‘पावरफुल बाइक’ अशी ओळख असलेल्या Bajaj Auto च्या Dominar 400 च्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. कंपनीच्या या फ्लॅगशिप बाइकची किंमत 10 हजार रुपयांनी वाढली आहे. एप्रिलमध्ये या बाइकचं नवीन व्हर्जन(मॉडल) लाँच केल्यापूसन दुसऱ्यांदा कंपनीकडून किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

(Bajaj Dominar 400)

लाँच करतेवेळी 1.74 लाख रुपये रुपये इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत होती. त्यानंतर, जुलै महिन्यात सहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा 10 हजार रुपयांची वाढ झाल्याने या बाइकची एक्स-शोरुम किंमत 1.90 लाख रुपये झाली आहे.

फीचर्स –
डोमिनर 400 मध्ये 373.3cc क्षमतेचं इंजिन असून हे इंजिन 39.9hp ची ऊर्जा आणि 35Nm टॉर्क निर्माण करतं. जुन्या मॉडलच्या तुलनेत याची ऊर्जा 5hp अधिक आहे. बाइकचं सस्पेंशन देखील अपडेट करण्यात आलं आहे. यामध्ये नवीन युएसडी फोर्क आणि मागील बाजूला मोनोशॉक सस्पेंशन आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत नव्या बाइकमध्ये मोठा आणि अपडेटेड इंस्ट्रुमेंटल कंसोल आहे. 2019 Bajaj Dominar 400 मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्सऐवजी इनव्हर्टेड फॉर्क्स देण्यात आलेत. बाइकमध्ये मोठा बदल एग्जॉस्टमध्ये करण्यात आला आहे. आता ट्विन पोर्ट एग्जॉस्ट सेटअप देण्यात आला आहे. नव्या एग्जॉस्टमुळे आवाजातही बदल झाला आहे. याशिवाय बाइकच्या इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्येही बदल करण्यात आला आहे. आता यामध्ये साइड स्टँड पोझिशन ते सर्व्हिस रिमाइंडर, इंजिन किल स्विच ऑन/ऑफ, अॅव्हरेज फ्युअल एफिशिअंसी यांसारखे फीचर्स आहेत. बाइकच्या पेट्रोलच्या टाकीजवळ गिअर पॉझिशन इंडिकेटर देण्यात आलं आहे. त्याच स्क्रिनवर ओडोमीटर आणि ट्रिप मीटरदेखील आहे.