हेडफोन्स आणि आपले अगदी जवळचे नाते असते. घराबाहेर पडले की अगदी सहज आपण हेडफोन्स कानात घालतो. मग कधी ते कुठेतरी विसरतो आणि हरवतात. तर कधी प्रवासादरम्यान ते आपल्याकडून पडतात. मग ते शोधता शोधता आपण हैराण होतो पण हेडफोन्स काही केल्या सापडत नाहीत. अशा महिलांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता हेडफोन्स हरविण्याची चिंता महिलांना राहणार नाही. कारण कानातल्यासारखे हेडफोन्स आता बाजारात दाखल झाले आहेत. कानातलेच वाटतील असे हे हेडफोन अगदी सहज बाळगता येऊ शकतात. या हेडफोनला ब्लूटूथ देण्यात आली असून ज्यांचे कान टोचलेले आहेत ते याचा वापर करु शकतात. असे अनोख्या पद्धतीचे हेडफोन्स तयार करणाऱ्या कंपनीचे नाव आहे स्कॅंडी इलेक्ट्रॉनिक्स असे आहे.

या हेडफोन्सला स्विंग्स म्हणतात तसेच ते हुबेहुब कानातले वाटतात. आता याचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी तुम्हाला कानातल्याला अडकवलेले खालच्या बाजूचे इयरबडस काढून ते कानात घालावे लागतील. इतर वेळी ते कानातल्याच्या खालच्या बाजूला अडकवून ठेवू शकता. विशेष म्हणजे यामध्ये याला असलेल्या मोशन अॅक्सिलरेटरमुळे हे इयरबडस कानात घातले की त्याचे आवाज येण्याचे कार्य सुरु होईल. यामध्ये सध्या दोन प्रकार उपलब्ध असून पहिला प्रकार हा सामान्य ग्राहकांसाठी असेल. हे इयरबडस पांढऱ्या रंगाचे असून त्याची मेटल बॉर्डर तुम्ही वेगवेगळ्या रंगाची निवडू शकता. याची किंमत १२,२६० रुपये इतकी आहे.

दुसरे इयरबडस हे थोडे स्पोर्टी लूक देणारे आहेत. त्यात सध्या काळा रंग उपलब्ध असून त्यात लाल, पिवळा, गुलाबी, जांभळा असे रंगही उपलब्ध आहेत. याची किंमत थोडी कमी असून ८,८३५ इतकी आहे. हे हेडफोन्स एकदा पूर्ण चार्ज केले की ५ तास चालतात. मात्र हे हेडफोन्स वॉटरप्रूफ नसल्याने पाऊस आल्यास ते भिजून खराब होऊ शकतात. त्यामुळे येत्या काळात हे हेडफोन्स फॅशन स्टेटमेंट बनले तर त्यात नवीन नसेल. तसेच हेडफोन हे केवळ यंत्र नसेल तर ते दागिन्यांचा एक भाग होईल.