|| डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

मराठीला एकूणच विनोदाचं बऱ्यापैकी वावडं असल्यामुळे विनोदी साहित्याचा अभ्यासपूर्ण परामर्श घेणारी किंवा एखाद्या विनोदी साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकाचा सविस्तर ऊहापोह करणारी पुस्तकं आपल्याकडे मोजकीच आहेत. त्यातही विनोदाची तात्त्विक वा सैद्धान्तिक मांडणी करणारी पुस्तकं तर त्याहूनही कमी. न. चिं. केळकरांचं १९३७ सालचं ‘हास्यविनोदमीमांसा’, उषा कुलकर्णीचा ‘मराठी विनोद’ हा प्रबंध आणि नंतर थेट २००६ मधलं गो. मा. पवार यांचं ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप’ हे पुस्तक. अधेमधे विनोदी साहित्यकृतींच्या काही संपादकांनी लिहिलेल्या प्रस्तावना आणि तुरळक प्रमाणात लेख. बस्स! यापेक्षा अधिक काही शोधू म्हणता सापडत नाही. अशा प्रकारचं एखाद्या साहित्यप्रकाराची चर्चा करणारं लेखन ही जशी अभ्यासकांची गरज असते, तशीच विचक्षण वाचकाचीही असते. प्रदीप कुलकर्णी लिखित ‘यांनी केलं विनोदविश्व समृद्ध’ हे पुस्तक काही अंशी ही गरज भागवतं.

मनोगतात प्रदीप कुलकर्णी यांनी लिहिले आहे की, ‘लहानपणापासून घरात विनोदाला पोषक वातावरण लाभल्यामुळे विनोदाचे व्यावहारिक फायदे मिळाले. घरातलं प्रसन्न व मोकळं वातावरण आणि दैनंदिन आयुष्याकडे पाहण्याचा खेळकर दृष्टिकोन हे अनायासेच लाभलं.’  या लहानपणीच रुजलेल्या आवडीचं रूपांतर प्रथम मराठी, नंतर जागतिक विनोदप्रधान साहित्य वाचण्यात आणि त्याचा अभ्यास करण्यात झालं. ऑस्कर वाइल्डच्या नाटकांतल्या कोटीबाज संवादांचा आनंद घेतानाच मार्क ट्वेन, जॉर्ज मिकेश, स्टीफन लीकॉक, जेरॉम के. जेरॉम अशा विनोदकारांची  पुस्तकेही त्यांनी वाचली आणि विनोदी साहित्याविषयीची आपली अभिरुची घडवत नेली. आपल्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावत नेल्या. त्यातूनच हे पुस्तक सिद्ध झालं आहे.

मराठी विनोदविश्व ज्यांनी विविध प्रकारे समृद्ध केलं अशा शतकभरातल्या बारा विनोदकारांवर लेखकाने स्वतंत्र लेख लिहिले आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, प्र. के. अत्रे, दत्तू बांदेकर, पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, मुकुंद टाकसाळे आणि मंगला गोडबोले हे ते बारा विनोदकार. तसंच ‘मराठी विनोदविश्वाची पाश्र्वभूमी’ या विस्तृत लेखामध्ये लेखकाने हास्यविनोदाचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत आणि १९ व्या शतकातील मराठी विनोदाचा धावता आढावा पेश केला आहे. देशी आणि विदेशी लेखकांच्या विनोदविषयक संकल्पना उदाहरणांसह नोंदवल्या आहेत. अखेरीस एका स्वतंत्र लेखात लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, इंदिरा तेलंग, सुशीला मराठे, शकुंतला परांजपे ते अलीकडच्या काळातील पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर वगैरे लेखिकांच्याही साहित्यातील विनोदाची दखल घेतली आहे.

ज्या विनोदकारांवर स्वतंत्र लेख लिहिले आहेत त्या सर्व लेखांमध्ये त्या-त्या विनोदकाराचा थोडक्यात चरित्रात्मक परिचय करून दिला आहे. त्यांच्या वाचनात कोणते विनोदी साहित्य आले, कोणाचा प्रभाव पडला याचीही माहिती लेखकाने पुरवली आहे. प्रत्येकाच्या विनोदाची वैशिष्टय़े उदाहरणांसह नोंदवली आहेत. त्यामुळे श्रीपाद कृष्ण ते मंगलाबाई- सर्वाच्या विनोदी लेखनाचा अभ्यासपूर्ण आस्वाद घेतला गेला आहे. ‘सुदामा’ या टोपणनावाने लिहिणाऱ्या श्रीपाद कृष्णांनी ‘शिमगा’ हा पहिला लेख निनावीच प्रसिद्ध केला होता. किंवा चिंतामणचा ‘चिमण’ कसा झाला, इत्यादी रोचक तपशील या पुस्तकाची खुमारी वाढवतात.

श्रीपाद कृष्णांनी समाजसुधारणेसाठी विनोदी लेखनाचा मार्ग वापरला. एखाद्या प्रथेविषयी लिहिताना आपण जणू काही त्या प्रथेच्या बाजूचेच आहोत असं भासवून त्या प्रथांमधला फोलपणा, विसंगती आणि हास्यास्पदता ते दाखवून देत. जयवंत दळवींच्या विनोदी लेखनाची दखल ‘ठणठणपाळ’पुरती नसून विक्षिप्त कथाही त्यांनी लिहिल्या होत्या याचीही नोंद इथे घेतली गेली आहे. दळवींची खुसखुशीत आणि मार्मिक भाष्येही उदाहरणादाखल दिली आहेत.

