नाटककार राम गणेश गडकरी यांच्या एकच प्यालानाटकात सुधाकरची भूमिका करणाऱ्या नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांच्या आत्मचरित्रातील आठवणी..

माझी संध्याकाळची बैठक गडकरी यांच्याकडे असे. एका बैठकीत गडकरी यांनी आम्हाला एक नवे नाटक देणार असल्याबद्दल गोष्ट काढली. गडकरींनी ‘एकच प्याला’ व मिश्रविवाहाच्या विषयावरील ‘तोड ही माळ’ अशा दोन नाटकांची कथानके मला सांगितली. ‘एकच प्याला’चे कथानक मला उत्तम वाटले. नारायणरावांना (बालगंधर्व) गडकरी यांच्याकडे नेऊन दोन्ही कथानके मी ऐकविली. नारायणरावांस ‘एकच प्याला’चे कथानक जास्त आवडले. गडकरी यांनी नारायणरावांस, ‘‘तुम्हाला या नाटकाच्या चौथ्या अंकात फाटक्या लुगडय़ाने अंग विभूषित करू लागणार आहे,’’ असे सुचविले. नारायणरावांना नाटकाचे कथानक आवडले असल्यामुळे त्यांनीही ‘‘फाटके लुगडेच काय, पण गोणपाट नेसूनही मी काम करायला तयार आहे,’’ असे उत्तर दिले.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..

अखेर गडकरींना ‘एकच प्याला’ लिहिण्यास सांगितले. प्रापंचिक देणे देण्यासाठी गडकरी यांनी लगेच दोनशे रुपये मागितले. ते त्यांना दिले. नाटक लिहून पुरे होईपर्यंत स्वास्थ्य मिळावे याकरिता घरात सामुग्री भरण्यासाठी पुन्हा गडकरी यांनी १५० रुपयांची मागणी केली.

पुढे एक दिवस गडकरी कंपनीत आले आणि त्यांनी मला म्हटले, मुहूर्त संपत आला आहे. अण्णासाहेब किलरेस्करांच्या जुन्या पंचपदीपैकी नांदीकरिता एखादी चाल द्या. त्यांना-

‘अमर वर नमित पदा गौरीमुख कमलरवि।

सक्त भक्ता गमो शीघ्र वेंची।।’

ही चाल लिहून दिली. ती चाल घेऊन गडकरी यांनी चाल लिहिलेल्या अक्षरांखाली अगोदर पाठ केलेले एखादे पद लिहावे तसे ‘शरण ते करुण तव’ ही ‘एकच प्याला’ची नांदी भराभर लिहून मला पाहायला सांगितले. तो अजब चमत्कार वाचून त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटले.

‘एकच प्याला’ नाटक गडकरी यांनी उलटय़ा अनुक्रमाने लिहायला सुरुवात केली. अगोदर पाचवा व नंतर अर्धाअधिक चौथा अंक तीन-चार दिवसांतच त्यांनी लिहिला आणि त्यांची पेन्सिल अडली.

द्वितीय विवाह करण्याची लहर गडकरी यांना आली. लग्नासाठी पुन्हा तीनशे रुपये त्यांनी मागितले. तेव्हा नाटकाबद्दल लेखी करार करून घेऊन त्यांना रक्कम दिली. द्वितीय विवाहामुळे गडकरी आनंदित दिसू लागले.

(पुढे पूर्ण झालेल्या) ‘एकच प्याला’ नाटकाचे कंपनीत वाचन झाले. नाटक सर्वासच आवडले. गडकरी माझे मित्र. त्यांनी आमच्याकरिता नाटक लिहिलेले. तेव्हा त्या नाटकात नारायणरावांच्यापेक्षा माझ्या कामाला गडकरी यांनी जास्त उठाव दिला होता. आपल्या नारायणरावांचा प्रभाव रंगभूमीवर कमी होईल की काय, अशी शंका पंडितांना (गोविंदराव टेंबे) जाचू लागली. त्यांनी त्या शंकेबद्दलचा खल अपिलेट कोर्टात केला. न्यायाधीशांनी पंडितांच्या शंकेचा निर्णय ‘‘नाही, नारायणाचे काम कोणत्याही रीतीने फिक्के पडणार नाही,’’ असा देऊन पंडितांना निर्धास्त केले. आपल्या कर्तबगारीची बढाई मारीत असता पंडितांनी ही गोष्ट सांगितलेली आहे.

