११ फेब्रुवारी १९४५ हा दिवस ब्रिटिश सरकारने पकडलेल्या ‘इंडियन नॅशनल आर्मी’(सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना) मधील लष्करी अधिकाऱ्यांच्या सुटकेच्या मागणीचा दिवस म्हणून देशभर पाळला गेला. मुंबईमध्येही संप व निदर्शने झाली. कामगारांवर व जनतेवर ब्रिटिश सरकारने अमानुष लाठीमार व गोळीबार केले. ट्रेड युनियन पुढारी, कम्युनिस्ट व डाव्या कॉँग्रेस पुढाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. जनतेच्या या उठावाने लष्करातही बंडाच्या वणव्याची ठिणगी पडली. भारतीय नौसैनिकांना ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबद्दल नौसैनिकांच्या मनामध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यांच्या मनांत धुमसत असलेल्या असंतोषाचा उद्रेक १७ फेब्रुवारी १९४६ रोजी झाला. या दिवशी ‘आयएनएस् तलवार’ या जहाजावरील नौसैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे हुकूम धुडकावून लावण्यास सुरुवात करून बंडाचा झेंडा फडकावला. लगोलग मुंबई बंदरातील सर्व २२ नौकांवरील नौसैनिक या उठावात सामील झाले.

या अनपेक्षित बंडाने ब्रिटिश सरकार गांगरून गेले. नाविकांच्या या बंडाने स्वातंत्र्य आंदोलनातील अखेरच्या व निर्णायक पर्वाची सुरुवात झाली. मग्रूर व उद्दाम ब्रिटिश अधिकाऱ्याने नाविकांना शस्त्रे खाली ठेवून शरण येण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. अन्न-पाण्याची रसद तोडली व शरण न आल्यास सर्व जहाजांना विमानातून बॉम्ब टाकून जलसमाधी देण्याची धमकी दिली. या धमकीने नौसैनिक अधिकच चवताळून उठले. ही धमकी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे प्रत्युत्तर लगेच दिले जाईल असा जबाब नौसैनिकांकडून दिला गेला. ‘‘आमच्या ताब्यातही तुमचे ब्रिटिश अधिकारी आहेत व आमच्या जहाजावरील तोफांची तोंडेही तुमची कार्यालये व गव्हर्नरच्या बंगल्याच्या दिशेने रोखलेली आहेत हे लक्षात ठेवा’’ – असा जबाब नाविकांकडून मिळताच ब्रिटिश अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. एवढय़ावरच हे नाविक थांबले नाहीत तर त्यांनी जहाजांवरील ब्रिटिशांचा युनियन जॅक हा झेंडा उतरवला. अन् कॉँग्रेसचा तिरंगा, मुस्लीम लीगचा हिरवा व कम्युनिस्टांचा लाल असे तीन झेंडे जहाजांवर डौलाने फडकू लागले!

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
Assam Rifles , First Ex Servicemen Association Center, Maharashtra, nashik, Assam Rifles Ex Servicemen, Assam Rifles Ex Servicemen Association Center, Assam Rifles Ex Servicemen nashik, Directorate General of Assam Rifles
आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांसाठी महाराष्ट्रात प्रथमच केंद्र
police maharashtra
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी ‘घरगडी’! राज्यभरात तीन हजारांवर पोलीस…
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

हे मोठेच धाडस होते. परंतु ब्रिटिशांची पाशवी सत्ता उलथून टाकण्याची ऊर्मी त्यांना लढण्याची प्रेरणा देत होती. हादरून गेलेल्या ब्रिटिश सरकारने या बंडाला तोंड देण्यासाठी पुणे व नाशिक येथून गोऱ्या सैनिकांच्या पलटणी बोलावून घेतल्या. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी असलेले कामगार नेते कॉ. श्री. अ. डांगे व कॉ. बी. टी. रणदिवे बंदर परिसरात पोहोचले. पहाऱ्यावरील सैनिकांनी त्यांना रोखले नाही. बंड केलेल्या नाविकांशी त्यांनी चर्चा केली. परतताना त्यांना गोऱ्या सैनिकांच्या पलटणी रस्त्यांवरून जाताना दिसल्या. याचा अर्थ स्पष्ट होता. मुंबईमध्ये लगेचच मार्शल लॉ लागू होण्याची ती सूचना होती.

