News Flash

‘शिदं’च्या ‘हसरी गॅलरी’चे कटू अनुभव

नाशिकला जाताना कांदा आंदोलन भेटलं. रास्ता रोकोत अडकल्यामुळे हॉलवर दुपारी दोनऐवजी सायं.

शकुंतला फडणीस लिखित ‘मी आणि हसरी गॅलरी’ हे पुस्तक आज रोजी प्रसिद्ध होत आहे. सुरेश एजन्सीद्वारा प्रकाशित या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश..
एखाद्या नाटकाचे प्रयोग देखणे होतात, प्रेक्षक मनोमन खूश होतात, पण कधी कधी पडद्यामागे काही वेगळ्याच अडचणी येतात. मात्र, त्या सगळ्या अडथळ्यांतून मार्ग काढून show must go on हे सूत्र सांभाळावंच लागतं! काही प्रमाणात ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शन सादर करताना आम्हालाही असेच अनपेक्षित अनुभव आले. पहिलंच प्रदर्शन मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीत लावलं (फेब्रुवारी १९६५). मोठय़ा उत्साहानं आम्ही पुण्याहून निघालो. काही सामान लगेज व्हॅनमध्ये आणि बरोबरही बरंच. चेकरबाबानं अडवलं की आम्हाला! ‘हा कसला माल आहे? एवढं सामान तुम्ही नेऊ शकत नाही. पेटय़ा खाली उतरवा, नाही तर स्टेशन मास्तरसाहेबांकडे चला!’ इकडे गाडी सुटायची वेळ होत आलेली. अशा वेळी पेटय़ा खाली उतरवायच्या? म्हणजे आम्हीही उतरायचं? कसला पेचप्रसंग हा!
पण शिदंनी टी. सी.ला समजावलं. त्यानं तक्रार मागे घेतली. बाका प्रसंग टळला. मात्र, त्याचा वचपा परत आल्यावर निघाला. प्रदर्शन यशस्वी झाल्याच्या आनंदात आम्ही तरंगत होतो. पण पुणे स्टेशनवर आमचे पाय जमिनीवर आले. ऑक्ट्रॉयवाल्यांनी अडवलं. समजूत-सामोपचाराचा काहीही उपयोग होईना. भरपूर वादावादी झाली, अन् विक्रीचा माल नसूनही ऑक्ट्रॉय भरावा लागला!
एक प्रदर्शन दिल्लीला झालं. उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. शंकर पिल्ले, पु. ल. देशपांडे, दयानंद बांदोडकर अशा मान्यवरांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. सई परांजपे यांनी टीव्हीसाठी प्रदर्शनाचे चित्रण केले. साहजिकच आम्ही आनंदात होतो. एक दिवस रस्त्यावर खूप गलका, आरडाओरडा ऐकू आला. गोवधबंदीसाठी आंदोलन सुरू होतं. आंदोलकांनी पार्लमेंटवर मोर्चा नेला होता आणि आमच्या प्रदर्शनाचा हॉल- आयफॅक्स आर्ट गॅलरी- तिथून अगदी जवळच. बाहेर घोषणा, आरोळ्या, सौम्य लाठीमार, हवेत गोळीबार अन् शेवटी अश्रुधूर असा गंभीर मामला होता. आम्ही पटापट हॉल बंद केला आणि सुन्न मनाने बसून राहिलो.
थोडय़ा वेळानं बाहेर सामसूम झाली. आम्ही पार्लमेंट हाऊस रोडवर बघायला गेलो. जिकडे तिकडे मोडतोड, अर्धवट जळालेली वाहनं, विखुरलेल्या बूट-चपला आणि फुटलेल्या काचांचा खच. अश्रुधुराचा परिणाम अजूनही जाणवत होता. डोळे चुरचुरत होते, अन् डोळ्यांत पाणीही येत होतं. आम्ही तिथं हास्य घेऊन गेलो होतो; हास्य आणि अश्रू अशा विचित्र प्रकारे एकत्र आले होते!
नाशिकला जाताना कांदा आंदोलन भेटलं. रास्ता रोकोत अडकल्यामुळे हॉलवर दुपारी दोनऐवजी सायं. सहा वाजता पोचलो. तिथे नुसता शुकशुकाट! आमची वाट बघून संयोजक, स्वयंसेवक सगळे परत गेले होते. फक्त एकटा रखवालदार तिथे होता. त्यावेळी मोबाइलची सोय नव्हती, त्यामुळे नाशिककरांचा अन् आमचा संपर्कच होऊ शकला नाही.
