25 November 2017

News Flash

देणाऱ्याने दाद द्यावी

सध्याच्या पिढीच्या रसिकतेनुसार त्यांची उत्स्फूर्त ‘दाद’ही वेगवेगळ्या रूपात अवतरते आहे!

आदित्य दवणे | Updated: June 30, 2017 5:41 AM

 

मनाला भिडणाऱ्या कलेला, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणून कधी व्वा’, कधी बढीया’, कधी क्या बात हैअशा आणि अनेक स्वरूपांतून अनुभवता येणारा निखळ उद्गार म्हणजे दाद’.

एके काळी असंच सहजी तोंडून येणाऱ्या कवतिकाच्या शब्दांनी, कधी सभागृह दणाणून सोडणाऱ्या टाळ्यांनी रसिक प्रेक्षकांची दाद समोरच्या कलाकारापर्यंत पोहोचायची. कित्येकदा ही ‘दाद’ कलाकाराला ऐकणारा, पाहणारा रसिक कसा आहे त्यावर अवलंबून असते. म्हणूनच की काय सध्याच्या पिढीच्या रसिकतेनुसार त्यांची उत्स्फूर्त ‘दाद’ही वेगवेगळ्या रूपात अवतरते आहे!

एखाद्या कवितेचे वाचन सुरू होते, श्रोता अंतर्मुख होतो, कधी कवितेच्या सुरुवातीलाच, कधी मध्यावर तर कधी शेवटी तो (‘अर्थात’ कविता आवडली असल्यास) दाद देतो. त्याची दाद कधी टाळ्यांतून व्यक्त होते. कधी ‘वाहवा’तून तर कधी गंभीर शांततेतून. परंतु कवीला हे नक्कीच कळते की आपली लाडकी कलाकृती या श्रोत्यांकडून स्वीकारली गेली आहे आणि नकळत तो आतून सुखावतो. अनेक उर्दू मुशायऱ्यांमध्ये खिसा भरून आलेले लोक जाताना आजही आनंदाने रिकामे होऊन जातात. आणखीन पुढची पायरी म्हणजे लोक अक्षरश: या कलाकृतींवर बेहद्द खूश होऊन स्वत:ची वस्त्रंदेखील अंगावरून फाडून मुक्त आनंद व्यक्त करतात. त्या ‘दाद’ देण्याचा आवेग इतका जबरदस्त असतो की स्वतचीही तमा बाळगली जात नाही.

आता कदाचित वाचकांना प्रश्न पडला असावा की ‘हो ठीक आहे. पण हे सांगायचे प्रयोजन काय?’ प्रयोजन आहे; आजच्या तारखेला या दाद देण्याचेही नवनवीन ट्रेंड्स अस्तित्वात आलेत, नवनवीन पद्धती तरुणाईत रुजू होतायेत. सुरुवातीलाच उदाहरण द्यायचे झाले तर कॅफेजमध्ये, क्लब्समध्ये कवितेसाठी वाहून घेतलेल्या खुल्या मंचाचे देता येईल. ठिकठिकाणी असे ‘खुले मंच’ अविरतपणे कवितेची मनापासून सेवा करत आहेत. आज एखाद्याला आपल्या कलाकृतीतून व्यक्त होणे पूर्वीसारखे अवघड नाही.

मुळात आज माणसांमध्ये बंदिस्तपणा उरला नाही. किंबहुना ‘खुलके जिओ’ हाच आजच्या काळाचा ‘मंत्रा’ आहे त्यामुळे एकीकडे हीच कवितांना टिचक्या वाजवून दाद देणारी तरुणाई दुसरीकडे एखाद्या गाण्याला दाद देताना स्वत:हून थिरकायलाही लागते. एखादे रोमँटिक गाणे कुणी ऑर्केस्ट्रा किंवा इतर कार्यक्रमात गाऊ लागला तर त्याच्या गाण्यातून प्रभावित होत, ओळख असो नसो आजूबाजूला असणाऱ्या त्यातल्या त्यात आवडलेल्या व्यक्तीला ‘टं८ क?’ म्हणून स्वतच्या तालावर नाचायला भाग पाडते. बऱ्याचदा ते ‘टं८’ पुढच्या अनेक गोष्टींची नांदी ठरतं. (ती गोष्ट आणखीन निराळ्या लेखाचा विषय आहे). परंतु तूर्तास ज्या व्यक्तीला विचारणा होते ती व्यक्ती मग इथे ती किंवा तोचा प्रश्न नाही. तिला नाहीदेखील म्हणता येत नाही. कारण शेकडो जणांसमोर ही विचारणा झालेली असते. त्यामुळे कुणाचीही भीड न बाळगता आपोआप दोघे मिळून त्या गाण्यावर थिरकू लागतात, आपल्याला ते गाणं भावलं आहे हे सहजपणे गाणाऱ्यापर्यंत पोहोचवत एक वेगळाच माहौल तयार करतात. (कधीकाळी चित्रपटांतून दिसणारे हे दृश्य आज अनेक ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळते.)