वाचकांना हसवताना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाणीव करून देणाऱ्या शंकर पाटलांनी विविध प्रकारच्या अपप्रवृत्तींचं दर्शन घडवणाऱ्या विनोदी कथा उपहास, उपरोध आणि विडंबनाचा आधार घेत लिहिल्या. तर द. मा. मिरासदारांनी वैचित्र्यपूर्ण माणसांचे नमुने पेश केले. मुकुंद टाकसाळे यांना असणारं सामाजिक समस्यांचं भान, सूक्ष्म निरीक्षणं आणि उपजत विनोदबुद्धी ही वैशिष्टय़े लेखकाने अचूक टिपली आहेत. त्यांची सोपी आणि अनौपचारिक भाषा, डंख न मारणारा विनोद, स्त्रियांना कधीही विनोदविषय न बनवणं याचीही दखल आवर्जून घेतली आहे.

सातत्याने गुणवत्तापूर्ण लेखन करणाऱ्या मंगला गोडबोले यांची विनोदी लेखिका म्हणून स्वतंत्रपणे दखल घेतली आहे, ही समाधानाची बाब. परंतु आपली सध्याची माध्यमग्रस्तता, मध्यमवर्गीय बोटचेपेपणा, मराठी लेखकाला समाजाकडून येणारे अनुभव, इ. विषयांवर त्या तिरकस कटाक्ष टाकत असतात. या लेखात त्यांच्या स्त्री-जीवनपर आणि भाषिक भेसळीवर लिहिलेल्या लेखांमधली दीर्घ अवतरणे दिली आहेत. मात्र, अन्य वैशिष्टय़ांचीही दखल घ्यायला हवी होती असं वाटतं.

दत्तू बांदेकरांची आठवण ठेवून त्यांच्यावरच्या स्वतंत्र लेखासाठी लेखकाचे अभिनंदन करायला हवे. आजच्या पिढीला बांदेकरांच्या विनोदी साहित्याचा परिचय करून दिला, म्हणून हा लेख महत्त्वाचा. वैयक्तिक जीवनातल्या कटुतेमधून बांदेकरांचा प्रतिभाशाली विनोद अवतरला. तो परिचित धाटणीचा नव्हता. त्यामुळे काहीसा उपेक्षितही राहिला. शिवाय बांदेकर अल्पायुषी ठरले. पण अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विनोदाचे अनेक आविष्कार दाखवले. ‘चित्रा’ साप्ताहिकात त्यांनी चुरचुरीत विनोदाने नटलेली अनेक सदरं चालवली. वाचकांची उत्कंठा ताणत ठेवून अखेरीस हा उत्कंठेचा फुगा टाचणी लावून फोडण्यात बांदेकर माहीर होते.

याच प्रकारे गडकरी, अत्रे, चिं. वि., पु. ल., गाडगीळ यांच्याही विनोदी लेखनाचा आस्वादपर परिचय लेखकाने करून दिला आहे. ‘कोल्हटकरांचा कोटीबाजपणा त्यांच्या नाटकातही शिरल्याने तो बराचसा रूक्ष आणि क्लिष्ट झाला’ किंवा ‘शारीरिक व्यंगावर केलेला गडकऱ्यांचा अतिशयोक्तीपूर्ण विनोद आज तितकासा आनंद देत नाही’ अशी टिप्पणीही लेखकाने केली आहे. ‘बुद्धिबळाच्या नादापायी सुदामा निजतानाही उंटाच्या मानेवर किंवा हत्तीच्या सोंडेवर मान टाकून पडू लागला..’ अशी अनेक उदाहरणे पानोपानी विखुरली आहेत. आजही त्यातला विनोद प्रस्तुत ठरला आहे.

मराठीतील विनोदविश्व समृद्ध करणाऱ्या या लेखकांची उत्तम प्रकारे रेखाटलेली हास्यचित्रे, मुखपृष्ठावर भिंगाचा केलेला कल्पक वापर, त्यात ठळकपणे दिसणारी १२ विनोदवीरांची नावे, उत्तम निर्मितीमूल्यं यामुळे पुस्तक ‘बघणीय’ही झाले आहे. प्रत्येक लेखासाठी उपयुक्त ठरलेल्या संदर्भग्रंथांची सूचीही शेवटी जोडली आहे. त्यामुळे या लेखसंग्रहाचे अभ्यासमूल्यही वाढले आहे. रूढ अभ्यासाची पठडी न अंगीकारता आस्वादपर लेखनपद्धती स्वीकारल्यामुळे लेखन वाचनीय आणि रंजक झाले आहे. मराठी विनोदविश्वाची ही सफर आनंददायी बनली आहे.

  • ‘यांनी केलं विनोदविश्व समृद्ध’- प्रदीप कुलकर्णी,
  • रोहन प्रकाशन, पुणे,
  • पृष्ठे- २००, मूल्य- २४० रुपये.