बजाज ऑटोने आपली नवी बाइक Bajaj Avenger 160 Street ABS लाँच केली आहे. नव्या सुरक्षा नियमांनुसार कंपनीने ही बाइक अँटी लॉक ब्रेकिंग(एबीएस) सिस्टिमसह लाँच केली आहे. बजाजच्या अॅव्हेंजर 180 या बाइकची जागा आता अॅव्हेंजर 160 स्ट्रिट एबीएस ही बाइक घेणार आहे. 81 हजार 37 रुपये इतकी या बाइकची किंमत असून जुन्या बाइकपेक्षा ही नवी बाइक 7 हजार रुपयांनी स्वस्त आहे.

बजाज अॅव्हेंजर स्ट्रिट 160 एबीएसमध्ये 160सीसी सिंगल सिलिंडर इंजिन वापरण्यात आलं आहे. याच इंजिनचा वापर पल्सर NS160 मध्येही आहे. एअर कुल्ड मोटर 8,500 rpm वर 15bhp पावर आणि 6,500 rpm वर 14.6Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहेत. काळा आणि लाल अशा दोन रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध आहे. बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कॉपिक फोर्क आहे, तर मागील बाजूला ड्युअल शॉक ऑब्जर्बर आहे.

अपघाताची शक्यता कमी –
नव्या बजाज अॅव्हेंजर 160 स्ट्रिट बाइकच्या पुढील बाजूला एबीएस फीचरसह डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक युनिटचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षेचा विचार करुन बाइकच्या मागील बाजूला Rear-Lift Protection (RLP) हे खास सेंसर लावण्यात आलं आहे. या सेंसरमुळे रस्ते अपघात कमी करण्यास मदत होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या बाइकमध्ये ब्लॅक्ड आउट स्टायलिंग, LED DRL सह नवे हेडलँप क्लस्टर, फोर्क गॅटर्स आणि अॅलॉय व्हिल्स आहेत. याशिवाय इतर मॉडेल्सप्रमाणे या बाइकमध्येही बॉडी ग्राफिक्स आहेत.