News Flash

नवउद्यमींसाठी कल्पकनामा!

‘जुगाड’ म्हणजे ‘लो कॉस्ट इन्व्हेन्शन अ‍ॅण्ड इनोव्हेशन्स’!

‘जुगाड’ म्हणजे ‘लो कॉस्ट इन्व्हेन्शन अ‍ॅण्ड इनोव्हेशन्स’! ‘जुगाड’ हा हिंदी बोलीभाषेतला एक शब्द आहे आणि त्याचा साधारण अर्थ ‘निकड भागवण्यासाठी सहज, सोप्या पद्धतीनं आणि हुशारीनं केलेलं कल्पक संशोधन’! आणखी सोपं करून सांगायचं तर- अत्यंत विपरीत परिस्थितीतही संधी शोधून काढण्याची आणि हाताशी उपलब्ध असलेल्या साध्यासुध्या साधनसामग्रीसह पुढे उभ्या ठाकलेल्या समस्येचा धाडसानं सामना करण्याची कला. थोडक्यात, कमतरतेकडून विपुलतेकडे जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच ‘जुगाड.’ ‘इनोव्हेशन्स’ म्हणजे नवीनतम औद्योगिक उत्पादन क्षेत्र विकसित करून त्याचा व्यापारी लाभ मिळवण्याची जी प्रक्रिया उद्योग क्षेत्रात अनेक वर्षे आणि भारतात- विशेषत: गेली तीन वर्षे चर्चेत आहे, त्यात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘जुगाड’ हे संध्या रानडे यांनी अनुवादित केलेले पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.

‘आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या असंख्य समस्या काटकसरीने सोडवण्यासाठी केलेल्या कल्पक उपाययोजना म्हणजे जुगाड संशोधन’ ही यामागची संकल्पना आहे. एकविसाव्या शतकात विकास साधण्यासाठी भारत आणि भारतासारख्या इतरही देशांमधील व्यापारी कंपन्यांनी साचेबद्ध संशोधनाच्या पलीकडे जाऊन काटकसर, लवचिक मानसिकता आणि अंत:प्रेरणा यांचा कसा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे, हा मुद्दा या पुस्तकात अधोरेखित केला गेला आहे.

‘इन्व्हेन्शन्स’ आणि ‘इनोव्हेशन्स’ म्हणजे नवीनतम असे काही विकसित करणे आणि त्यातून व्यावसायिक विकास साधणे, हे उद्योग क्षेत्रात आता गरजेचे होऊन बसले आहे. इन्व्हेन्शन्स आणि इनोव्हेशन्समुळे यशस्वी झालेल्या अनेक उद्योजकांची उदाहरणे या पुस्तकात देण्यात आलेली आहेत. उद्योजकांसाठी केवळ आर्थिकच नव्हे, तर तांत्रिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय बाबींचा विचार करणेही कसे आवश्यक आहे यावर पुस्तकात प्रकाश टाकला गेला आहे. साचेबद्ध पारंपरिक दृष्टिकोन आणि बाजारपेठेला अनुकूल इन्व्हेन्शन्स आणि इनोव्हेशन्सवर आधारित नवा दृष्टिकोन यांचे पुस्तकात विवेचन केलेले आहे. उद्योग-व्यवसायात येणारी संकटे, संधी आणि बाजारपेठेतील आव्हाने सकारात्मक दृष्टीच्या साहाय्याने कशी पेलता येतील याचे दिशादर्शन पुस्तकात आहे. उदा. खर्च कमी करणे, पुनर्वापर करणे, कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त परतावा मिळवणे, विपणन आणि ब्रॅन्डस् यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा सक्षम वापर करणे, इत्यादी.

भारतासारख्या विकसनशील देशांबरोबरच पुढारलेल्या देशांच्या व्यावसायिक विश्वाबद्दलचीही विस्तृत माहिती या पुस्तकात मिळते. सध्याच्या आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात कंपन्यांनी त्यांच्या साचेबद्ध आणि अत्यंत महाग अशा ‘आर अ‍ॅन्ड डी’ पद्धतीला जुगाड संशोधनाच्या अधिक लवचिक, काटकसरी आणि अंत:प्रेरणेला प्रमाण मानणाऱ्या मनोवृत्तीची जोड देणे गरजेचे आहे; अन्यथा बदलत्या परिस्थितीत त्यांचा निभाव लागणं कठीण आहे हे त्यांनी ओळखायला हवे. यासाठी पुस्तकात सहा तत्त्वांवर आधारित सुसंगत पद्धतीचा अवलंब करण्यास सुचविले आहे. ती तत्त्वे अशी- १) विपरीत परिस्थितीतही नव्या संधीचा शोध घेणं. २) कमतरतेतून विपुलता निर्माण करणं. ३) विचार आणि कृती यांच्यात लवचिकपणा ठेवणं. ४) साधेपणा जपणं. ५) वंचितांना स्वत:च्या व्यवसायात सामावून घेणं. ६) स्वत:च्या मनाचं ऐकणं.

भारताने आपली उत्पादनं आणि सेवा यांचा दर्जा सुधारणं कसं गरजेचं आहे आणि हे सर्वच बाबतीत तातडीनं केलं जाणं कसं आवश्यक आहे, हा मुद्दाही पुस्तकात अधोरेखित केलेला आहे. ‘आर अ‍ॅण्ड डी’ म्हणजेच संशोधन हा विषय भारताच्या वाटचालीत अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. पारंपरिक चौकटीत अडकून न राहता त्यापलीकडे जाऊन काम करण्याची गरज आहे. हे व्हायचे असेल तर त्यासाठी नव्या संशोधन पद्धतीची गरज आहे, अशी मांडणी यात केली गेली आहे. मोठय़ा आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांच्या अफाट ताकदीचा भारतीय उद्योजक कसा सामना करू शकतील, याचे सोदाहरण विवेचनही यात आहे. अनुवादित असल्यामुळे पुस्तक वाचताना सलगता अनुभवता येत नसली, तरी संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या साहाय्याने उद्योग-व्यापारात यशस्वी होऊ पाहणाऱ्या नवउद्यमींसाठी हे पुस्तक नक्कीच संग्राह्य़ आहे.

  • ‘जुगाड’, मूळ लेखक- नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहुजा,
  • अनुवाद- संध्या रानडे,
  • मनोविकास प्रकाशन,
  • पृष्ठे- ३७४, मूल्य- ३५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:34 am

Web Title: articles in marathi on jugaad innovation
Next Stories
1 चटकदार कोशिंबीर
2 इतिहासाचा कच्चा खर्डा
3 शरदकाका
Just Now!
X