लगेच संध्याकाळी मुंबई कम्युनिस्ट पक्षाची सभा बोलाविण्यात आली. या सभेत कॉ. डांगे व कॉ. रणदिवे यांच्या सूचनेवरून मुंबईत सार्वत्रिक संप करून नाविकांना पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयानुसार गिरण्यांच्या दरवाजावर सभा घेण्यास सुरुवात झाली. गिरण्यांमध्ये संप कमिटय़ा स्थापन झाल्या. कम्युनिस्ट पक्ष व कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली. त्यांनी बंडखोर नौसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. २२ फेब्रुवारी १९४६ चा हा सार्वत्रिक संप यशस्वी झाला. जनतेनेही हरताळ पाळून मुंबई बंद केली. रस्त्यावर उतरलेले कामगार व जनता यांच्यावर, सार्वत्रिक संप व मुंबई बंदमुळे नामुष्की ओढवलेल्या सरकारने गोळीबार करण्याचे आदेश दिले. परंतु गोळीबाराला न जुमानता लोक रस्त्यावरून हटायला तयार नव्हते. लॉरीतून कामगार भागांत फिरणाऱ्या गोऱ्या सोजिरांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली होती. परंतु रस्तोरस्ती मुंबईतील लढाऊ  कामगारांनी गोळीबाराला न जुमानता ब्रिटिश सोजिरांना पळता भुई थोडी केली. कम्युनिस्ट महिला कार्यकर्त्यां या संघर्षांत आघाडीवर होत्या. कामगार भागातून अन्नधान्य गोळा करून व सोबत कामगार महिलांना घेऊन हरप्रकारे ते जहाजांवरील बंडखोर नाविकांना पाठविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे, अन्नधान्याची रसद तोडून बंडवाल्यांची उपासमार करण्याचा ब्रिटिश सरकारचा डाव उधळला गेला.

अशाप्रकारे नाविकांच्या बंडामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या महिला नेत्यांवर व कामगार महिलांवर एलफिन्स्टन पुलाजवळ गोऱ्या सैनिकांनी अमानुष गोळीबार केला. या गोळीबारात कॉ. कमल दोंदे मरण पावल्या. कॉ. कुसुम रणदिवे यांच्या पायात गोळी घुसली. कुसुम जयकर गंभीररीत्या जखमी झाल्या. लालबाग विभागातील तेजुकाया पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात केशव बाबू व शंकर भागोजी हे दोन कामगार मृत्युमुखी पडले. डिलाईल रोड परिसरात सशस्त्र पोलिसांबरोबर कामगारांनी युद्ध पुकारले. या कामगारांशी लढताना सशस्त्र पोलिसांनाही दोनदा पळ काढावा लागला. कामगार सरकारविरोधात बेफाम झाले होते व मरणालाही सामोरे जाण्यास तयार झाले होते.

मुंबईतील गोळीबारात दोन दिवसांत ३०० लोक ठार झाले. मफतलाल शहा नावाचे एक कामगार कार्यकर्ते भुलेश्वर भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बळी गेले. जागोजागी पडून राहिलेली प्रेते व जखमी आंदोलक यांना हलविणे आवश्यक झाले होते. खाटांवरून प्रेते हलविण्याची जबाबदारी व जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्याची जबाबदारी कामगार कार्यकर्त्यांनी स्वीकारली. परंतु त्यासाठी लॉऱ्यांमधून बेधुंद गोळीबार करीत येणाऱ्या गोऱ्या सैनिकांना रोखणे आवश्यक होते. कामगारांनी ब्रिटिश सैनिकांच्या गाडय़ा अडविण्यासाठी नाक्यानाक्यावर बॅरिकेडस् म्हणजे अडथळे उभे केले. पोलीस गोळीबारात हुतात्मा झालेल्यांची प्रेते व जखमींना केईएम् हॉस्पिटलमध्ये नेण्याचे काम कामगारांनी व कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी जिवावर उदार होऊन केले.

