स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग करणं हा उत्तम व्यायाम आहे. रोज सकाळी प्रभातफेरी केल्यामुळे हृदयाचं निरोगी राहतं. त्यासोबतच शरीराला बळकटी मिळते. विशेष म्हणजे शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेव्हलही प्रमाणात राहते. सकाळी मॉर्निंग वॉकमुळे शरीराची हालचाल होते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमीही होते. परिणामी आपल्याला भूक लागते. भूक लागल्यानंतर सहाजिकच आपण भरपूर प्रमाणात नाश्ता करतो. मात्र हा नाश्ता करत असताना आपल्या शरीरात योग्य पदार्थ जातायेत की नाही हे पाहणंदेखील तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केल्यानंतर शरीरातील झीज भरुन काढण्यासाठी प्रोटीन आणि ग्लुकोजची आपल्याला आवश्यकता असते. त्यामुळे दिक्षा झाब्रा यांनी असेच काही पदार्थ सांगितले आहेत, जे मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केल्यानंतर शरीराची झीज भरुन काढतील.

१. चॉकलेट मिल्क –
चॉकलेट मिल्क म्हणजे लहानग्यांच्या आवडीचा पदार्थ. मात्र अनेक वेळा चॉकलेटमुळे दातांची समस्यां निर्माण होते. त्यामुळे आपण त्याच्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केल्यानंतर आपल्या नाश्तामध्ये चॉकलेट मिल्कचा समावेश हमखास झालाच पाहिजे. चॉकलेट मिल्कमुळे मांसपेशी रिकव्हर होण्यास मदत मिळते. चॉकलेट मिल्क तयार करण्यासाठी दालचीनी पावडर, बदाम पावडर आणि चॉकलेट पावडर दुधात मिक्स करावं.

२. उकडलेली अंडी, एवोकाडो आणि डाळींब –
सकाळच्या नाश्तामध्ये उकडलेली अंडी आणि फळांचा समावेश नक्कीच झालाच पाहिजे. यामध्ये उकडलेली अंडी, एवोकाडो आणि डाळींब यांचा वापर आवर्जुन करायला हवा. उकडलेली अंडी, एवोकाडो आणि डाळींबामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व असतात. या पोषक तत्वामुळे शरारातील ऊर्जा वाढविण्यास मदत होते.

३. कलिंगडाचं सॅलड –
जॉगिंग केल्यानंतर शरीरातील पाणी घामावाटे शरीराबाहेर पडलं असतं. त्यामुळे शरीराला पाण्याची आवश्यकता असते. अशावेळी कलिंगडाचं सेवण करणं फायदेशीर ठरतं. कलिंगडामध्ये ९० टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे कलिंगडाचं सेवण केल्यानंतर शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढली जाते. याच कारणास्तव नाश्त्यामध्ये कलिंगडाच्या सॅलडचा समावेश केला पाहिजे.

४. दूध आणि बदाम –
दूध आणि बदाम या दोघांमध्ये मिनरल आणि व्हॅटामिनचे प्रमाण जास्त असते. या दोघांचा आहारामध्ये समावेश केल्यास शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळतात. त्यामुळे मॉर्निंग वॉक केल्यानंतर एक ग्लास दूध आणि काही बदाम खायलाच हवे.

५. ओटमील –
ओटमीलमध्ये फायबर आणि अॅण्टीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं. याच्या सेवणामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यासोबतच वजनदेखील कमी करण्यास मदत होते. ओटमीलमध्ये प्रोटीनचं प्रमाणही जास्त असतं.