अॅपल या कंपनीच्या विश्लेषकांमध्ये सगळ्यात अचूक अशी ओळख असलेल्या केजीआय सेक्युरेटिजचे मिंग ची कुओ यांनी 2018मध्ये अॅपल तीन आयफोन बाजारात सादर करेल असं म्हटलं आहे. कुओ यांनी आपल्या ग्राहकांसाठी एक अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये 2018 मध्ये आयफोन काय करू शकेल याची माहिती दिली आहे. एका वेबसाईटनं हा अहवाल मिळाल्याचा दावा केला असून या नोटमध्ये काय आहे ते दिलं आहे… काय आहे या अहवालात? कुठली प्रॉडक्ट आणणार अॅपल बाजारात?

6.1 आयफोन एलसीडी डिसप्लेसह
अॅपल 6.1 इंचाच्या डिसप्लेवर काम करत असल्याचं सांगण्यात येतंय. संपूर्ण स्क्रीन डिसप्ले आणि ट्रू डेप्थ सेन्सर्स असतील अशी शक्यता आहे. आयफोन एक्सच्या थ्री डी सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापरही यात करण्यात येण्याची शक्यता आहे. साधारणपणे 3000 mAh या क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये असेल.

कुओंच्या सांगण्यानुसार पेगाट्रॉन, फॉक्सकॉन व विसट्रॉन या तैवानस्थित कंपन्या आयफोनच्या मुख्य असेंब्ली करणाऱ्या कंपन्या असतील. सगळ्यात जास्त काम पेगाट्रॉनला तर त्याखालोखाल फॉक्सट्रॉनला देण्यात येईल असाही अंदाज आहे.

विशेष म्हणजे 6.1 इंची आयफोनचा एलसीडी डिसप्लेसाठी जपान सगळ्यात महत्त्वाचा पुरवठादार असल्याची अफवा आहे. फूल अॅक्टिव्ह एलसीडी डिसप्ले तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून याआधी शाओमीसारख्या कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे.

नेक्स्ट जनरेशन आयफोन एक्स, आयफोन एक्स प्लस
आयफोन एक्सच्या दुसऱ्या पिढीसाठी जास्त क्षमतेची रॅम वापरण्यात येण्याचा अंदाज आहे. कुओंच्या अंदाजानुसार दोन्ही आयफोन्समध्ये 4 जीबीची रॅम वापरण्यात येणार आहे. त्यांची बॅटरी तुलनेने जास्त म्हणजे 3300 ते 3400 mAh क्षमतेची म्हणजे सुमारे 25 टक्के जास्त क्षमतेची असेल असाही अंदाज आहे. अर्थात, आयपोन एक्स हा लो कॉस्ट किंवा कमी किमतीचा फोन म्हणून विकायचा अॅपलचा विचार नसल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला असून स्पेशल एडिशन म्हणून बावही चढेच असतील अशी शक्यता आहे.