नाविकांनी केलेले बंड, त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले कामगार आणि सर्वसामान्य जनता यांनी पुकारलेले युद्ध यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले. कॉँग्रेस व मुस्लीम लीगच्या पुढाऱ्यांनी मात्र नाविकांच्या पुढाऱ्यांच्या मागे संप व बंड मागे घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. कॉँग्रेसचे नेते सरदार वल्लभभाई पटेल व मुंबई प्रांतिक कॉँग्रेसचे अध्यक्ष नाविकांच्या बंडाच्या विरोधात होते. सरदार पटेलांनी नाविकांनी स्वीकारलेल्या हिंसात्मक मार्गाचा निषेध केला. ‘संप मागे घ्या. आम्ही बडतर्फी होऊ देणार नाही,’ असे आश्वासन देऊन पटेलांनी अरुणा असफअलींना नाविकांच्या संप कमिटीसोबत बोलणी करण्यासाठी पाठवले. त्यांनी नाविकांना शांततेचे आवाहन केले. शस्त्रे खाली ठेवून बंड मागे घेण्यापूर्वी, कोणत्याही नाविकावर कारवाई होणार नाही व नाविकांच्या सर्व तक्रारी सोडविल्या जातील असे सरकारने आश्वासन द्यावे व हे आश्वासन पाळले जाईल याची कॉँग्रेस व मुस्लीम लीगने जबाबदारी स्वीकारावी, अशी संप समितीच्या नेत्यांची मागणी होती. परंतु प्रथम शरणागती स्वीकारा असा पटेलांचा आग्रह होता. २४ फेब्रुवारी १९४६ रोजी संपाच्या सहाव्या दिवशीही जवळजवळ सर्व गिरण्या बंद होत्या. दुपारनंतर पोलिसांनी चाळीचाळींतून शिरून मोठय़ा प्रमाणात धरपकड केली. अनपेक्षित अशा या कारवाईने कामगारांचा प्रतिकार थंडावला.

नाविक बंडाला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटिश लष्कराने मुंबईत केलेल्या गोळीबाराच्या व पोलीस अत्याचाराविरोधात २५ फेब्रुवारीला मुंबईत जनतेने कडकडीत हरताळ पाळला. कॉँग्रेस व मुस्लीम लीग यांची प्रथम नाविकांनी शरणागती पत्करावी अशी भूमिका असल्याचे पाहून नाविकांनी शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला. संप मागे घेताना नाविकांच्या पुढाऱ्यांनी जाहीर केले, की आमची शरणागती ब्रिटिश सरकारपुढे नसून ती भारतीय जनतेसमोर आहे. नौसैनिकांचे नेते बी. सी. दत्त यांनी देशवासीयांनी नाविकांच्या बंडाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानताना मुंबईतील कामगारवर्गाने दिलेल्या लढय़ाचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. ब्रिटिश सरकारविरोधात लढताना हुतात्मा झालेल्या तीनशेहून अधिक शहिदांना श्रद्धांजली अर्पण करताना दत्त म्हणाले, ‘‘सैनिकांचे व सामान्य जनतेचे रक्त प्रथमच एकत्र सांडले. आम्ही सैनिक हे कदापि विसरणार नाही व तुम्हीही विसरणार नाही याची आम्हाला खात्री आहे.’’ नौसैनिकांनी शरणागती स्वीकारल्यावर बंड शमले, शांतता प्रस्थापित झाली व कामगारही कामावर परतले. परंतु शरणागत नाविक बंदरावर परतल्यावर लष्करी तुकडय़ांनी त्यांना ताब्यात घेऊन कैद केले. कॉँग्रेस व मुस्लीम लीगने दिलेले आश्वासन फोल ठरले.

नाविकांच्या बंडाचा व या बंडाला मुंबईतील जनतेने दिलेल्या साथीचा भेदरून गेलेल्या ब्रिटिश सरकारने धसकाच घेतला. लष्कर व जनता एकत्र येऊन सरकारविरोधात एकत्र येऊन रस्त्यावर उतरल्याचा संदेश अगदी इंग्लंडपर्यंत पोहोचला. आता लवकरच भारतातून गाशा गुंडाळण्याची वेळ येऊन ठेपली आहे, हे ध्यानात यावयास ब्रिटिश सरकारला वेळ लागला नाही.

९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या ‘चले जाव’ आंदोलनानंतर नाविकांच्या बंडाने व मुंबईतील झुंजार कामगारांनी ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा देऊन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यावर देदीप्यमान इतिहास रचला. दुर्दैवाने ब्रिटिशांना भारतातून पळ काढण्यास भाग पाडणाऱ्या स्वातंत्र्य आंदोलनातील या अखेरच्या तेजोमय पर्वाला स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांकडून इतिहासामध्ये अनुल्लेखाने बाजूस सारण्यात आले. अहिंसा व सत्याग्रह या गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले असले तरी ब्रिटिशांना अखेरचा दणका झुंजार नाविकांनी व मुंबईच्या कामगारांनी दिला हे स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासातून कसे पुसता येईल?

– अजित सावंत

ajitsawant11@gmail.com

(संदर्भ: १. ‘एस. ए. डांगे : एक इतिहास’ – रोझा देशपांडे, बानी देशपांडे

२. ‘कामगारांची मुंबई’ – के. डी. नाईक

३. ‘मंजिल अजून दूरच!’ – गंगाधर चिटणीस)