डॉ. दीपक पारीख

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारातदेखील बदल झाला आहे. त्यामुळे बदलत्या आहारामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होत आहे. त्यातच आता काही आजारांचं प्रमाणही वाढलेलं दिसतंय. यात कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतं. तरुणांमध्येही आजकाल कर्करोग बळावत असल्याचं दिसून येतं. या वाढीला प्रामुख्याने पर्यावरणीय घटक कारणीभूत आहेत. धूम्रपान करणं घातक आहेच, मात्र पॅसिव्ह स्मोकिंगही (इतरांच्या धूम्रपानाचा धूर श्वासावाटे आपल्या शरीरात येणे) जीवघेणं ठरू शकतं. या दोन्ही प्रकारच्या धूम्रपानाचे दुष्परिणाम २० ते २५ वर्षांनंतर जाणवू लागतात. मात्र जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल केल्यास कर्करोगाचा धोका नक्कीच टाळता येऊ शकतो.

अशाप्रकारे कर्करोगाला ठेवा दूर

१. तंबाखूचं सेवन –

तंबाखू किंवा धूम्रपानामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो. सिगारेट ओढण्याने घशाचा कर्करोग (आठ पटीत), तोंडाचा व श्वासनलिकेच्या आरंभाचा कर्करोग (चार पटीत) तर मूत्राशय व पॅन्क्रियाजचा कर्करोग दोन पटीने होतो. पाईप (चिलीम) किंवा सिगार ओढणाऱ्यांना याचा धोका अधिक असतो. इतकंच नाही तर जे सिगारेट ओढत नाहीत, पण सिगारेट ओढणाऱ्याच्या संपर्कात राहतात, अशांना केवळ सिगारेटच्या धुरामुळे कर्करोग होऊ शकतो. सिगारेटमधील टारमुळे ३०% प्रमाणात कर्करोग होतो. त्यामुळे कर्करोगापासून दूर रहायचं असेल तर तंबाखू खाणं, सिगारेट ओढणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

२. मद्यपान  –

अतिप्रमाणात मद्यपानामुळे यकृताचा कर्करोग तर होतो. तसंच तोंडाचा, घशाचा (अन्ननलिकेचा) ही कर्करोग होतो. दारू पिणारे बहुतांश जणांना सिगारेट किंवा तंबाखूचं व्यसन असतं. मात्र या दोन्ही सवयी घातक आहेत.मद्यपान व धूम्रपान हे एकमेकांना पूरक असल्याने असे पदार्थ टाळण्यानेच कर्करोगाला आळा घालणे शक्य आहे.

३. मसालेदार पदार्थांचे सेवन –

अनेकांना हे माहित नसेल की मसालेदार पदार्थ, गरम पदार्थ यांच्यामुळेही कर्करोगाला आमंत्रण मिळू शकतं. मसालेदार व गरम पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्याने फुफ्फुसे, तोंड, अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो सात्विक, साध्या पद्धतीच्या जेवणाचा आहारात समावेश करावा.

४.अतिनील किरण –

सुर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो. परिणामी त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत उन्हात फिरणं टाळा.

५.नियमित व्यायाम करा –

व्यायाम करणे हे अनेक रोगांवरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बऱ्याच वेळा आपण मेदयुक्त पदार्थांचं सेवन करत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कर्करोगाचा धोका असतो. म्हणून नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँण्ड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दर वर्षी कर्करोगाचे ११,५७,२९४ रुग्ण नोंदविले जातात. सुमारे २२.५ लाख रुग्ण या आजारासह जगत आहेत. त्याचप्रमाणे २०१८ साली कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७,८४,८२१ आहे. डॉक्टर तंबाखू वर्ज्य करण्याचा, व्यायाम करण्याचा, सकस आहार घेण्याचा आणि कर्करोगाची नियमित चाचणी करून घेण्याचा, कुटुंबाची कर्करोगाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याचा आणि वेळेवर लस घेण्याचा सल्ला देतात.

(डॉ. दीपक पारीख, एसीआय कंम्बाला हिल हॉस्पिटलमध्ये हेड अँण्ड नेक कॅन्सर विभागाचे प्रमुख आहेत )