविणाऱ्या संप्रदायाने हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

ग्रीक पुराणकथांमध्ये देवदेवता माणसांपेक्षा शक्तिमान असल्या तरी त्यांचे रूप आणि गुण या बाबतीत त्या माणसांच्या प्रतिकृती आहेत. त्या विकारवश आहेत आणि म्हणूनच माणसांच्या पंक्तीमध्ये त्या सहज येऊन बसतात, असेही कापसे यांनी म्हटले आहे. आपल्या  विधानाच्या पुष्टीसाठी त्यांनी उदाहरणही दिले आहे. ‘झ्यूस’ हा देवसम्राट कामुक असल्याचा संशय प्रत्यक्ष त्याच्या पत्नीला- ‘हेरा’ या देवसम्राज्ञीला होता आणि देवांनी केलेल्या फसवणुकीची व कपटाची उदाहरणे इलिअडमध्ये जागोजागी आहेत, असे लेखिकेने पुढे म्हटले आहे. कापसे यांच्या या निरीक्षणाच्या संदर्भात तबेरीअस या तत्त्वज्ञाच्या एका वचनाचा उल्लेख केला पाहिजे. देवदेवतांचा पुळका येऊन मोडतोड आणि जाळपोळ करू पाहणाऱ्या आपल्याकडील तथाकथित  संस्कृतिरक्षकांसाठी ते उद्बोधक ठरेल. तबेरीअसने म्हटले आहे, ‘‘देवांचा अपमान झाला असे वाटत असेल तर ते देवांनीच पाहून घ्यावे.’’

प्रसिद्ध ट्रोजन युद्ध हा इलिअडमधील एक प्रमुख विषय आहे. साहजिकच युद्धाविषयी सनिकांनी व्यक्त केलेल्या भावनेची दखल या ग्रंथामध्ये घेतलेली दिसते. एक सैनिक त्याच्या सहकाऱ्याला म्हणतो, ‘‘आपण सैनिक युद्धात दुय्यम असतो. जी काही कीर्ती-अपकीर्ती मिळते ती नेत्यांना, अनुयायांना नाही. ट्रॉय नगरी आपण जिंकली तरी यशश्री जशी अगॅमेम्ननला मिळेल तशी आपला पराभव झाला तर दुष्कीर्ती त्याच्याच पदरी येईल.’’ होमर किंवा त्याची दोन महाकाव्ये माहीत असोत वा नसोत, ‘हेलन ऑफ ट्रॉय’ ही मूर्तिमंत सौंदर्यवती होती हे जगभर माहीत आहे. मेनेलॉस या तिच्या पतीपासून तिला पॅरिसने पळवून नेल्यानंतर मेनेलॉसची प्रतिक्रिया बोलकी होती. तो म्हणाला, ‘‘मनुष्याला झोप, प्रेम, गाणे, नृत्य यापैकी काहीतरी खूप हवे असते व कोणत्याही मनुष्याला युद्धापेक्षा याच सर्व गोष्टी हव्याशा असतात.’’ आणि एक सैनिक म्हणतो, ‘‘युद्ध म्हणजे कीर्तीसाठी लढणे, पण युद्ध ही दु:खदायक गोष्ट आहे.’’ सहस्रावधी वर्षांचे अंतर ओलांडून ही महाकाव्ये व त्यातल्या व्यक्तिरेखा आताच्या जागतिक पर्यावरणाशी कसे नाते सांगतात, हे केवळ या दोन उद्धृतांवरूनही स्पष्ट व्हावे.

तीन हजार वर्षांपूर्वी झालेल्या ट्रोजन युद्धाचे वर्णन इलिअडमध्ये आले आहे. अर्थातच तत्कालीन युद्धनीतिचे उल्लेख त्यामध्ये आहेत. कापसे यांनी त्यांचीही दखल घेतली आहे. ‘शक्तीला युक्तीची जोड असली पाहिजे, आपापसांतील भांडणाने शत्रूचा फायदा होतो, आक्रमकता नेहमी योग्य नाही, कधी माघार घेणेही यशस्कर असते. निरपराधांची जीवितहानी टाळण्यासाठी पडती बाजू असणाऱ्याने तहाच्या वाटाघाटी कराव्यात. राजदौत्य करायला आलेल्या दूतांना सन्मानाने वागवावे.’ तत्कालीन युद्धनीती किती प्रगत झाली होती, याची पुरेशी कल्पना देणारे हे उल्लेख होत.

