विक्रीच्या संख्येपेक्षा अधिक किंमतीवर (व्हॅल्यू) लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी अॅपल कंपनीने भारतात विकल्या जाणाऱ्या चार कमी किंमतीच्या आयफोनची विक्री बंद केली आहे. यात iPhone SE, iphone 6s, iphone 6 आणि iphone 6sPlus यांचा समावेश आहे.

अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर हे चारही फोन आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. तर फ्लिपकार्टवर केवळ आयफोन एसई आणि 6 प्लस या दोनच फोनचा स्टॉक शिल्लक आहे. या चार फोनचा पुरवठा मागील महिन्यापासून थांबवण्यात आला आहे. अॅपल कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर्सच्या सेल्स टीमलाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, भारतात या चार फोनची विक्री थांबवण्यात आली असली तरी अमेरिकेत मात्र अॅपलच्या वेबसाईटवर हे चारही फोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

2018-19 मध्ये कंपनीच्या मिळकत आणि नफेत वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल-जूनमध्ये आयफोन एक्सआरची किंमत कमी झाल्याने अॅपलच्या विक्रीत सातत्याने वाढ झाली होती. महागड्या आयफोन्सवर लक्ष्य केंद्रीत केल्याने कंपनी नफ्यात आली. 2018 च्या आर्थिक वर्षात अॅपलची मिळकत 12 टक्के वाढून 13,097 कोटी रुपये झाली तर कंपनीचा नेट प्रॉफीट देखील वाढून 896 कोटी रुपये झाला. त्यामुळे आता विक्रीच्या संख्येपेक्षा अधिक किंमतीवर (व्हॅल्यू) लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी अॅपल कंपनीने भारतात विकल्या जाणाऱ्या चार कमी किंमतीच्या आयफोनची विक्री बंद केली आहे.