बापूराव नाईकांनी मध्यवर्ती शासकीय मुद्रणालय, पाठय़पुस्तक निर्मिती मंडळ अशा विविध ठिकाणी उपसंचालक, नियंत्रक म्हणून काम केलं. परंतु त्यांची खरी ओळख आहे ती ‘टायपोग्राफी ऑफ देवनागरी’ या त्रिखंडात्मक मुद्राक्षरकलेवरील ग्रंथाचे लेखक म्हणून. बापूरावांना भाषातज्ज्ञ, लिप्यांचे अभ्यासक, मुद्राक्षरांचे संकल्पन करणारे डिझाइनर अथवा इतिहासकार अशा कोणत्याही एका विशिष्ट कप्प्यात बंदिस्त करता येत नाही. परंतु त्यांचं विविधांगी व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय कौशल्य यामुळे १९७० आणि ८० च्या दशकांत त्यांचा मुद्रणक्षेत्रावर फार मोठा प्रभाव होता.

हा कालखंड संक्रमणावस्थेचा होता. महाराष्ट्र राज्याची स्थापना नुकतीच झाल्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचं वातावरण होतं. मुद्राक्षरकला आणि मुद्रण या क्षेत्रात खिळ्यांच्या साहाय्याने मजकुराची जुळणी करण्याची पद्धत इतिहासजमा होण्याच्या मार्गावर होती. ‘लाइनोटाइप’ आणि ‘मोनोटाइप’ या मुद्राक्षर जुळणीच्या नव्या तंत्रज्ञानांवर आधारित पद्धती प्रचलित झाल्या होत्या. ‘फोटोटाइपसेटिंग’ ही ऑफसेट मुद्रण पद्धतीला सोयीस्कर असणारी पद्धत येऊ घातली होती. डिजिटल पद्धतीने संगणकावर अक्षरजुळणी करण्याची पद्धत यायला अजून एक ते दोन दशकांचा अवधी होता. या संक्रमणाच्या काळात बापूरावांनी त्यांना समकालीन असलेल्या भाषा अभ्यासक आणि मुद्रणतज्ज्ञांकडून माहिती जमवली. या अभ्यासकांमध्ये अ. का. प्रियोळकर आणि ल. श्री. वाकणकर यांचा समावेश होता. या सर्व व्यासंगातून बापूरावांनी लिपी आणि मुद्राक्षरांच्या विकासाचा एक समग्र इतिहास लिहिला. भारतीय लिप्यांच्या मुद्राक्षरनिर्मितीसाठी त्याचा फार मोठा उपयोग झाला.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

‘टायपोग्राफी ऑफ देवनागरी’ हा खरं तर एक मोनोग्राफ अथवा समितीचा अहवाल असणार होता. महाराष्ट्र राज्य शासनाने टाईपराइटर आणि मुद्राक्षर जुळणी यंत्रांच्या की-बोर्डचे प्रमाणिकरण करण्यासाठी नेमलेल्या समितीचे बापूराव सदस्य होते. बापूराव या प्रश्नाच्या मुळापर्यंत गेले आणि या अहवालाचं रूपांतर लिपीशास्त्र आणि मुद्राक्षरनिर्मितीचं तंत्रज्ञान सांगणाऱ्या एका संशोधनात्मक ग्रंथात झालं. बापूरावांच्या ग्रंथाचं महत्त्व सांगण्यासाठी त्यातील फक्त दोन मुद्दय़ांचा उल्लेख पुरेसा आहे.

त्यापैकी एक आहे तो अशोकपूर्वकालीन ब्राह्मी लिपीचा. भारतीय भाषांच्या लिप्यांचा उगम ब्राह्मी लिपीतून झालेला आहे. या सर्व लिप्यांना जोडणारा समान दुवा म्हणजे ध्वनिचिन्हांवर आधारित अक्षररचना. माहेश्वरी सूत्र, पाणिनीने केलेलं अक्षरांचं उच्चारानुसारी वर्गीकरण, मात्रांच्या आधारे व्यंजनांना स्वरचिन्हे जोडण्याची पद्धत, जोडाक्षरे ही वैशिष्टय़े सर्व भारतीय लिप्यांमध्ये समान आहेत. त्यांचे भरपूर पुरावे आणि नमुने बापूरावांच्या पुस्तकात आहेत. या ज्ञानाचा फायदा पुढे ल. श्री. वाकणकर आणि डॉ. एस. पी. मुदूर यांनी संगणकावर देवनागरी लिपी आणली तेव्हा झाला.

