प्रशांत दामले

‘सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर झाले. यात मी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमिकेत होतो. हे नाटक करत असताना त्याच सुमारास माझी ‘गेला माधव कुणीकडे’, ‘बे दुणे पाच’, ‘प्रियतमा’ ही नाटकेही सुरू होती. ‘लेकुरे’ने मला काय दिले, असे विचारले तर मी सांगेन- या नाटकाने मला आत्मविश्वास दिला. ‘बे दुणे पाच’ हे फार्स प्रकारातले; तर ‘लेकुरे’ हे तुलनेत गंभीर विषयावरील, पण हलकेफुलके असे कौटुंबिक नाटक होते. ही दोन्ही नाटके अगदी टोकाची होती. ‘बे दुणे’मध्ये मला ‘बॉडी लँग्वेज’चा वापर करून विनोदनिर्मिती करायची होती, तर ‘लेकुरे’मध्ये तसं काही न करता प्रेक्षकांपर्यंत नेमकी भावना पोचवायची होती. वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी  असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. संहिता नुसती उत्तम असून चालत नाही, तर ती दिग्दर्शन व अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत योग्य  प्रकारे पोहोचवावीही लागते. ‘लेकुरे’च्या माध्यमातून मला ते करता आले. त्यामुळे या नाटकाने मला एक वेगळाच आत्मविश्वास दिला.

या नाटकाचे दिग्दर्शन दिलीप कोल्हटकर यांनी केले होते. श्रीकांत मोघे व दया डोंगरे यांचे ‘लेकुरे’ मी पाहिलेले नव्हते. त्यामुळे माझ्यावर दडपण नव्हते. हा, पण प्रेक्षकांनी त्या दोघांचे नाटक पाहिलेले असल्याने ते ‘राजशेखर’ म्हणून मला स्वीकारतील का, अशी एक शंका माझ्या मनात होती. माझ्यावर दडपण कुठले असेल, तर ते नाटकातील गाण्यांचे होते. कारण मी ‘गद्य’ पटकन् पाठ करू शकतो, पण ‘पद्य’ पटकन् पाठ होत नाही. आणि नाटकात तर गाणीच होती! नाटकाची सुरुवातच माझ्या गाण्याने होती. पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. गाण्यांच्या मूळ चालीत कोणतेही बदल न करता, त्याला धक्का न लावता संगीतकार अशोक पत्की यांनी गाण्यांचे ट्रॅक नव्याने तयार करून माझ्याकडून गाण्यांचा कसून सराव करून घेतला. गंमत म्हणजे नाटकाची तालीम सुमारे पंधरा दिवस चालली, तर माझा गाण्यांचा सराव व त्याची तालीम २२ ते २४ दिवस सुरू होती. नाटकातील आम्ही सगळेच कलाकार नवीन- म्हणजे मूळ नाटकात काम न केलेले होतो. दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर हे तसे करडय़ा शिस्तीचे. त्यांनी सर्व कलाकारांशी बोलून, त्यांची वेळ घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आमची सगळ्यांची तालीम घेतली  होती.

आम्ही केलेल्या या नाटकाच्या प्रयोगांचे एक खास वैशिष्टय़ म्हणजे नाटकाचे प्रयोग ज्या, ज्या ठिकाणी आम्ही करत असू, तेथील स्थानिक मुले त्या, त्या ठिकाणच्या प्रयोगात घेत होतो. आज वेगवेगळ्या ठिकाणी माझे नाटकांचे प्रयोग होतात तेव्हा काही ‘प्रौढ तरुण’ रंगपटात येऊन भेटतात आणि ‘आम्ही लहान असताना तुमच्याबरोबर ‘लेकुरे’च्या प्रयोगात काम केले होते,’ अशी आठवण सांगतात तेव्हा गंमत वाटते.

आमच्या संचातील हे नाटकही प्रेक्षकांनी स्वीकारले. नाटकाचे ४०० प्रयोग आम्ही केले. सर्व प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ गेले. श्रीकांत मोघे व दया डोंगरे यांचे नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांना या नाटकाने स्मरणरंजनाचा आनंद दिला. तर तरुण पिढीला ‘लेकुरे’ची नव्याने ओळख करून दिली. पुण्यातील बालगंधर्वमधील एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि दस्तुरखुद्द पं. जीतेंद्र अभिषेकी आले होते. दोघांनी एकत्र बसून आमचे नाटक पाहिले. त्यावेळी मला प्रचंड दडपण आले होते. पण आमचा तो प्रयोग छान रंगला. ‘पुलदे’ आणि अभिषेकी यांनी आमचे कौतुक केले. ती शाबासकीची थाप आजही आठवणीत आहे.

श्रीकांतकाकांनी अजरामर करून ठेवलेली ‘राजशेखर’ची भूमिका या नाटकामुळे मला करायला मिळाली. ती मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे केली. नाटकाला प्रेक्षकांचाही जो  प्रतिसाद लाभला त्यावरून माझे काम त्यांना आवडले असे म्हणता येईल. ‘लेकुरे’ या पुनरुज्जीवित नाटकाने मला भरभरून आनंद व समाधान दिले. एक कलाकार म्हणून मला असे वाटते की, प्रत्येक कलाकाराने किमान दोन वर्षांतून एकदा तरी एखाद्या पुनरुज्जीवित नाटकात भूमिका करावी. त्या काळातील जुनी नाटके केल्यामुळे एक चांगली संहिता पुन्हा एकदा नव्याने आजच्या पिढीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. कलाकारांना मराठी भाषेचे सौंदर्य, पल्लेदार वाक्ये, चांगले संवाद सादर करायला मिळतील. त्यांच्या जिभेला चांगले ‘वळण’ लागेल आणि त्यांना नवे काहीतरी शिकल्याचा आणि केल्याचा अनुभवही मिळेल. c