अलीकडेच स्वामी विज्ञानानंद (पु. रा. भिडे) यांच्या १९९२-९३ सालच्या ‘मनशक्ती’ दीपावली विशेषांकातले तीन लेख वाचले. ‘लता मंगेशकर यांच्या आवाजावरचे पाच विलक्षण प्रयोग’ या लेखातून बरीच माहिती मिळाली. लताजींच्या आवाजातली दहा मिनिटांची ‘मालकंस’ रागातल्या गायनाची एक फिल्म पु. रा. भिडे यांच्या ‘टॉपिक’ या संस्थेने १९५० च्या आसपास बनवली होती. ‘टॉपिक’ म्हणजे ‘थिएटर ऑफ प्रोपगंडा अ‍ॅण्ड कल्चर’- ‘संस्कृती प्रचार प्रकल्प’! अनेक विषयांवरच्या तीसेक छोटय़ा फिल्म्स त्यांच्या या संस्थेने समाजप्रबोधनासाठी तयार केल्या होत्या. संगीतात लताजींच्या मालकंसप्रमाणेच हिराबाई बडोदेकरांचा राग ललत आणि बिस्मिल्ला खान यांचं सनईवादनही छोटय़ा फिल्म्समध्ये चित्रित केलं गेलं होतं. काळाच्या फार पुढं असलेल्या एका द्रष्टय़ा माणसाचं भव्य स्वप्न होतं ते. पण व्यवहाराची जोड नसल्यानं हे काम मागं पडलं. या सगळ्या फिल्म्स आणि निगेटिव्हज् नीट राखून ठेवण्याकरिता फेमस सिने लॅबोरेटरीकडं संस्थेनं दिल्या होत्या. १९५३ साली या फिल्म्स आणि निगेटिव्हज् आगीत जळून गेल्या असं ‘फेमस कंपनी’नं भिडे यांना कळवलं. ते पत्रही या लेखासोबत छापलं आहे. पुढं त्यांचाही या विषयातला रस कमी झाला. पण ‘प्रयोग’ मात्र सुरूच होते.

यातल्या लताजींच्या फिल्मचा दहा मिनिटांचा साऊंड ट्रॅक त्यांच्याकडं टेपवर उतरवून ठेवला होता. तो त्यांनी अभ्यास आणि प्रयोगासाठी वापरला. या तीन लेखांत त्यांच्या प्रयोगांचे निष्कर्ष दिले आहेत. हा मालकंस ऐकवून अनेकांच्या वेदना (पाठदुखी, पोटदुखी, दाढदुखी, इ.) शमवता आल्या. सरकारी गोशाळेतील गाईंना मालकंस ऐकवला. त्यामुळे दूध वाढलं नाही, पण गाईंच्या हालचालींत तीव्रता आली. वनस्पती आणि गव्हाच्या शेतावरच्या प्रयोगासाठी मूळ लेखच वाचायला हवेत. त्याविषयीचं मत आपलं आपण बनवलेलं बरं. आजच्या परिभाषेतील ‘म्युझिक थेरपी’ तथा संगीतोपचारासंबंधीचे ते पहिलेवहिले प्रयोग होते. पण ही फिल्म चित्रित होत असताना त्यांना आलेला अनुभव असा.. ‘‘ती करुण गंभीर स्वरांची रात्र अजुनी आठवते. ‘पीर ना जानी’ या चीजेतून मालकंस साकार होत होता. फिल्मचे चित्रण चालू असताना लताताईंच्या शामलतेज मुखापलीकडे डाव्या बाजूला प्रकाशाचे छोटे झोत दिसायला लागले. एक नव्हे, तीन. पुन्हा पुन्हा डोळे चोळून खात्री करून घेतली. मालकंस वातावरणात जसा नादधुंद होत होता तशा त्या तिन्ही छटा कमी-जास्त उंचीच्या होत होत्या. त्यांचा बेमालूम एकोपा लक्षात येऊ लागला. त्या तीन प्रकाशांचे निरनिराळे पंख वेगवेगळ्या रंगाचे होते आणि नव्हतेही. ते तीन रंग एकच झाले; आणि झालेही नाहीत. माझी मती चालेना. पण त्या दिवशी माझी दाढ दुखत होती ती थांबली. एकाएकी थांबली. त्या दिवशीची ती माझी श्रवणसमाधी मालकंस संपण्याच्या सुमारास उतरली. मालकंस पुरा झाल्यावर बोलणे निघाले तेव्हा ‘मी मनापासून गायले..’ असं लताजी म्हणाल्या.’’

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

लताजींच्या छायाचित्रात मेंदूतून प्रकाशलहरी बाहेर पडताहेत असे फोटो लेखासोबत छापले आहेत. पुढं या सगळ्यातून बाहेर पडून पु. रा. भिडे वेगळ्या मार्गावर गेले. लोणावळा येथे ‘न्यू वे आश्रम’ स्थापन करून मनाच्या अफाट शक्तीवर त्यांनी मोठं काम सुरू केलं. ‘स्वामी विज्ञानानंद’ या नावानं ते वावरू लागले. त्यांच्या पश्चात ‘मनशक्ती’चं काम जोमानं चालू आहे आणि आधुनिक काळात त्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.