बापूरावांच्या पुस्तकातील दुसरा मुद्दा होता तो लिपीसुधारणेच्या चळवळीचा. लिपीसुधारणेच्या चळवळीमागे मुख्य उद्देश होता तो उपलब्ध जुळणी यंत्रांवर देवनागरी अक्षरजुळणी करता यावी यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांचा. अक्षरसंख्या कमी करणे, स्वरचिन्हे, मात्रा लिहिण्याच्या पद्धतीत बदल करणे अशा स्वरूपाच्या या सुधारणा होत्या. प्रत्यक्षात या सुधारणांचे स्वरूप तडजोडी करणे असेच राहिले आणि देवनागरी मुद्राक्षरांच्या रचनेतले सौंदर्यही काही प्रमाणात हरवले. देवनागरी लिपीची तंत्रज्ञानाशी सांगड घालताना येणाऱ्या अडचणींची बापूरावांना पूर्ण कल्पना होती. १९८० मध्ये फोटोटाईप सेटिंगसाठी क्वाड्रिटेक कंपनीकरिता ‘शारिवा देवनागरी’ हा मुद्राक्षर संच करताना बापूरावांनी या ज्ञानाचा उपयोग करून घेतला.

बापूरावांनी आणखी दोन महत्त्वपूर्ण पुस्तकं लिहिली- ‘भारतीय ग्रंथमुद्रण’ आणि ‘कागद’! पहिल्या पुस्तकात भारतीय ग्रंथमुद्रणाचा इतिहास आलेला आहे, तर दुसऱ्या पुस्तकात कागदनिर्मितीचा इतिहास, निर्मितीप्रक्रिया, कागदाचे प्रकार आणि आकार, मुद्रणाचा दर्जा आणि कागद यांचं नातं अशा सर्व पैलूंची माहिती आलेली आहे.

बापूरावांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांच्यापाशी असलेली दूरदृष्टी आणि व्यवस्थापनकौशल्य. मोठय़ा प्रकल्पांची आखणी आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये होतं. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाच्या स्थापनेपासून ते त्याचे नियंत्रक (कंट्रोलर) म्हणून राहिले आणि पाठय़पुस्तक निर्मितीचा आदर्श त्यांनी घालून दिला. या संदर्भात त्यांनी एके ठिकाणी लिहिलं आहे : ‘मजकूर जुळणी, मुद्रण आणि पुस्तक बांधणी यांचा मेळ साधून एकजीव ग्रंथनिर्मिती करणं ही अतिशय वैशिष्टय़पूर्ण प्रक्रिया आहे. त्यासाठी चिकाटी आणि दूरदृष्टी असावी लागते. भरपूर मेहनत आणि योजनाबद्धता यांच्या आधारेच ही क्षमता जोपासता येते.’

बापूरावांनी मुद्रण तंत्रज्ञानासंबंधी अनेक लेख लिहिले. चर्चासत्रांमधून भाषणं दिली. साहित्य- नाटय़क्षेत्रात त्यांचा सतत वावर होता. त्यांची सौंदर्यजाणीव ही अभिजात साहित्य, संगीत आणि रंगभूमीच्या डोळस परिशीलनातून आलेली होती. त्यांच्या पुढाकारामुळे केशवसुतांच्या हस्ताक्षरातील कवितांचा संग्रह, वा. ल. कुलकर्णी यांच्या हस्ताक्षरातील डायरी अशी नावीन्यपूर्ण पुस्तकं प्रकाशित झाली. अ. का. प्रियोळकरांप्रमाणे बापूराव दुर्मीळ ग्रंथांचे साक्षेपी संग्राहक होते. ‘मौज’च्या वि. पु. भागवतांप्रमाणे त्यांच्याकडे मुद्रणाकडे बघण्याचा एक व्यापक समाजहितैषी दृष्टिकोन होता.

आजच्या ‘पैसा हेच सर्वस्व’ असलेल्या स्पर्धात्मक जगात मुद्रण क्षेत्राकडे संस्कृतिसंवर्धक अभ्यासकाच्या नजरेतून बघणारे बापूराव नाईक यांच्यासारखे कृतिशील विचारवंत दुर्मीळ झालेले आहेत. म्हणूनच त्यांचं स्मरण आवश्यक ठरतं.