|| चंद्रकांत बाबर

मराठी साहित्यातील, विशेषत: कवितेतील महत्त्वाचे असे प्रभावक्षेत्र म्हणून लोकसाहित्य वा लोकवाङ्मय राहिल्याचे प्रामुख्याने दिसून येते. अभंग, ओवी, अखंड, शाहिरी, भेदिक, पोवाडे, लावणी, गौळणी असा या लोकपरंपरेचा व्यापक आयाम आढळून येतो. मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या लोककला लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिलेल्या आहेत; शिवाय आपली लोकप्रियताही टिकवून आहेत, हे विशेष! लोककलेची ही विविध रूपे प्रबोधनाची प्रभावी माध्यमे आहेत. मात्र, ही परंपरा ‘मौखिक’ असल्याने लिखित परंपरेला असणारे भविष्यकालीन महत्त्व तिला टिकवता येत नाही. परंतु हीच मौखिक परंपरा ‘लिखित’ होऊन समोर येते तेव्हा तिचे दुहेरी अर्थाने महत्त्व वाढत जाते. ज्येष्ठ शाहीर राजा पाटील लिखित ‘तुकोबा निघाले वैकुंठाला?’ या पोवाडय़ात त्याचा प्रत्यय येतो.

‘तुकोबा निघाले वैकुंठाला?’ या पोवाडय़ाद्वारे अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटकादी सीमाभागात पुरोगामी विचारांचा जागर अव्याहत सुरू आहे. स्वत: शाहीर पाटील हातात डफ घेऊन हा पोवाडा गातात आणि तुकोबांचे कार्यकर्तृत्व सादर करतात. म्हणजेच मौखिक परंपरेच्या कसोटीवर पाटील यांचा हा पोवाडा टिकून आहे. आणि आता तर तो पुस्तकरूपाने लिखित परंपरेचाही अविभाज्य भाग झाला आहे.

वाण्याचा.. सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या एका वारकरी घराण्यातील तुकाराम बोल्होबा अंबिले-मोरे यांचा ‘महाकवी तुकाराम, संत तुकाराम, जगद्गुरू तुकाराम महाराज’ हा प्रवास किंवा या प्रवासाच्या निमित्ताने त्यांचे असणारे वारकरी संप्रदाय आणि मराठी साहित्यातील केंद्रवर्ती स्थान याविषयी आजही जगभर उत्सुकता आहे. त्यांच्या अभंगांद्वारे त्यांचे चरित्र, विचार आणि तत्त्वज्ञान तपासले, अभ्यासले जात आहे. याचे कारण तुकोबांच्या अलौकिक तत्त्वज्ञानात दडलेले आहे.

तुकोबांच्या कवित्वाविषयी, विद्वत्तेविषयी आणि पाईकीचे अभंग लिहून देऊन स्वराज्य- स्थापनेतील त्यांच्या कार्याविषयी आता कुणाला शंका उरलेली नाही. मात्र, तरीही तुकोबांच्या चारित्र्यावर आणि महत्तेवर काही अभिजनांकडून शिंतोडे उडवण्याचे काम होतच असते. तुकोबांच्या बदनामीची षड्यंत्रे आजही रचली जात आहेत. शिवाय तुकोबांच्या निर्वाणाविषयीही असंख्य मतप्रवाह आहेत. याविषयी ज्या मांडणी झाल्या आहेत त्या संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. तुकोबांच्या निर्वाणाच्या या महत्त्वाच्या मुद्दय़ाला केंद्रस्थानी ठेवून हा पोवाडा लिहिला गेला आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. कथाकार-समीक्षक जी. के. ऐनापुरे यांची दीर्घ प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तुकोबांच्या निर्वाणासंबंधी भाष्य करणे ही साधी-सोपी गोष्ट नाही याची पुरती जाणीव शाहीर पाटील यांना आहे. त्याविषयी ते लिहितात-

‘खरं बोलायला काय कुणाची भीती

गोळ्या झेलती शाहीर निधडी छाती

मानाचा मुजरा तुकोबा चरणावरती

आधी विचार, मग कृती खरी संस्कृती।’

‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही..’ अशी तुकोबांची शिकवण आहे. ‘संत तुकारामाच्या गाथेमुळे खरा देव, धर्म कळतो. देवाच्या नावावर धंदा करणारे, कर्मकांडाद्वारे समाजाची लूट करणारे उघडे पडतात. म्हणून तुकाराम गाथेला विरोध केला जातो,’ असे महत्त्वाचे निरीक्षण ते पोवाडय़ात नोंदवतात. तुकोबांच्या बदनामीचे षड्यंत्र कसे रचले जात राहिले आहे, त्याची घटनावार जंत्रीच ते मांडतात. प्रस्तावनेत ऐनापुरे यांनी ‘संतसूर्य तुकाराम’कर्ते आनंद यादव यांना संमेलनाध्यक्ष म्हणून संमेलनाला न येऊ देणाऱ्या, निदर्शने आणि विरोध करणाऱ्यांच्या दांभिक भक्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यासाठी ते दि. पु. चित्रे यांच्या कवितेच्या ओळी उद्धृत करतात. चित्रेंच्या त्या ओळी कोणीही गंभीरपणे घेतल्या नाहीत, असा आरोप ऐनापुरे करतात. चित्रेंसारखा कवी तुकोबांविषयी असभ्य भाषा वापरत असताना हाच समुदाय सुमडीत कसा जातो, हा मुख्य प्रश्न आहे. यापेक्षा भयानक म्हणजे चित्रे हे तुकोबांना ‘ग्लोबल’ करणारे ठरतात, तर आनंद यादव ‘द्रोही’ ठरवले जातात. मुळात ही सांस्कृतिक लढाईच आपल्याला कळलेली नाही, या निष्कर्षांपर्यंत ऐनापुरे वाचकांना आणून सोडतात. तेव्हा या पोवाडय़ाचे व त्यामागील चिंतनाचे महत्त्व कळल्यावाचून राहत नाही. यातून तुकोबांच्या तत्त्वज्ञानाला धूसर करू पाहणारी सांस्कृतिक यंत्रणा किती मजबूत आहे हे स्पष्ट होते.

सर बार्टल फ्रिअर हे मुंबईचे गव्हर्नर असताना अलेक्झांडर ग्रँटसाहेबांच्या प्रेरणेने त्यावेळच्या मुंबई सरकारने तुकाराम गाथेची संशोधित आवृत्ती तयार करून प्रसिद्ध करण्याचे ठरवले. त्यातील पहिला भाग १८६९ मध्ये, तर दुसरा १८७३ साली प्रसिद्ध झाला. यासाठी मुंबई सरकारने त्यावेळी २४ हजार रुपये खर्च केले होते आणि त्याचा फार बोलबालाही झाला होता. शिवाय मरे मिचेल यांनी १८४९ साली, तर सर ग्रँट यांनी १८६७ मध्ये तुकोबांवर निबंध लिहून आणि अभंगांचे भाषांतर करून आधीच तुकोबांना ‘ग्लोबल’ बनवले आहे, हे का ध्यानात घेतले जात नाही? अशा असंख्य प्रश्नांनी आणि त्यांच्या उत्तरांनी अस्वस्थ करणारे हे छोटेखानी पुस्तक मराठी साहित्य-सांस्कृतिक वर्तुळात तुकोबांना, त्यांच्या तत्त्वज्ञानाला पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यात यशस्वी झाले आहे.

  • ‘तुकोबा निघाले वैकुंठाला?’ – राजा पाटील
  • ललित पब्लिकेशन,
  • पृष्ठे- ७६, मूल्य- १०० रुपये.