आम्ही हॉल उघडला. आत धूळ, कचरा, कोळिष्टकं. अशा ठिकाणी प्रदर्शन भरवणं कसं शक्य आहे? हॉल सोडतेवेळी तो किमान स्वच्छ अवस्थेत सोडायचा- ही पद्धत किती जण पाळतात? हॉल झाडणारे कामगार वाट बघून परत गेलेले. त्यांना बोलावून आणायचं तर ते ‘लई लांब ऱ्हातात!’ ही माहिती. मग वॉचमनकडून झाडू, खराटा मिळवला. हॉल झाडणे ही त्याची ‘डय़ुटी’ नसल्यामुळे जरा दादापुता करून त्याच्या मदतीने मी हॉल झाडून काढला. ठिकठिकाणी कसले कसले डाग पडले होते. सुदैवाने पाण्याची सोय होती. मी तो हॉल मग धुऊनही काढला. त्याच हॉलमध्ये दुसऱ्या दिवशी उद्घाटन समारंभात नवी, सुंदर साडी नेसून पुष्पगुच्छ स्वीकारला.
नाशिकला जाताना चारच तास उशीर झाला, पण कोल्हापूरला जाताना तब्बल आठ तास उशीर! सकाळी सातची बस होती. ती जास्तीत जास्त बारापर्यंत कोल्हापूरला पोचायची. पण वाटेत शेतकरी आंदोलन आणि पुन्हा रास्ता रोको. बस कोल्हापूरला पोचली तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. प्रदर्शनापूर्वी त्या- त्या गावी जाऊन हॉल ठरवणे आणि अन्य व्यवस्था निश्चित करणे यासाठी आमची अगोदर एक खेप असते. पण यावेळी ‘आता कोल्हापूर तर आपलंच गाव. तू एकटी सगळं करू शकशील. मी काही येत नाही,’ असं शिदंनी म्हटलं.
माझ्या क्षमतेवर त्यांनी एवढा भरवसा दाखवला याचा मला नक्कीच आनंद झाला. त्या आनंदात मी पुढील कामाचा विचार करत होते, तर बसला एकदम करकचून ब्रेक. रस्त्यावर मोठाले ओंडके, दगड, मोठाली पिंपं. बस पुढे जाणं शक्यच नव्हतं. जवळचं किरकोळ च्याऊंम्यांऊ तोंडात टाकलं. मग दिवसभर फक्त थोडं थोडं पाणी. भूमिपुत्रांसाठी दिवसभर उपासाचं पुण्य पदरी पडलं.
कोल्हापूरला हा प्रकार; तर निपाणीला तंबाखूचा ठसका. ऐन प्रदर्शनाच्या वेळी तंबाखू कामगारांचं आंदोलन. बेळगाव प्रदर्शनाच्या वेळी शहरात कर्नाटक सरकारचं अधिवेशन आणि सीमावासीयांचा प्रतिकार असा संघर्ष उडाला. जाळपोळही झाली. आणि बंगलोर प्रदर्शनाचे वेळी तर शहरात चक्क बॉम्बस्फोट झाला. मात्र, या दुर्घटना ‘हसरी गॅलरी’च्या हॉलपासून दूर अंतरावर घडल्या. त्यामुळे आम्हाला त्याची झळ पोचली नाही. पण खासगी वृत्तवाहिन्यांवर ती दृश्यं परत परत दाखवत होते. साहजिकच नातेवाईक चिंतेत पडले.
पण मला खरी चिंता सोलापूर प्रदर्शनाचे वेळी पडली. सोलापूरला एक दिवस इतकी प्रचंड गर्दी झाली, की संयोजकांनी पोलीस बंदोबस्त मागवला! शि. द. त्यावेळी महत्त्वाच्या मीटिंगसाठी मुंबईला गेलेले. मी, आमचे मदतनीस भाऊ गोखले आणि सोळा वर्षांची धाकटी कन्या रूपा यांच्यावर प्रदर्शनाची जबाबदारी होती. संयोजकांचं सहकार्य उत्तम होतं. मात्र ती सगळीच नवीन मंडळी. अनपेक्षित अडचणीच्या वेळी नेमकं काय करायचं हे त्यांना कसं उमगणार? त्या- त्या वेळी भाऊच्या सल्ल्यानं, पण मीच सगळे निर्णय घेत होते. माझं प्रसंगावधान आणि संयम यांची परीक्षाच होती ती.
