रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे दोन्हीही धोकादायकच असते. आतापर्यंत १४०-९० (एमएमएचजी) हे रक्तदाबाचे प्रमाण योग्य मानले जात होते पण अलीकडे अमेरिकन हार्ट असोसिएशनने ते १३०-८०  केले आहे. याचा अर्थ रक्तदाब १३०-८० असेल तर तो धोकादायक मानला जाईल. रक्तदाबाचे दुष्परिणाम १३०-८० या पातळीलाच जाणवू लागतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अमेरिकी मार्गदर्शक तत्त्वानुसार २००३ मध्ये १४०-८० हा रक्तदाब पातळीचा आकडा निश्चित करण्यात आला होता. ही पातळी कमी करण्यात आली असली, तरी हा आकडा दाखवल्यास लगेच रक्तदाबाची औषधे सुरू करायची असा होत नाही तर तो धोक्याची पातळी सुरू झाल्याचा इशारा असेल.

या काळात औषधेतर मार्गानी रक्तदाब आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे मत अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या हायपरटेन्शन या नियतकालिकात पॉल व्हेल्टन यांनी व्यक्त केले आहे. यात आरोग्यदायी जीवनशैलीचा एक मार्ग आहे. आरोग्यदायी जीवनशैली यांची व्याख्या कमी वजन, पुरेसा व्यायाम, आरोग्यदायी अन्नसेवन, अल्कोहोल व मीठ पूर्ण कमी करणे, धूम्रपान सोडण्याबरोबरच मनावरचा ताण कमी करणे अशी केली आहे. आता रक्तदाबाच्या नव्या व्याख्येनुसार अमेरिकेतील ४६ टक्के लोकांना जास्त रक्तदाबाचा विकार असणार आहे तर पूर्वी हे प्रमाण ३२ टक्के होते. धूम्रपानानंतर जास्त रक्तदाब हे हृदयविकार व पक्षाघाताचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे.

रक्तदाबाचे सुरक्षित प्रमाण हे १२०-८० असून त्यात १२० सिस्टॉलिक म्हणजे किती दाबाने रक्त हृदयाच्या ठोक्याला धमन्यांच्या भित्तीकांवर आदळते तो आकडा असतो, तर डायस्टॉलिक म्हणजे दोन ठोक्यांच्या दरम्यान रक्त किती दाबाने या भित्तीकांवर आदळते तो आकडा असतो. पूर्वी पन्नाशीत रक्तदाबाचा विकार होत असे. आता तो चाळिशीतच होऊ लागला आहे, याला ताणतणाव, व्यायामाचा अभाव ही कारणे आहेत.