पंचवीस वर्षांपूर्वीचे काहीसे पसरट आणि अनेक ठिकाणी भरकटत गेलेले हे तीन लेख मिळवून अवश्य वाचावेत असेच आहेत. यातला तिसरा लेख भिडेंनी ४ नोव्हेंबर १९९३ रोजी पूर्ण केला आणि १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मुंबईत मंत्रालयासमोरच्या उंच इमारतीच्या गच्चीवरून झोकून देऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं. त्याला ‘स्वामीजींनी प्रकाशसमाधी घेतली’ असं तिसऱ्या लेखाच्या शेवटी म्हटलेलं आहे.

साधारण २००३ च्या सुमारास एका संग्राहक मित्रानं एक डीव्हीडी पाठवली. त्यालाही ती अशीच कुठूनतरी मिळाली होती. त्यात दोन फोल्डर्स होते. दोन्हीत लता मंगेशकरांच्या आवाजातला ‘मालकंस’! बरोब्बर दहा मिनिटांचा! एक ऑडिओ, तर दुसरा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट व्हिडीओ. ‘पीर ना जानी’ ही चीज. अधाशासारखी फिल्म कॉम्प्युटरवर अनेक वेळा बघितली. मंचावर मध्यभागी विशीतल्या लता मंगेशकर तानपुरा पुढय़ात घेऊन आणि लांबसडक वेण्या दोन्ही खांद्यावरून पुढं सोडून गायला बसलेल्या. मागं पडद्यावर भलंमोठं चंद्रबिंब आणि दोन तानपुरे तिरपे.. नेपथ्यासाठी. साथीला उजवीकडं सारंगी आणि डावीकडं तबलावादक. दोघंही धोतर नेसलेले आणि काळा कोट घालून वाजवताना दिसत होते. गायिकेसमोर काहीसा उंचावर एक मायक्रोफोन. तिघांसाठी एकच. एकच कॅमेरा वापरून समोरून केलेलं चित्रण. चेहरे काहीसे आऊट ऑफ फोकस. पण आवाजाचं मुद्रण स्वच्छ आणि स्पष्ट. अगदी शेवटी गाणं संपल्यावर ‘कट इट’ असं ओरडल्याचा आवाज आणि एका तरुणाचं मंचाच्या कडेवरून एका अंगावर लुढकणं आणि डावा हात वर करून दाद देणं. हा तरुण अगदी क्षणभरच दिसतो. म्हणून फ्रेम स्थिर करून बघितलं. शर्ट-पँट, वर स्वेटर, गळ्यात मफलर, हातात घडय़ाळ आणि डोक्यावर काळे कुरळे केस. कोण असेल बरे हा? अनेकांना फिल्म दाखवून विचारलं. पण कुणालाच काही कळेना. फिल्ममधल्या सारंगीवादकाचा चेहरा ओळखीचा वाटला म्हणून नीट बघितला तर तरुणपणीचे होतकरू सारंगीवादक रामनारायण असावेतसे वाटले. काही वर्षांपूर्वी ते त्यांच्या १९५५ च्या आसपास मुद्रित केलेल्या ७८ गतीच्या सारंगीच्या रेकॉर्डस् पाहण्यासाठी आणि ऐकण्याकरता माझ्या घरी आले होते. ती ओळख काढून त्यांच्याशी बोललो. फिल्म बघून त्यांच्याही आठवणी जाग्या झाल्या. ‘‘वो नौजवान तो हमारे अन्नासाब चितलकर है, जिनको लोग सी. रामचंद्र नाम से जानते है,’’ म्हणाले. ‘‘त्यांनीच तर फिल्म बनवून घेतली होती. आणि फेमस स्टुडिओमध्ये वसंतराव जोगळेकरांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरण झालं होतं. मालकंसच्या ‘पीर ना जानी’ची तालीम मीच तर लताबाईंना दिली,’’ असं ते म्हणाले. तबल्यावर कोण आहेत, हे मात्र त्यांना प्रयत्न करूनही आठवेना. कुणी भिडे नावाचे कोट, टोपी घातलेले गृहस्थ बरीच धावपळ करीत होते, हे मात्र त्यांना आठवलं.

