काही दिवसांपूर्वी रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जगातील अनेक कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. त्यानंतर आता रिलायन्स रिटेल या कंपनीत जगातील आघाडीची टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्वर लेक गुंतवणूक करणार आहे.

सिल्वर लेक ही कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, अशी माहिती बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देण्यात आली आहे. ७,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे सिल्वर लेकला रिलायन्स रिटेलमध्ये १.७५ टक्के हिस्सा मिळेल.

यापूर्वी सिल्व्हर लेकने रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये १० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. कंपनीने दोन टप्प्यांमध्ये ही गुंतवणूक केली होती. पहिल्या टप्प्यात कंपनीने ५ हजार ६५५ कोटी रूपयांची आणि त्यानंतर ४ हजार ५४६.८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

सिल्व्हर लेक ही एक अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे. तंत्रज्ञान आणि त्या संबंधित उद्योगांमध्ये ही कंपनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते. १९९९ मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून आतापर्यंत जगातील मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकदारांपैकी एक कंपनी असल्याचं म्हटलं जातं. सिल्व्हर लेकनं अलीबाब समूह, डेल टेक्नॉलॉजी, स्काईप आणि गो डॅडीसारख्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.

 अनेक क्षेत्रांमध्ये आपलं वर्चस्व असलेले मुकेश अंबनी आता रिटेल क्षेत्रातही आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी फ्युचर समुहाच्या रिटेल व्यवसायाची २४ हजार ७०० कोटी रुपयांना खरेदी केली होती. तसंच रिलायन्स जिओप्रमाणेच मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी ते जगातील मोठ्या गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याची तयारीही करत असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी फेसबुकसोबतच अनेक दिग्गज कंपन्यांनी रिलायन्स समूहाच्या जिओ प्लॅटफॉर्म्स मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.