फुलझाडांसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी संपर्क आल्यास मुलांचा रक्तदाब वाढून त्यांना उच्च रक्तदाब जडण्याची जोखीम असते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन दिईगो विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. यात त्यांना फुलशेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके आणि मुलांमधील उच्च रक्तदाब यांच्यातील संबंध दिसून आला.

विशेषत: मातृदिन (मदर्स डे) साजरा करण्याच्या कालावधीत फुलशेतीसाठी मोठय़ा प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जातो. फुलांची मोठय़ा प्रमाणावर विक्री होण्याच्या हंगामांपैकी हा एक हंगाम असतो. याबाबतचा अभ्यास ‘एन्व्हॉयर्न्मेंटल रिसर्च’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. इक्युडोर भागातील फुलांच्या शेतांजवळ राहणाऱ्या मुला-मुलींचा यात अभ्यास करण्यात आला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, जगात व्यापारी तत्त्वावर सर्वाधिक फुलांचे उत्पादन घेणाऱ्या प्रांतांपैकी इक्युडोर हा एक आहे. या प्रांतातून उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियात मोठय़ा प्रमाणावर गुलाबांची निर्यात केली जाते.

गुलाबाच्या व्यापारी शेतीसाठी कीटकनाशके, बुरशीनाशके आणि अन्य कीडनाशकांचा वापर करावा लागतो. या सर्वाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, याविषयी अद्याप फारच थोडी माहिती उपलब्ध आहे.

कॅलिफोर्निया सॅन दिईगो विद्यापीठातील सहायक प्राध्यापक जोस आर. स्क्वॅरेझ यांनी सांगितले की, ‘कीटकनाशकांच्या फवारणीच्या हंगामात शेताजवळील मुलांचा त्यांच्याशी केवळ संपर्क येण्याचाच नाही, तर त्यांच्यात उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची जोखीम असते, असे या अभ्यासात प्रथमच दिसून आल्याने त्याची दखल घ्यावी लागेल.’ या संशोधकांनी चार ते नऊ वर्षे वयोगटातील ३१३ मुला-मुलींची मातृदिनाच्या हंगामात सुमारे शंभर दिवस तपासणी केली.