केवळ निकालांच्या बाबतीतच नव्हे तर वर्षभर सतत कुठले ना कुठले तरी नियम बदलत राहतात आणि त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागतात. सातत्याने आणि अचानकपणे बदलत राहणारे हे नियम आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ हे राज्यभरातील चित्र असंच कायम राहणार का?

मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा गोंधळ झाला तेव्हा व्हॉटस् अ‍ॅप, कॉलेजचे कॅम्पस, शिक्षकांचे स्टाफरूम आणि मुंबई विद्यपीठाचे संकेतस्थळ सगळीकडेच प्रचंड गोंधळलेले, प्रसंगी वैतागलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे चेहरे दिसत होते. कॅम्पसमध्ये एरव्ही परीक्षेच्या काळातही जाणवत नाही एवढा तणाव होता. वर्षभराच्या मेहनतीनंतर पदरात गोंधळ पडणार असेल तर विद्यार्थ्यांचा राग साहजिक आहे मात्र केवळ निकालांच्या बाबतीतच नव्हे तर वर्षभर सतत कुठले ना कुठले तरी नियम बदलत राहतात आणि त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागतात. सातत्याने आणि अचानकपणे बदलत राहणारे हे नियम आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ हे चित्र असंच कायम राहणार का?

गेल्या वर्षीच मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रम बदलला त्यामुळे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. दोन्ही सेमिस्टर मिळून एम. कॉमच्या पीजीच्या पहिल्या वर्षांत दोनपेक्षा जास्त विषयांत नापास न झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळू शकतो असा नियम आहे, पण अजूनही पहिल्या वर्षांचा निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मुलांचे वर्ष वाया जाऊ  नये म्हणून खरे तर मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतला होता. त्याआधी विद्यापीठाने नवीन करेक्यूलम आणले होते ज्यात २५ गुण हे फक्त कॉलेजकडूनच दिले जातील. त्यात प्रोजेक्ट, आयवी, जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप महत्त्वाच्या होत्या कारण त्यावर हे २५ गुण अवलंबून होते. त्या वेळी मुंबई विद्यापीठाचे पहिल्या वर्षीचे बरेच विद्यार्थी नापास झाले आणि त्यांनी बदलेल्या अभ्यासक्रमामुळेच हे झाले असल्याचा दावा केला. या आणि अशा अनेक घटनांनी सध्या विद्यार्थी धास्तावले आहेत.

हजेरीपट, एटीकेटीच्या परीक्षा, अभ्यासक्रम, परीक्षांच्या तारखा, निकाल, परीक्षांचे स्वरूप यासंदर्भात बदलत जाणारे नियम हा एक महत्त्वाचा भाग आहे. फक्त विद्यपीठच नव्हे तर अनेक प्रवेश परीक्षांचे बदलत जाणारे नियम, कॉलेजतर्फे बदलत जाणारे नियम त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपासून कॅम्पसमधील वातावरण, अभ्यासाला मिळणारा वेळ, इतर उपक्रमांमध्ये परीक्षांच्या बदललेल्या नियमांमुळे अभ्यासाचा येणारा असलेला ताण हे सध्याचे चित्र आहे. या परिस्थितीत विद्यार्थी किती जागरुक आहेत? या बदलत्या परिस्थितीत त्यांची स्वत:ची तयारी कशी असली पाहिजे, शिक्षकांची याबाबतीतली मते काय, असे अनेक मुद्दे समजून घ्यायला हवेत.

सतत नियम बदलांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो का? तसेच राज्यस्तरावर परीक्षा, उपस्थिती आणि अभ्यासक्रमाबाबत वेगवेगळे नियम लागू करावेत का, याबद्दल राज्यभरातील शिक्षकांची वेगवेगळी निरीक्षणे आहेत. ‘परीक्षांचे डिजिटायझेशन होणे गरजेचे आहे. शिक्षकांनी परीक्षांची तयारी मुलांकडून करून घेणेही गरजेचे आहे. मुळात नियम बदलले की त्याची मुलांना योग्य पद्धतीने माहिती व्हायला हवी,’ असे मत नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका स्नेहा देशपांडे यांनी व्यक्त केले. ‘नागपूर विद्यपीठात पूर्वी शंभर मार्काच्या लेखी परीक्षेचा पॅटर्न होता, आता तो प्रॅक्टिकलच्या मार्कासोबत ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुलांच्या मार्कामध्ये वाढ झाली. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञानही वाढावे म्हणून काही नियम बदलावे लागतात मात्र राज्यभरातील विद्यापीठांमधून यासंदर्भात एकच एक नियम असायला हवा,’ अशी गरजही त्यांनी बोलून दाखवली.