कोणत्याही शोकपर्यवसानी नाटकात ज्या सात्त्विक भूमिकेचा छळ होत असतो त्या भूमिकेला छळाच्या वेदना अगर त्रास सोसावा लागत असतो. त्यामुळे त्या भूमिकेकडे छळ करणाऱ्या भूमिकेपेक्षा प्रेक्षकांची सहानुभूती साहजिकच आकर्षित होत असते. मानवी मनाची ठेवणच अशी आहे. परंतु दरवाजावर तिकिटे फाडणाऱ्या मॅनेजरला नाटकलेखनातील हे मर्म कसे कळावे? आणि मग अशाने आपल्या खात्रीच्या न्यायाधीशाकडे शंका निवारून घेण्यासाठी धाव न घ्यावी तर काय करावे?

‘एकच प्याला’ बसवायचे नक्की ठरले. मात्र ते नाटक योग्य मुदतीत हाती न आल्यामुळे ‘सहचारिणी’ (१९१८, नाटककार : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर) रंगभूमीवर आल्यानंतर ते आणायचे असे उभयतांच्या संगनमताने ठरले..

पुढे ‘एकच प्याला’ची तालीम सुरू झाली. पदे केलेली नव्हती म्हणून मी पुण्यास गेलो. अंगाला सूज येऊन गडकरी आसन्नमरण झालेले होते. त्यांच्या संमतीने त्यांच्या वडीलबंधूंकडून परवानगी लिहून घेऊन वि. सी. गुर्जर यांच्याकडून पदे करून घेतली. सिंधूच्या पदांच्या चाली सुप्रसिद्ध रेडिओ गायिका सुंदराबाई (जाधव) यांच्या आहेत; बाकीच्या काही पंढरपूरकरबुवा व काही मास्टर कृष्णा यांच्याकडून घेतल्या.

डिसेंबरअखेरीला गडकरी सावनेर येथे आपल्या बंधूंकडे जायला निघाले. बोरीबंदरावर ते उतरले आणि मला बोलवायला एका मुलाला त्यांनी पाठविला. मी गेलो. असा प्रतिभावान कवी आणि आपला एक मित्र शरपंजरी पडलेला पाहून मला गहिवर आला. पण तो दाबून त्यांच्याजवळ चार धीराचे शब्द बोललो. त्यांनी मागितले तितके पैसे मी पाठवून दिले. ते सावनेरला रवाना झाले. डोळ्यातून पाणी आले. गडकरी परत दृष्टीला पडतील अशी आशा वाटेना. गंधर्व कंपनीत माझी जी कुचंबणा चालली होती ती त्यांना समजत होती. आजारी असताना एकदा ते मला म्हणाले, ‘‘गणपतराव, नालायक माणसाकडून अशी मानहानी का सोसता? चला, पडा बाहेर. वर्षांला चार याप्रमाणे मी तुम्हाला नाटके देतो. तुम्ही आणि मी भागीदार होऊ.’’ मी उत्तर दिले, ‘‘मास्तर, बरे व्हा. मग खात्रीने या गोष्टीचा विचार करीन. तुमच्यासारखा खंदा लेखक मिळाल्यावर मी आकाशाला गवसणी घालीन. लवकर बरे व्हा.’’ पण भवितव्य निराळे होते. १९१९ जानेवारी ता. २३ रोजी सावनेर येथे हा प्रतिभावान कवी व नाटककार दिवंगत झाला. सगळा महाराष्ट्र हळहळला.

