मोबाइल चार्जिंग करताना त्यावर बोलू नये याबद्दलचे भान अनेकांना आले असले तरी इतर गॅजेट हाताळतानाही अशी काळजी घेणे गरजेचे आहे. मोबाईलनंतर सर्वाधिक वापर होणाऱ्या गॅजेटमध्ये लॅपटॉपचा क्रमांक वरचा लागतो. चार्जिंगला लावलेल्या लॅपटॉपवर काम करताना विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे घरामध्ये लॅपटॉप वापरताना कोणती काळजी घ्यावी याविषयीच्या खास टीप्स…

गादी किंवा उशीवर ठेऊन वापर नको

सर्वच लॅपटॉपच्या खालच्या बाजूला व्हेंटिलेटर्स असतात. लॅपटॉप जर सरळ गादी किंवा उशीसारख्या पृष्ठभागावर ठेऊन काम केल्यास त्यामधील हवा खेळती राहत नाही. यामुळे लॅपटॉप तापतो. काही वेळेस यामुळे आग लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे गादी किंवा उशीवर लॅपटॉप ठेऊन काम करणे टाळावे.

चार्जिंग सुरु असताना काम नको

कोणत्याही डिजीटल वस्तूला चार्ज करत असताना त्याचा वापर टाळावा. लॅपटॉपवर चार्जिंग सुरु असताना काम करणे अनेक अर्थाने धोकादायक ठरू शकते. अगदी शॉक लागण्यापासून ते छोटा स्फोट होण्यापर्यंत काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच चार्जिंगची पीन काढल्यानंतरच लॅपटॉपचा वापर करावा.

लॅपटॉप थेट मांडीवर नको

अनेकदा घरात लॅपटॉप वापरताना आपण तो मांडीवर घेतो. त्यातही अनेकदा आपण घरच्या कपड्यांवर म्हणजेच हाफ पॅण्ट किंवा पायजम्यावर असल्यास थेट शरिराशी लॅपटॉपच्या बेसचा संबंध येतो. अशा परिस्थितीत जास्त वेळ काम केल्यास लॅपटॉप तापल्याने चटका बसणे, भाजणे यासारख्या शारिरिक इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लॅपटॉप थेट मांडीवर घेण्याऐवजी खाली पाट किंवा लाकडी फळी किंवा अगदी रायटिंग पॅड ठेवणे फायद्याचे ठरते.

जास्त वाकू नका

लॅपटॉप वापरताना सतत मान खाली घालून काम केल्याने मानेचा किंवा पाठीचा कणा दुखण्याचा त्रास होतो. यासाठी उपाय म्हणून लॅपटॉपची स्क्रीन अॅडजेस्ट करणे, किंवा टेबलवर लॅपटॉप ठेऊन काम करणार असला तर लॅपटॉप आणि तुमची बसण्याची लेवल योग्य पद्धतीने ठेवावी. खुर्चीवर बसताना उशी घेणे, खुर्ची टेबल जवळ ठेऊन ९० अंशात हात येतील अशा पद्धतीने ताठ बसून काम करणे योग्य ठरते.

अंधारात वापर नको

सर्व दिवे बंद करून अंधारात लॅपटॉप स्क्रीनच्या उजेडात काम करणे टाळा. लॅपटॉपमधून निघणारा प्रकाश जास्त वेळ थेट डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. मंद उजेडात किंवा पूर्ण उजेडातच लॅपटॉप वापरलेला डोळ्याच्या आरोग्यासाठी योग्य असते.

याशिवाय लॅपटॉपच्या आजूबाजूला खाण्यापिण्याचे पदार्थ न ठेवणे, लॅपटॉपला अॅडिश्नल कि बोर्ड किंवा माऊस लावून तो डेक्सटॉप पीसीसारखा वापरणे, चार्जिंगवरून काढताना थेट चार्जरची वायर न खेचता योग्य पद्धतीने ती काढणे, जास्त वेळ काम करत असल्याचे लॅपटॉप स्क्रीनमुळे डोळ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे यासारख्या गोष्टींमुळे लॅपटॉपचा वापर अधिक सुरक्षित करता येईल.

सौजन्य – टॉक ऑफ वेब