03 March 2021

News Flash

यंदा ब्रेकअप आहे..!

ब्रेकअपनंतरचा संताप हा विशेष असतो.

‘तुझं आणि माझं नातं आता संपलंय. आय अ‍ॅम सॉरी! पण, आता नाही सहन होत तुझं असं वागणं.’ ‘आय थिंक वी नीड अ ब्रेक फ्रॉम इचआदर’, असे दर्दभरे डायलॉग केवळ मालिका- चित्रपटांमधले नाहीत. आपल्या आसपासही या अर्थाचे संवाद आता वारंवार ऐकू येऊ लागले आहेत. हे असं काही ऐकलं की, समजावं आता ‘दोनाचे एक’ होणार. या संवादाची जागा अगदी कुठलीही असू शकते- कॉलेज कट्टा, एखादा कॅफे, एखादी बाग, एखादा बस स्टॉप (मालिकांचा प्रभाव?) किंवा भर गर्दीतलं ठिकाण. ब्रेकअप सार्वजनिक ठिकाणी केलं की, लग्न होणार नसल्याने या सगळ्यांना लग्नाला नाही पण निदान ब्रेकअप तरी चारचौघांच्या साक्षीने आणि वाहनांच्या मंगलमयी सुरात झाल्याचं समाधान मिळतं.

एकदा का ब्रेकअप झालं की, मग सुरू होते ‘बच्चा’, ‘बाबू’, ‘शोन्या’,‘पिल्लू’ नावाच्या मनांची समजूत. कित्येकांना आपल्या पूर्वाश्रमीच्या जोडीदाराचं पाळण्यातलं नाव आठवत नाही इतकी या नावांची सवय झालेली असते. मधल्या काळात तिला ‘माझा बटर’, ‘माझं पनीर’ अशी काहीही विशेषणं जोडून संबोधलं जातं आणि ब्रेकअप होईपर्यंत ही यादी ‘माझं दुर्दैव’ इथपर्यंत येऊन संपते. ब्रेकअपनंतर पहिल्या तासात मनाला सावरण्याची प्रक्रिया सुरू होते. मग ‘मनाचा ब्रेक- उत्तम ब्रेक’ किंवा ‘वेळीच ‘ब्रेक’ घ्या- अपघात टाळा’ अशी वाक्यं मनोमन घोकली जातात आणि शेवटी मन बंड करून उठतं. ‘एखाद्या माणसावरचं प्रेम कमी करायचं असेल तर त्याचा द्वेष करायला शिका’ हे वैश्विक सत्य अमलात आणलं जातं. मग त्या व्यक्तीच्या सगळ्या वाईट गोष्टी आठवल्या जातात. एखाद्या सिनेमाच्या वेळी यायला तब्बल १३ मिनिटं (‘राष्ट्रगीता’चा वेळ सोडून) केलेला उशीर असो, भर मॉलमध्ये आपल्याला मोठय़ाने ‘वेडपट’ म्हटलेलं असो, त्या दिवशी वरचे १०० रुपये दिलेच नाहीत शेवटपर्यंत, इथवर वाईट गोष्टी आठवल्या जातात आणि मग सुरू होतो संताप!

ब्रेकअपनंतरचा संताप हा विशेष असतो.  ह्य़ापुढील सगळा क्रम हा सगळ्यांचा सारखाच असतो. जोडीदाराच्या आठवणीत पाच-सहा ब्रेकअपची गाणी तीन-चारदा रिपीट करून ऐकली जातात. त्यापुढे मस्त दोन तास मनमुराद रडणं होतं आणि इतकं रडून थकल्याने साहजिकपणे झोप येते, त्यामुळे पुढे वाढून ठेवलेला अख्खा दिवस किंवा अख्खी रात्र झोपून काढण्यात येते. रडता रडता अचानक झोप लागल्याने जेवण आपसूकच राहिलेलं असतं आणि त्यामुळे ‘ब्रेकअपचं दु:ख इतकं की मी जेवलोही नाही’ असं मानसिक समाधान मिळतं. या सगळ्यावर उत्तम उतारा म्हणजे ‘ब्रेकअप पार्टी’! हल्ली हे नवीन फॅड झालंय. लोक दु:खही साजरी करायला लागली असतील तर आपण तत्त्वज्ञानाने आणि बुद्धीने फारच पुढे गेलोय असं मानायला हरकत नाही. मग ह्य़ा ब्रेकअप पार्टीमध्ये ‘हल्लीची नाती किती उथळ झाली आहेत’ इथपासून चर्चा सुरू होते ती ‘रंगत’ जाऊन ‘नवीन जोडीदार शोधणं हे पॉकेमॉन शोधण्याइतकं सोपं झालंय’ इथवर येऊन संपते.

तरुण वयातलं प्रेम ही लग्नाआधीची चाचणी असते आणि ‘ब्रेकअप’ ही घटस्फोटाची रंगीत तालीम असते. कारण ‘प्रयोग’ही बरेच बाकी असतात. ह्य़ा ‘नात्यां’च्या प्रयोगातूनच ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट’ या संकल्पनेचा जन्म होऊन ब्रेकअप वृद्धी होते. ‘माझं ब्रेकअप झालंय’ हे अभिमानाने आणि उघडपणे सांगितलं जातं. अभिमान ह्य़ासाठी कारण ‘ब्रेकअप’ म्हणजे त्याआधी प्रेमाचा अनुभव आणि ज्याच्याकडे अनुभव जास्त त्याची ‘मार्केट व्हॅल्यू’ जास्त हासुद्धा सरळ फंडा. ‘ब्रेकअप झालंय’ हे उघडपणे सांगणं म्हणजे नव्या प्रेमाला खुलं निमंत्रण!

म्हणूनच ब्रेकअप झालं, रडण्याचे सोपस्कार झाले, ब्रेकअप पार्टी झाली की पुढील कामाला लागायचं. नुकतंच ब्रेकअप झाल्याने आणि आपण ते जगजाहीर केल्याने आपल्याबद्दल एकूणच सहानुभूती असते. मग एकेक मार्ग मोकळे होतात. पूर्वाश्रमीच्या ‘क्रश’ला (अर्थात ज्यांना आपल्याबद्दल सहानुभूती असेल) समुद्रकिनारी बोलवावं आणि ‘तुझ्यासमोर नाही तर कोणासमोर मोकळं व्हायचं?’ अशा आविर्भावात आपल्या ब्रेकअपची दु:खदायी गाथा सांगावी. अपेक्षित परिणाम साधला गेला नाही तर आपल्या रडण्यात खोट आहे, असं समजून गप्प राहावं.  हे साग्रसंगीत करण्याचं धाडस तुमच्यात नसेल तर सरळ आपला अतिहुशार भ्रमणध्वनी (स्मार्ट फोन) उचलावा आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉण्टॅक्ट लिस्ट उघडून एखाद्या सुंदर डी.पी.ला ‘ऌी८! म्हणत साद घालावी. नाइस डी.पी..!’ असा मेसेज करावा. पुढे श्रींची इच्छा..!

सौरभ नाईक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:04 am

Web Title: article on break up
Next Stories
1 आय कॅन डू इट!
2 टॅबू टॉक्स..!
3 प्रिय प्रेरणादायी मैत्रिणींनो..
Just Now!
X