एका गावी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी सगळी आवराआवरी होईपर्यंत रात्रीचे दहा वाजले. मला फारशी भूक नव्हती, त्यामुळे मी हॉलवर सामान राखत बसायचं अन् बाकीच्यांनी जेवायला जायचं असं ठरलं. हॉलची अन्य दारं बंद करून, एक अर्धवट लोटून ठेवलं अन् मी त्या दिवसाचे हिशोब तपासत बसले. थोडय़ा वेळानं दार ढकलल्याचा आवाज आला. बघितलं तर एक अनोळखी, पण थोराड, धिप्पाड माणूस आत येत होता. मी खरं तर घाबरले होते, पण उसनं अवसान आणून जरा दरडावून विचारलं, ‘काय पाहिजे?’ तर उत्तर- ‘प्रदर्शन बघायचंय.’
मी म्हटलं, ‘ही काय वेळ आहे प्रदर्शनाची? वेळ केव्हाच संपली. पहिलं बाहेर व्हायचं.’ तो बाहेर पडल्याबरोबर त्याही दाराला मी कडी घालून टाकली. हॉल भरवस्तीत होता. तसं भीतीचं कारण नव्हतं. पण प्रसंग अनपेक्षित होता. त्या माणसाचा नेमका काय उद्देश होता, कुणास ठाऊक.
नागपूरला प्रदर्शन भरवायचं ठरवलं तेव्हा माझी थोडी चलबिचल झाली. कारण नागपूरचे रसिक! कार्यक्रम आवडला तर कलाकाराला डोक्यावर घेतील, नाहीतर चक्क पाठ फिरवतील.
माझं माहेर विदर्भातलं, म्हणून तर मला माहीत! पण नागपूरकरांनी पहिल्या दिवसापासूनच उत्तम प्रतिसाद दिला. ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनाला दररोज खूप गर्दी. प्रेक्षकांच्या लांबलचक रांगा, वृत्तपत्रांतून दररोज भरभरून दाद आणि प्रतिसाद. शहर में माहौल बना रखा है.. वगैरे.
एक दिवस एक अनोळखी इसम आला अन् विचारू लागला, ‘शि. द. फडणीस कुठे आहेत? त्यांच्याकडे काम आहे.’ मी सांगितलं, ‘ते बाहेर गेले आहेत. काम काय ते मला सांगा. मी त्यांना तुमचा निरोप सांगीन.’ तो म्हणाला, ‘मी कलेक्टर कचेरीतून आलोय. तुमच्या प्रदर्शनाला रोज एवढी गर्दी होतेय. तुम्ही तिकीट लावलं आहे, पण टॅक्स नाही भरला!’ मला आश्चर्यच वाटलं. कारण शि. दं.नी खूप प्रयत्नपूर्वक कला-प्रदर्शनावरील करमणूक कर माफ करवून घेतला, त्याला पुरती बारा वर्षे झाली होती. मी म्हणाले, ‘कला-प्रदर्शनाला करमणूक कर माफ झालाय कधीच!’
‘माफबीफ काही झाला नाही. तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. टॅक्स नाही भरला तर वर आणखी दंड पडेल.’ तो आता जरा अरेरावीनं बोलत होता.
मग मीही ठासून म्हणाले, ‘तुम्हाला अजून माहीत नसेल. पण कला-प्रदर्शनाला करमणूक कर माफ आहे. तसं सरकारी पत्र याक्षणी माझ्या फाइलला आहे. बघायचंय?’
त्यावर मात्र तो गडबडला. मग जरा नरमाईनं म्हणाला, ‘मॅडम, प्लीज, असं रागावू नका. आपण बघू ना. काहीतरी कॉम्प्रमाइज करू.’ त्याला चक्क चिरीमिरीची अपेक्षा होती.
आता मलाही राग आला. म्हटलं, ‘व्हॉट डू यू मीन? कसलं कॉम्प्रमाइज? आम्ही नियमानुसार वागतोय. तुम्ही भलत्या अपेक्षा ठेवू नका.’ मी ठणकावून सांगितलं. त्यावर ‘सॉरी.. सॉरी’ म्हणत तो निमूटपणे परत गेला. माझ्याभोवती प्रेक्षकांचा हा भलामोठा घोळका. अशा वेळी फार संयमानं बोलावं लागतं. पण मला अगदी सात्विक संताप आला होता आणि तो चुकीचा नव्हता.
असे अडचणीचे अन् कसोटीचे प्रसंग आले, त्या-त्या प्रसंगी शांतपणानं आणि धीरानं मार्ग काढला. साहजिकच आमचा आत्मविश्वास वाढला आणि ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनाची वाटचाल यशस्वी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 2:00 am

Web Title: marathi book review published by suresh prakash
Next Stories
1 कोसंबी पिता-पुत्र.. भटकळांच्या नजरेतून!
2 प्रेमविश्वाचा वेध घेणाऱ्या कहाण्या
3 आत्मलक्षी कविता
Just Now!
X