‘एकच प्याला’ या नाटकाचा पहिला प्रयोग तारीख २० फेब्रुवारी १९१९ रोजी बडोद्यास श्रीमंत महाराजांसमोर झाला. सरकारस्वाऱ्या खूश झाल्या. वर्षांसनाशिवाय एक हजार रुपये जास्त द्यायचा हुकूम झाला.

नाटकाचे पुस्तक छापायचे होते. त्याच्या हजार प्रतीच्या प्रथम आवृत्तीच्या प्रकाशनाचा हक्क गडकरी यांनी १२५० रुपयांस एका प्रकाशकास दिला होता. प्रकाशकाच्या कारवाईबद्दल गडकऱ्यांच्या बंधूंना मी अगोदरच सूचना दिली होती. त्यांनी प्रकाशनाची सर्व व्यवस्था आपुलकीने माझ्याकडे सोपविली. पाच हजाराच्या ऐवजी सात हजार प्रती काढायचा प्रकाशकाचा बेत मला कळला. जास्त प्रती काढता येणार नाहीत; काढल्यास कायदेशीर व्यवस्था केली जाईल, असा धाक मी त्याला घातला. पुस्तक सर्वागसुंदर झाले पाहिजे हे त्याला बजावले. प्रकाशकाच्या फायद्याकडे लक्ष देऊन पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत नाटकाचा प्रयोग लावायचा नाही हे मी कबूल केले. इतकेही करून प्रकाशक हातचलाखी करू लागले. त्या भानगडीत वेळ गेल्यामुळे पुस्तक वेळेवर प्रसिद्ध झाले नाही. प्रयोग वेळेवर जाहीर केलेला होता म्हणून गडकरी यांचा फोटो घालून गुर्जर व पेठे यांनी पद्यावली प्रसिद्ध केली. त्यावेळी गुर्जरांच्या बोलण्यात असे आलेले आठवते, की गडकरी यांचा व माझा जिव्हाळ्याचा ॠणानुबंध होता. सबब खर्चवेच वजा जाता या पद्यावलीचे जे उत्पन्न राहील ते गडकरी यांच्या स्मारकास देईन. पद्यावलीची पहिली आवृत्ती संपून दुसरी निघाली होती. त्यांनी त्याप्रमाणे केले की न केले, हे त्यांचे त्यांना किंवा गडकरी स्मारक मंडळास माहीत.

बडोद्यानंतर मुंबईत पहिला प्रयोग झाल्यावर भयंकर खळबळ उडाली. गुजराथी लोकांना नाटकातील शोकरसाने हलवून सोडले. चौथा, पाचवा अंक लोकांना पाहावेना. सुधाकर मुलाला काठी मारतो हे दृश्य दिसू नये म्हणून काही हळव्या मनाचे लोक उठून बाहेर जात.

पहिल्या प्रयोगाला गडकरी यांचे धाकटे बंधू शं. ग. गडकरी व गडकऱ्यांचे एक शिष्य न. ग. कमतनूरकर हे आले होते. गडकरी यांचे बंधू ‘सर्व व्यवहार संपवा,’ असे म्हणू लागले. मुंबईचा मुक्काम संपताना सर्व हिशेब पुरा करू असे आश्वासन दिले आणि त्यांना जरूर असलेली रक्कम त्याक्षणी पावती घेऊन दिली. गडकरी यांना वेळोवेळी ज्या रकमा दिल्या होत्या त्याच्या पावत्या माझ्याजवळ होत्याच. बंधूजवळ नुकत्याच दिलेल्या रकमेसह गडकरी यांस बावीसशे रुपयांची पोच झाली होती.

(नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांच्या माझी भूमिकाया आत्मचरित्रातून साभार. प्रकाशक : व्हिनस बुक स्टॉल)