अश्वगंधा या आयुर्वेदिक वनस्पतीने झोपेत चांगली सुधारणा होते असे वैज्ञानिकांचे मत आहे. विथानिया सोमनिफेरा असे या वनस्पतीचे शास्त्रीय नाव असून त्यातील एक सक्रिय घटक झोपेस मदत करतो. या वनस्पतीच्या पानात असलेल्या या घटकामुळे झोप येण्यास मदत होते. जपानमधील सुकुबा विद्यापीठातील वैज्ञानिकांनी अश्वगंधा वनस्पतीचे प्रयोग उंदरावर केले असता त्यांच्या झोपेत सुधारणा दिसून आली आहे. अश्वगंधाच्या पानांचा अर्क पाण्यात मिसळून घेतल्यास त्यात ट्रायइथिलिन ग्लायकॉल म्हणजे टीइजी हे रसायन शरीराला मिळते, त्यामुळे नॉन रॅपिड आय मूव्हमेंट म्हणजे एनआरईएम प्रकारची झोप चांगली सुधारते व रॅपिड आय मूव्हमेंट (आरईएम) प्रकारची झोपही किंचित सुधारते. विथानोलाइड्ससह अल्कोहोलिक अर्क घेतला तर त्याचा झोपेवर काही परिणाम होत नाही. टीईजीमुळे नैसर्गिक झोप येते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एनआरईएम झोप वाढते. संशोधकांच्या मते यामुळे शांत झोप लागते. झोपेवर वनस्पतीजन्य उपचारांची शक्यता त्यामुळे वाढली आहे, असे सुकुबा विद्यापीठातील महेश कौशिक यांनी सांगितले. अश्वगंधा ही आयुर्वेदातील एक प्रमुख वनस्पती असून ती पारंपरिक पद्धतीने भारतात वापरली जाते. तिचे नाव सोमनिफेरा असे आहे व अनेक शतके शांत झोपेसाठी त्याचा वापर केला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 2:36 am