आघाडीची टेक कंपनी Apple ने काही iPhone च्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max, iPhone 8 आणि iPhone 8 Plus महाग झालेत. 64GB स्टोरेज असलेल्या आयफोन 11 प्रो मॅक्सची किंमत आता एक लाख अकरा हजार दोनशे रुपये झालीये. तर, 256GB स्टोरेज मॉडेलची किमत 1,25,200 रुपये झाली आहे. याशिवाय 512 जीबी स्टोरेज व्हेरिअंटसाठी आता 1,43,200 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी आयफोन 11 प्रो मॅक्सच्या बेसिक व्हेरिअंटची(64GB)किंमत 1,09,900 रुपये होती.

जवळपास 1,300 रुपयांची वाढ –
तर, iPhone 11 Pro च्या 64GB व्हेरिअंटची नवीन किंमत आता 1,01,200 रुपये झाली आहे. याशिवाय, 256GB व्हेरिअंटची किंमत 1,15,200 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 1,33,200 रुपये झाली. किंमतीत वाढ होण्याआधी iPhone 11 Pro ची बेसिक किंमत 99,900 रुपये होती. या दोन्ही iPhone ची किंमत जवळपास 1,300 रुपयांनी वाढलीये. याशिवाय, iPhone 8 च्या किंमतीतही वाढ झाली आहे. 64GB स्टोरेज असलेल्या iPhone 8+ ची किंमत आता 50 हजार 600 रुपये असेल. तर, 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 55 हजार 600 रुपये झाली आहे. आधी iPhone 8+ ची बेसिक किंमत 49 हजार 900 रुपये होती, आता यामध्ये जवळपास 700 रुपयांची वाढ झाली आहे.

iPhone 7 आणि iPhone 11 च्या किंमतीत वाढ नाही –
याशिवाय, 64GB स्टोरेज iPhone 8 ची किंमत आता 40 हजार 500 रुपये आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 45 हजार 500 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने भारतातील आपला सर्वाधिक पॉप्युलर iPhone 11 च्या किंमतीत वाढ केलेली नाही. तसेच, iPhone 7 आणि iPhone XR च्या किंमतीतही बदल करण्यात आलेला नाही.

म्हणून वाढवल्या किंमती –
सोशल वेलफेअर सरचार्ज आणि बेसिक कस्टम्स ड्युटीमध्ये (सीमा शुल्क) झालेली वाढ यामुळे अॅपलने काही iPhone च्या किंमतीत वाढ केली आहे. तर, iPhone 7 आणि iPhone XR हे मॉडेल्स मेड इन इंडिया आहेत, त्यामुळे त्यांच्या किंमतीत वाढ झालेली नाही.