‘लोकरंग’मधील (८ एप्रिल) ‘‘काश्मीर प्रश्न’ आणि वैचारिक अप्रामाणिकपणा’ हे ‘काश्मीर प्रश्न’ या पुस्तकाचे संकल्प गुर्जर यांनी केलेले परीक्षण वाचले. त्यानंतर १५ एप्रिलच्या ‘लोकरंग’मध्ये ‘शब्द प्रकाशना’ने ते पुस्तक मागे घेण्याची घोषणा केली. परीक्षणात गुर्जर यांनी वैचारिक अप्रामाणिकपणाचा माझ्यावर आरोप केला असल्यामुळे मी माझी बाजू या पत्राद्वारे मांडणे गरजेचे समजते.

सहलेखिका म्हणून ना. य. डोळे यांच्याबरोबर पुस्तकावर छापलेल्या माझ्या नावाला गुर्जर यांचा मुख्य आक्षेप होता. मी इथे नमूद करू इच्छिते, की हा निर्णय सर्वस्वी प्रकाशकांचा होता. गुर्जर यांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे ना. य. डोळे यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा माझा हेतू नव्हता.

काश्मीर विषयावर गेली १४ वर्षे मी अभ्यास करत आहे. सतत पाच वर्षे काश्मीर खोऱ्यात आणि दुर्गम सीमावर्ती गावांमध्ये जाऊन तेथील समस्यांचा मी अभ्यास केला आहे. काश्मिरी युवकांवर दहशतवादामुळे झालेल्या परिणामांवर मी दोन वर्षे लघु शोधकार्य केले आहे, ज्याच्या संशोधनासाठी मला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मिळाले होते. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरवर अनेक लेख लिहिले आहेत. तसेच ‘श्रीविद्या प्रकाशन’सारख्या मान्यवर प्रकाशनाने माझे काश्मीर विषयावरील एक पुस्तकही प्रकाशित केले आहे. त्याचबरोबर भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये आणि खुद्द काश्मीर विद्यापीठात या विषयावर मी व्याख्याने दिली आहेत. परंतु एखादे पुस्तक पुनर्जीवित करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे पुस्तकात करण्यात येणाऱ्या बदलांची पूर्वकल्पना मी वेळोवेळी प्रकाशकांना देत होते. आता हे पुस्तक मला न कळवता मागे घेतले आहे आणि प्रकाशकांचा निर्णय हा अंतिम असल्यामुळे मी या चर्चेला येथेच पूर्णविराम देणे योग्य समजते.

डॉ. रश्मी भुरे