ट्रोजन युद्ध झाले ते मुख्यत: हेलनच्या पुन:प्राप्तीसाठी. त्या युद्धामध्ये अद्वितीय पराक्रम केला तो इथाका राज्याच्या ओडिससने. प्रसिद्ध ‘ट्रोजन हॉर्स’ची युक्ती त्याचीच. युद्धामध्ये विजय मिळवून ओडिसस परतीच्या प्रवासाला निघाला असताना देवसम्राट झ्यूसने त्याच्या मार्गामध्ये असंख्य विघ्ने निर्माण केली. होमरचे दुसरे महाकाव्य ओडिसी म्हणजे इलिअडचा उत्तरार्ध असून त्यामध्ये ओडिससच्या परतीची कथा आहे, अशी पाश्र्वभूमी स्पष्ट करून लेखिका त्या कथेचे विस्तृत निवेदन करते. ओडिसीमधील पुराणकथा व लोककथांचा मागोवा घेते. तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णन करते. इतकेच नाही, तर तत्कालीन आतिथ्य कल्पनेचे दाखले काही प्रसंगांची साक्ष काढून देते.

ट्रॉयचे शेकडो वर्षे सुरू राहिलेले युद्ध, अखेरीस ट्रॉय नगराचा पाडाव आणि विजेत्या ओडिससचा परतीचा प्रवास, असे या दोन महाकाव्यांमधील मुख्य कथासूत्र असले तरी त्याच्या अंतर्गत असंख्य उपकथानके आहेत. त्यामध्ये अगणित देवदेवता आहेत, शेकडो वीर पुरुष आहेत आणि कित्येक प्राणी-पक्षीही आहेत. वास्तव आणि अद्भुत यांची अखंड सरमिसळ त्यामध्ये आहे. ते सगळे लेखिकेने या ग्रंथामध्ये सविस्तर निवेदन केले आहे.

ते आकर्षक वाटले तरी, एक तर ते भारतीयांना अपरिचित आहे आणि म्हणून त्यातील गच्च तपशिलामध्ये स्वारस्य वाटेलच असे नाही. त्याला काही प्रमाणात स्वत: लेखिकाही कारण आहे. ज्या अनेक ग्रंथांचे साहाय्य लेखिकेला झाले आहे त्यामध्ये जेस्पर ग्रिफिन यांच्या ‘होमर- दि इलिअड (अ स्टुडंट गाईड)’ या ग्रंथाचा उल्लेख लेखिकेने वेळोवेळी केला आहे. पण लेखिकेचा ग्रंथ वाचताना प्रकर्षांने जाणवते, की जेस्पर यांच्या ग्रंथामधील खूपशा मजकुराचा थेट मराठी अनुवाद त्यांनी आपल्या समोर ठेवला आहे. जेस्पर ग्रिफिन यांच्या ग्रंथामधील पृष्ठांचे त्यांनी दिलेले संदर्भ तेच दर्शवितात. संदर्भ असे आहेत : पृष्ठे ६० ते ६६, ७१ ते ७४, ७४ ते ७८ आणि ७८ ते ८४.  शिवाय अनेक वाक्यांचे इंग्रजी वळण पाहता, लेखिका अनुवादाचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्टच दिसते. वानगीदाखल ही काही वाक्ये : १) ‘मग्रूर व नमते घेण्यास तयार नसलेला निरोप..’(पृष्ठ १९२), २) ‘युद्धाला विरोधी असलेल्या ट्रॉयमधील ढासळणाऱ्या कौटुंबिक जीवनात आणि मृत्यूचे थमान असलेल्या युद्धाच्या धुमश्चक्रीत शांतता व निसर्ग यांच्या उपमांनी क्षणिक विसावा व पुनस्र्मरण देऊन सौजन्याचे शत्रूप्रती निरपेक्ष औदार्याचे कार्य दुहेरी पातळीवर चालत असते.’ (पृष्ठ १९४), ३) ‘तीव्र दृष्टिक्षेप आणि व्यापक धारणा या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणे ही असामान्य गोष्ट आहे.’.. इंग्रजी वळण असलेली आणि अर्थबोध न होणारी अशी अनेक वाक्ये या ग्रंथामध्ये आहेत.

मुळामध्ये एक अगदी संपूर्ण अनोळखी संस्कृती, कथानक आणि उपकथानके यांची भाऊगर्दी,  देवदेवता आणि स्त्री-पुरुषांची प्रचंड संख्या, त्यांची सर्वस्वी अनोळखी नावे, वास्तव आणि अद्भुताची सरमिसळ- असा दोन पाश्चात्त्य आर्ष महाकाव्यांचा ऐवज मराठी वाचकांसमोर ठेवताना स्मिता कापसे यांनी तो अधिक सुटसुटीत आणि सुबोध करण्याचा प्रयत्न तरी करायला पाहिजे होता. पण म्हणून त्यांनी नेटाने केलेल्या या अभ्यासाचे मोल कमी होत नाही. एक सज्जड संदर्भग्रंथ म्हणून त्याचे एक स्वतंत्र महत्त्व आहेच.

  • ‘ग्रीक महाकाव्ये – महाकवी होमरकृत
  • इलिअड व ओडिसी’- स्मिता कापसे,
  • मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
  • पृष्ठे- ३६२, मूल्य- रु. ४००.

माधव वझे