नियम बदलल्यानंतर नवीन परीक्षेच्या पॅटर्नला तोंड देताना विद्यर्थ्यांना आपल्या किती मेहनत घ्यायला हवी, याची जाणीव असायलाच हवी. कित्येकदा उद्या परीक्षा आणि आज अभ्यास ही पद्धत विद्यार्थ्यांकडून अवलंबिली जाते. त्यांनी वर्षांच्या सुरुवातीपासूनच अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापक प्रशांत पगारे यांनी व्यक्त केले. आमच्या कॉलेजमध्ये परीक्षेचा पॅटर्न एकच वार्षिक परीक्षा असा होता, नंतर तो सेमिस्टरवाइज् केला, मग आम्ही मुलांना परीक्षेची ही नवी तयारी कशी करावी यासाठी मार्गदर्शन केले. कारण पूर्वी एकच द्यावी लागणारी परीक्षा आता दोनदा द्यावी लागणार होती. नियम बदलावे लागत असले तर त्याचा सकारात्मक प्रभाव कसा होईल याकडे आमचा कल असतो. मुळात केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून राहणारे विद्यार्थी आजूबाजूला काय सुरू आहे हे जाणूनच घेत नाहीत. अगदी यूपीएस्सीची परीक्षा देणारे विद्यार्थीही रोजचे वर्तमानपत्र वाचत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना अचानक केलेल्या नियमांचा त्रास होणे साहजिक आहे. नियम बदलणे ही शेवटी व्यवस्थापनाची गरज असते. मात्र अनेकदा नियम बदलताना त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर कसा होईल, याचा विचार करूनच बदलले जातात, असेही पगारे यांनी सांगितले. नियम बदलणे हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गरजेचे ठरते, हा मुद्दा रुईया कॉलेजच्या प्राध्यापक गायत्री लेले यांनीही मांडला. नियम का बदलले जातात हे स्पष्ट करताना त्यांनी कॉलेजमधील मुलांच्या उपस्थितीच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले. मुलांनी कॉलेजच्या पदवी अभ्यासक्रमाकडे लक्ष देणे गरजेचे असते मात्र स्पर्धा परीक्षांचे महत्त्व वाढल्याने त्यांच्यावरच मुले जास्त भर देतात. मग कॉलेजला दांडय़ा मारल्या जातात. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये यावे, शिक्षकांशी संवाद साधावा ही अपेक्षा असते. त्यांनी शिस्त पाळायला हवी. पूर्वी शंभर मार्काची परीक्षा पद्धती असल्याने विद्यार्थ्यांची अनुपस्थिती मोठी होती. आमचे कॉलेज स्वायत्त झाल्यामुळे आम्ही नियमात बदल केले. आता ६०-४० असा पॅटर्न केला आहे त्यापैकी ४० मार्क्‍स आमच्या हातात असल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजमधील उपस्थिती आवश्यक ठरते. त्यामुळे नियम हे अनेकदा विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने बदलावेच लागतात, असे लेले यांनी स्पष्ट केले.

बदलत्या नियमांचा वाईटच परिणाम होतो असे मानण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करणारे अनेक विद्यार्थी आहेत. ‘अ‍ॅड्. बाबासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ’ची विद्यार्थिनी सलोनी लिमये म्हणते, लॉ कॉलेजचे नियम काही करून बदलले जात नाहीत कारण ते सुरुवातीपासूनच निश्चित केलेले आहेत. नियम बदलायचे असतील तर तो निर्णय सर्वस्वी बार काऊन्सिल ऑफ इंडियाचा असतो. त्यामुळे आम्ही सगळे नियम नेमाने पाळतो.’ तर अचानक नियम बदलल्यावर आम्ही कॉलेजला एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निदर्शनास आणून देतो. नियम बदलले जातात ही एका अर्थी आम्हा विद्यार्थ्यांसाठी चांगलीच बाब असते, असे मत महाविद्यालयीन विद्यार्थी व्यक्त करताना दिसतात. नियम बदलले तरी त्याचा होणारा सकारात्मक परिणाम मुले लक्षात घेत नाहीत हे विद्यार्थी स्वत: मान्य करतात. पुण्याचा बी.एम.सी.सी. कॉलेजमध्ये शिकणारा अंजिक्य भालेराव सांगतो की, पुणे विद्यापीठात नियम तसे फारसे बदलत नाहीत. कॉलेज स्वायत्त झाल्यामुळे करेक्युलम बदलले. त्यामुळे अभ्यासक्रमही बदलला, परंतु या बदलेल्या नियमांमुळे खूप चांगल्या पद्धतीने अपडेट राहता येते. बाहेरच्या जगात त्याचे चांगले अ‍ॅप्लिकेशन करता येते. प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात तसेच नियमांचेही आहे. नियम बदलले तर त्यांचा दोन्ही बाजूंनी आपण विचार केला पाहिजे, असे अिजक्य सांगतो. एकूणच नियम बदल हे आवश्यक आहेत याबद्दल राज्यभरातील शिक्षक, विद्यार्थी यांचे एकमत आहे. केवळ त्याबद्दल जागरूक असणे, विद्यार्थ्यांना वेळीच त्याची माहिती करून देणे आणि विद्यार्थ्यांनीही बदलती परिस्थिती लक्षात घेऊन आपली अभ्यासाची पद्धत बदलणे गरजेचे असल्याचा सूर व्यक्त होत आहे.

..नक्की त्रास काय?

बदलणाऱ्या नियमांचा परिणाम विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांवरही होतो. विद्यापीठाच्या परीक्षा प्रचंड असल्याने अनेकदा शिकवणे मागे पडते. अशा वेळी कॉलेजकडे काही मार्क्‍स राखीव असले पाहिजेत, असे वाटते. शिवाय प्रोजेक्ट, असाइन्मेंटच्या निमित्ताने मुले कॉलेजला येतात त्यामुळे ७५ टक्के उपस्थितीची असणारी गरज तरी नियमाने पाळली जाते. पण तरीही नियम तेव्हाच जास्त पाळले जातील जेव्हा कॉलेजमध्ये शाळेसारखे वातावरण निर्माण होईल. सतत बदलत जाणाऱ्या नियमांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात पालकांची व एक मेन्टॉर म्हणून शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.

श्रेया चवरकर, साहाय्यक प्राध्यापिका, एम.डी. कॉलेज

viva@expressindia.com