19 April 2019

News Flash

‘कट्टा’उवाच  : हटाई

समुद्राच्या ऐवजी खडकवासला आहे किंवा मुळा-मुठा आहे असा युक्तिवाद कोणी चालवूनच घेत नाही.

वेदवती चिपळूणकर

स्थळ : अर्थातच पुणे.. एका मुलाने एका पानवाल्या काकांना रस्ता विचारला आणि ते रस्ता सांगत असताना मुलगा एकीकडे फोनवरही मॅप्स बघत होता. पूर्ण रस्ता सांगून झाल्यावर मुलाने परत काकांना विचारलं, जरा परत एकदा सांगता का? त्यावर काका उत्तरले, एका वेळी एक तर त्याला विचार, नाही तर मला विचार! प्रसंग दुसरा, स्थळ : अर्थातच परत पुणे.. भर सकाळी पेट्रोल पंपावर एक माणूस दोन हजार रुपयांची नोट देऊन शंभर रुपयांचं पेट्रोल भरायचा हट्ट धरून बसला होता. तो काही सुट्टे पैसे देत नाही म्हटल्यावर पेट्रोल भरणाऱ्या काकांनी त्याला विचारलं, किती रुपये आहेत तुझ्याकडे सुट्टे? माणसाने तोऱ्यात उत्तर दिलं, वीस रुपये. काकांनी त्याच्या वरचढ तोऱ्यात सांगितलं, मग वीस रुपयांचं पेट्रोल भर आणि पुढे हो! स्थळ : आता तुम्हांला माहीत असेलच.. सासू सुनेला म्हणाली, नीट राहायचं, हे काही तुझ्या आईचं घर नाही. सूनही पुणेरीच..सासूबाईंना म्हणाली, तुमच्या तरी आईचं कुठे आहे?

असे ठेवणीतले अपमान करणं ही पुण्याची खासियत जगाने मान्य केली आहे. त्यांच्या अपमान करण्याच्या कौशल्यांवर जगाचा अगदी दृढ विश्वास आहे. टोमणे मारणं, शालजोडीतले हाणणं वगैरे वगैरे त्यांच्या अगदी डाव्या हाताचा मळ! पण नुसता अपमान करून जेवढं समाधान होत नाही तेवढं समाधान त्यांचं समोरच्याला थेट कमी लेखून होतं. समोरची व्यक्ती स्वत:बद्दल काही चांगलं सांगत असेल किंवा कौतुकास्पद सांगत असेल तर त्याला शक्य तितकं हलक्यात काढणं म्हणजे समोरच्याची ‘हटाई’ करणं. समोरच्याला पत्रास किंमत न देता ‘हे काय कोणीही करेल’ अशा अ‍ॅटिटय़ूडने त्याला झटकून टाकणं म्हणजे त्याची ‘हटाई’ करणं. समोरच्याने युद्ध जिंकलं तरी ‘ते काय आमच्या पेशव्यांनी पण जिंकलं होतं’ किंवा समोरच्याने बिझनेस सुरू केला तरी ‘तो काय चितळे पण करतात’ असं म्हणून ‘काय तरी गोष्टी सांगतोय, जसं काही मोठा तीरच मारलाय’ अशा सुरात पुणेकर समोरच्याला अगदी नामोहरम करतात.

मात्र एकाच बाबतीत त्यांची इतरांकडून, विशेषत: मुंबईकराकडून, ‘हटाई’ होते ती गोष्ट म्हणजे ‘समुद्र’! समुद्राच्या ऐवजी खडकवासला आहे किंवा मुळा-मुठा आहे असा युक्तिवाद कोणी चालवूनच घेत नाही. बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी पुण्यात मिळत असल्या तरी एक समुद्र काय तो त्यांच्या हटाईचा मुद्दा कायमचा बनून राहतो!

viva@expressindia.com

First Published on August 24, 2018 1:08 am

Web Title: article about puneri attitude