आजच्या ‘डिजिटल’ युगात वावरताना किंवा बऱ्याचदा ऑनलाइन असताना, एक चिन्हं सतत खुणावते आणि ते म्हणजे  ‘#’ हॅशटॅग. एखादी पोस्ट कुणाला भावते, तो सरळ हे हॅशटॅग नामक चिन्हं घेऊन, त्या भल्या मोठय़ा पोस्टचे, फोटोचे एखाद् दुसऱ्या शब्दांत संक्षिप्त रूप तयार करून ती व्हायरल करतो. हीच पोस्ट पुढे सरकत सरकत जगभर पसरते आणि त्या गोष्टीचा तात्पुरता ‘ट्रेंड’ बनतो. त्यालाच या डिजिटल भाषेत ‘ट्रेंिडग’ म्हटलं जातं. आता हा प्रकार ‘दाद’ या प्रकारात मोडतो की नाही यावर करणारे वाद नक्की करू शकतात, परंतु कुठल्याही प्रकारचा ध्वनी, हालचाल नसणारी, तरीही एखादी गोष्ट भिडल्यामुळे तंत्रज्ञानाच्या लेखणीतून उतरलेली जगद्व्यापी, कुठल्याही सीमा नसणारी ही दादच आहे असं म्हणावे लागेल. या सोशल मीडियामध्येच आपण आता प्रवेश केला आहे, तर आता जगप्रसिद्ध झालेला तो अंगठा म्हणजेच फेसबुकचे ‘लाइक ’ बटणही याच ‘दाद’ देण्याचे सगळ्यात सोप्पे मध्यम आहे, असे मानायला आज हरकत नाही. मात्र जे सोप्पे ते न करता सतत वेगळं काहीतरी चोखाळण्याचा अट्टहास आज या माध्यमावर अनेक नवीन पर्याय निर्माण करत आहेत. ‘शाउट आउट’ हा दाद देण्याचा आणखी एक नवीन प्रकार इथे रुजू झाला आहे. कित्येकदा सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला की तो पाहा.. असे सांगणारे संदेश अगदी करण जोहर, रितेश देशमुख अशी तमाम ‘भाई’ची सहकारी मंडळी ट्विटर, इन्स्टाग्रामवरून टाकताना दिसतात. यालाच ‘शाउट आउट’ म्हणतात. अर्थात, हा दाद देण्याचा प्रकार सेलिब्रिटींमध्ये जास्त वापरला जातो. मात्र तरुणाईत हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. डिजिटल माध्यमावर जे जे लोकप्रिय ते ते व्यावसयिक करत अर्थकारणाचे साधन बनवण्याची मात्रा या ‘शाउट आउट’लाही लागलेली असली तरी सर्वसामान्यांमध्ये आपापल्या मित्रमैत्रिणीला त्याच्या सर्जनशील कामाची पावती देण्यासाठी सहज या प्रकाराचा वापर केला जातो.

