नवीन वर्ष सुरु झाल्यावर विविध बाबतीत काय करता येईल याचा विचार सुरु होतो . येणाऱ्या वर्षात आर्थिक नियोजन कसे करायचे असा विचार जर तुम्ही करत असाल तर ते अतिशय चांगले आहे. असे केल्याने तुमचे वर्ष अधिक चांगल्या पद्धतीने साजरे होऊ शकते. या लेखामध्ये असे ६ संकल्प दिलेले आहेत जे तुम्हाला नवीन वर्षात मदत करतील. पाहूयात काय आहेत हे संकल्प…

डिजिटल व्हा

आपल्यापैकी काही लोक स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचे महत्वाचे कागदपत्र अजून सांभाळून ठेवण्यात बराच वेळ घालवतात. भारताचे अर्थकारण चलनबंदीमुळे बदलले आहे, आणि डिजिटल मार्ग पत्करणे हाच उत्तम मार्ग होय. तुमचे वीज आणि फोनचे बिल भरण्यापासून विमा पॉलिसी घेणे किंवा इतर गुंतवणुकी करण्यापर्यंत सर्व कामांसाठी डिजिटल मार्गच योग्य होय. ऑनलाइन व्यवहारांचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्हाला विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर तुम्ही विविध प्रकारच्या पॉलिसींची तुलना ऑनलाइन करू शकता आणि तुमच्यासाठी योग्य अशी पॉलिसी निवडू शकता. अशाने तुमचा वेळ ही वाचेल आणि कागदपत्रे सांभाळण्याचे कामगी.

आरोग्य विमा उतरून घ्या

आरोग्य हीच संपत्ती हे आपण सर्वांना माहीत आहे. तरीही आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि यासाठी प्रयत्न करीत नाही. वाढत चाललेल्या वैद्यकीय खर्चांमुळे एक चांगली आरोग्य विमा पॉलिसी घेणे गरजेचे आहे ज्याने तुम्ही अचानकपणे येणाऱ्या वैद्यकीय खर्चांच्या काळजीतून मोकळे होता. दवाखान्यात राहावे लागणे किंवा अकस्मात वैद्यकीय खर्चांसाठी विमा करून घेणे उत्तम. तुम्ही विनारोख (कॅशलेस) आरोग्य विमा प्लॅन घेऊ शकता. त्यामुळे दवाखान्यात दाखल होताना तुम्हाला आपल्या खिशातून पैसे देण्याची गरज पडत नाही. जर तुम्हाला एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता असेल, तर तुम्ही मोठ्या रकमेचा विमा किंवा क्रिटिकल इलनेस कव्हर घ्यायलाच हवे.

टर्म आयुर्विमा पॉलिसी घ्या

आयुष्याचे काही खरे नसते – अपघात, मृत्यू किंवा अपंगत्व आजकाल कसेही येऊ शकते. जर तुम्ही कुटुंबाचे कमावते सदस्य आहात, तर तुम्ही टर्म आयुर्विमा पॉलिसी घेणे फार गरजेचे आहे. या पॉलिसीद्वारे तुमच्या नामित व्यक्तीला तुमच्या अकस्मात मृत्यूच्या वेळी एकरकमी विमाधन मिळते. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या गरजा या पैशाने भागवल्या जाऊ शकतात. त्यामुळे विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे.

संपत्ती निर्माण करण्यासाठीच असलेल्या गुंतवणुकी करा

हा संकल्प तुमचे लक्ष लगेच वेधून गेईल कारण प्रत्येकालाच वाटते की संपत्ती निर्माण करावी. आपल्या पैशाची गुंतवणूक अशा प्रकारे करा ज्याने परतावा अधिक मिळेल. आता स्थावर मालमत्ता किंवा सोने यांच्यात गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याचे दिवस गेले. स्थावर मालमत्ता बाजारात तसेच सोन्याच्या किमतीत आता फार घट-बढ व्हायला लागलेली असल्यामुळे आता लोक गुंतवणुकीसाठी एसआयपीचा आधार घेत आहेत कारण यात परतावा अधिक आहे. उदाहरणार्थ, सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) तुम्हाला एक्विटी म्युच्युअल फंडमध्ये मध्ये गुंतवणूक करणे सोपे करते. हा गुंतवणुकीसाठी एक शिस्तबद्ध असा मार्ग आहे ज्यात दीर्घ कालावधीसाठी चक्रवाढीने गुंतवणूक झाल्यामुळे परतावा चांगला मिळतो.

उत्तम क्रेडिट स्कोअर असू द्या

उत्तम क्रेडिट स्कोअर असल्याने उच्च शिक्षणासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे तुम्हाला सोपे पडेल. तसेच क्रेडिट स्कोअर कमी असल्याने तुम्हाला अधिक कर्ज मिळणार नाही ज्याने तुमचे भवितव्य खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सतत पाहात राहाणे आणि त्यात सुधारणा करणे फार गरजेचे आहे.

चाणाक्षपणे कर्ज घ्या, परतफेड ऑटोमेट करा आणि देणी परत करा

आणीबाणीच्या वेळी आपण विचार न करता उसने किंवा कर्ज घेत सुटतो, ज्याने नंतर आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. कर्ज अवश्य घ्या, पण अविचारी कर्जदार होण्यापेक्षा चाणाक्ष कर्डदार होणे केव्हाही उत्तम. परतफेडीचे व्यवहार सोपे आणि वेळेवर करण्यासाठी तुम्ही ऑटो-परफेडीचा पर्याय निवडू शकता. कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण टाळण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्डावरील रकमेची परतफेड वेळेवर करण्याचा संकल्प सोडा.

नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये आर्थिक बाबींचा समावेश करणे फार गरजेचे आहे कारण पै-पै साठवूनच आपण संपत्ती निर्माण करीत असतो. म्हणूनच तुम्हाला २०१८ मध्ये जीवनाची आर्थिक घडी नीट बसविण्यासाठी वरील संकल्प फार कामास येतील.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार