ऑस्ट्रेलियाने दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि गुगलला मोठा झटका दिला आहे. कारण, गुगल आणि फेसबुकला ऑस्ट्रेलियामध्ये आता बातम्यांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या सरकारने संसदेत यासंबंधित एक विधेयक आणलं आहे. ‘न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड’ नावाचं हे विधेयक आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या म्हणण्यानुसार आता गुगल आणि फेसबुकने मीडिया कंपन्यांच्या ज्या बातम्या वापरल्या असतील त्यासाठी पैसे द्यावे लागतील. बातमीच्या आशयासाठी सरकार शूल्क आकारत आहे. “जगातील हा अशाप्रकारचा पहिलाच कायदा ठरणार असून या कायद्यामुळे मीडिया कंपन्यांना गुगल व फेसबुकने वापरलेल्या त्यांच्या बातम्यांसाठी योग्य मोबदला मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री जोश फ्रिडेनबर्ग यांनी दिली.

दुसरीकडे, फेसबुक आणि गुगलने ऑस्ट्रेलियाच्या प्रस्तावित कायद्याचा तीव्र विरोध केला आहे. हा कायदा अस्तित्वात आला तर ऑस्ट्रेलियातील युजर्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर बातम्या शेअर करण्यापासून रोखू, असा इशारा फेसबुकने यापूर्वीच दिला आहे.