जाहीर कार्यक्रमांमधून, लाइव्ह कॉन्सर्ट्समधून फिरताना ही बदलती ‘दाद’ वेगवेगळ्या प्रकारे समोर येते. एखाद्या सभागृहातून तुम्हाला जर एकच आरडाओरडा ऐकू आला तर लगेच १०० किंवा १०१ नंबर डायल करू नका. त्या सभागृहात जरा डोकावून या, कारण आम्ही तरुण नुकत्याच सादर झालेल्या रॉकपॉप गाण्याला ‘दाद’ देत आहोत. होय, समोरच्या कलाकृतीचा वेगदेखील आमच्या दाद देण्याची प्रक्रिया पालटू शकतो. ज्या आवेशात ही पाश्चात्त्य गाणी सादर होतात तो आवेश आमच्या धमन्यांतून त्याक्षणी वाहू लागतो, इलेक्ट्रिक गिटारचा टणत्कार आम्हाला बेभान करून सोडतो आणि त्यातून प्रोत्साहित होऊन आतून येणारा प्रतिसाद ही कदाचित धुंद किंकाळीही असू शकते. ही ‘दाद’ एकदम निराळी जी समोरच्यालाही दुप्पट ऊर्जा देऊन सादरीकरणाचे अत्युच्च टोक गाठायला मदत करते. पाश्चात्त्य देशांत याचे नवनवीन थक्क करणारे प्रकार पाहायला मिळतात. शकिरासारख्या जगप्रसिद्ध गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये तिच्या गाण्यांना दाद म्हणून काहींनी चपलांचे जोड काढून स्टेजवर ठेवले होते. एकेकाळी कार्यक्रम बिघडला की स्टेजवरच्या कलाकाराला चपलांच्या हारापासून सडक्या टोमॅटो-अंडय़ांचा मार खावा लागे. आता मात्र हे समीकरण बदललं असून आदराची भावना म्हणून आपल्या चपला काढून बाजूला ठेवण्याचा प्रघात रूढ होऊ पाहतोय.

अशा प्रकारची दाद आपल्यासाठी अनाकलनीय असली तरी शेवटी ‘दाद’ हे कुठल्याही तळमळीने घातलेल्या हाकेला दिलेले उत्तर असते. मग आजची तरुण पिढी ते उत्तर टिचक्या वाजवत, हॅशटॅग वापरून किंवा मग बेंबीच्या देठापासून ओरडत देत असेल, त्यांची भावना मात्र समोरच्याचे कौतुक करून त्याला प्रोत्साहित करण्याची असते यात शंका नाही. कुठलेही किल्मिष नसणारी खरी निखळ दाद ही कुठल्याही स्वरूपात दिली, तरी समोरच्याला त्यातला मथितार्थ नक्की कळतो आणि तो मनातून सुखावतो हेदेखील तितकेच खरे. तेव्हा दाद ही वाहवा, क्या बात किंवा सर्वस्व उधळून धन्य होणारी जितकी आकर्षक दिसते, तितकीच आजची अनोखी, नवखी, अजून तितकीशी न रुळलेली परंतु मनापासून दिलेली विविध प्रकारांतील दादही ‘ये हृदयीचे ते हृदयी’ आवर्जून पोहोचते. शेवटी काय हो.. निखळ ‘दाद’ देणं आणि निर्मळपणे ती घेणं या दोन्ही आनंदाच्या दोन शक्यता आहेत. काल, आज किंवा उद्या पद्धत कुठलीही रुजली तरी त्यामागची भावना चिरंतन राहणार आहे. ‘दाद’ देणे हीसुद्धा शेवटी कलाच आहे आणि ती नवनवीन स्वरूपांत अनुभवणं ही खरी मजा आहे!

टिचक्यांची दाद!

पहिली म्हणजे नवकवींच्या अनेकविध विषयांवरील कविता आणि दुसरी म्हणजे या कविता वाचनादरम्यान वाजणाऱ्या आश्चर्यकारक ‘टिचक्या’! आपण जर अशा प्रकारच्या सत्रात पहिल्यांदा सहभागी होत असाल, तर नक्कीच सुरुवातीला आपला गोंधळ उडू शकतो. हे मध्येच ‘टिचक्या’ वाजवणं म्हणजे लोकांना होतंय तरी काय? एखाद्या भावलेल्या ओळीला तुम्ही उत्स्फूर्तपणे बिचकत टाळी वाजवाल, पण स्वत:च शरमून ती टाळी पुन्हा खिशात ठेवून द्याल, कारण तुमच्याकडे रोखल्या गेलेल्या नजरा.. का तर आजूबाजूला वाजणाऱ्या त्या साध्यासुध्या ‘टिचक्या’ नसून ती त्या कवीला दिली जाणारी ‘दाद’ आहे!

viva@expressindia.com

First Published on June 30, 2017 5:41 am

Web Title: love songs open minded