या माहितीचा पाठपुरवठा करताना अण्णांच्या १९७७ च्या ‘माझ्या जीवनाची सरगम’ या पुस्तकात काही सापडतंय का, ते बघायचं ठरवलं. ते दुर्मीळ होऊनही बराच काळ झाला. पण खूप तपास केला तेव्हा ते मिळालं. हे दोनशे पानी पुस्तक आहे. एखाद्या संगीतकारानं स्वत:विषयी लिहिण्याचा फारच दुर्मीळ योग यात जुळून आलेला आहे. अर्थात अण्णा आठवणी सांगत गेले आणि कुणी जाणकार महाकवी वा लेखकानं त्याचं आटोपशीर असं शब्दांकन केलेलं आहे. आजच्या परिभाषेत बोलायचं तर अगदी नको इतकं ‘पारदर्शी’ असं. त्यात अण्णा सांगतात, ‘‘प्रथमच भगवाननं अण्णासाहेब चितळकरांच्या जागी सी. रामचंद्र असं माझं नाव पडद्यावर दाखवलं होतं. ‘अलबेला’चे दिवस होते ते. ‘धीरे से आजा री अखियन में’ ही लोरी चांगलीच गाजत होती. राजेंद्र कृष्ण, लता मंगेशकर यांचा आणि माझा स्नेह ही एक हेवा करण्यासारखी गोष्ट होती. अशा काळातच एक अनोळखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. गोरटेलासा रंग. मध्यम उंची. शुद्ध खादीचा पेहराव. बोलणं अत्यंत आर्जवी आणि गोड. वागण्याची पद्धत सुसंस्कृत वळणाची. बोलताना दोन्ही ओठ पुढं काढण्याची प्रेमळ लकब. माणूस मोठा हुशार वाटला. त्यानं आपण होऊनच आपलं नाव सांगितलं, ‘मी. पु. रा. भिडे’.

भिडय़ांनी कसली तरी योजना आणलेली होती. भारतातल्या सुविख्यात शास्त्रीय गायिकांची गायकी ध्वनिमुद्रित आणि चित्रित करण्याची त्यांची कल्पना होती. सोळा मिलिमीटर्सच्या अशा फिल्म्स खास थिएटर्समध्ये देशभर दाखवावयाची त्यांची मनीषा होती. त्यासाठी ते एक संस्था स्थापन करीत होते. त्यात मी सहभागी व्हावे अशी त्यांची विनंती होती. नाकारण्यासारखे काहीच नव्हते. मी होकार दिला. त्यांनी हलकेच सूचना केली, ‘लताबाईदेखील या योजनेत साह्य़भूत होतील तर बरे.’ कसलाही विचार न करता मी त्यांना सांगितले, ‘त्याही येतील.’ भिडय़ांच्या त्या कामात मी फार लक्ष घातले. स्वत:चे एक हजार रुपये त्यांना देऊन टाकले. लतानेही दिले. संस्थेची उभारणी झाली. अध्यक्ष : लता मंगेशकर,  सेक्रेटरी : सी. रामचंद्र आणि पु. रा. भिडे. कार्याला आरंभ झाला. आम्ही आपल्या उद्योगात होतो. भिडे आपल्या उद्योगात. मध्येच केव्हातरी घाईघाईने येत आणि माझी सही घेत. लताची स्वाक्षरी घेत. ती म्हणे आपल्या मीटिंग्जची मिनिटस् आहेत. मी कशाला वाचून बघतो? यातली एक सही माझ्या फार अंगावर आली. लतालाही फार मन:स्ताप झाला. ते प्रकरण योग्य वेळी येईल.’’

काय होतं ते प्रकरण? नेमकं काय घडलं ते जाणून घेण्यासाठी सी. रामचंद्र यांचं पुस्तक मिळवून वाचायला हवं. पण या मालकंस रागाच्या चित्रणाविषयी त्यात काहीच माहिती नाही. केवळ दोनच वाक्ये : ‘‘लताचा आवाज तर साऱ्या वातावरणात दुमदुमत होता. त्याचे प्रत्यक्ष दर्शन पडद्यावर घडवावे, ही भिडय़ांची इच्छा होती.’’ लताजींवरील उपलब्ध लिखाणात प्रस्तुत लेखकाला तरी या फिल्मविषयी काहीच माहिती अद्याप तरी मिळालेली नाही.

३० सप्टेंबर २०१०. मालकंस रागातली लता मंगेशकरांची ती व्हिडीओ आभासी विश्वातल्या ‘यूटय़ूब’वर अवतरली. संग्राहक भरत उपाध्याय यांनी ती अपलोड केली होती आणि आजवर सात वर्षांत २,३७,७५७ जणांनी ती बघितली असून, २०६ जणांनी प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. त्या मुळातूनच वाचाव्यात अशा आहेत. २०११ मध्ये आणखी एका नेटकरानं ती पुन्हा वितरित केली. २०१४ मध्ये आणखी एकानं उत्तम व्हिडीओ एडिटिंग करून फिल्म अधिक स्वच्छ दिसेल असा प्रयत्न केला आहे. मात्र, या तिन्ही व्हिडीओमधून अगदी शेवटी दिसणारे अण्णा- म्हणजे सी. रामचंद्र मात्र गायब आहेत. दुर्दैव त्यांचं आणि आपलंही. म्हणजे ‘फेमस’च्या गोदामात जळून गेलेल्या तीसपैकी ही एक फिल्म वाचली होती तर! आणखीनही फिल्म्स कुठं कुठं उद्धाराची वाट बघत पडून असाव्यात. भिडय़ांचं स्वप्न इतक्या वर्षांनी असं साकार झालं म्हणायचं!

सुरेश चांदवणकर

chandvankar.suresh@gmail.com