हेडफोन लावून गाणे किंवा आणखी काही ऐकणे हे सध्या फॅड झाले आहे. तरुणांमध्ये तर मोठमोठे हेडफोन्स घालून फिरणे ही फॅशनही झाली आहे. असेच चार्जिंगला लावलेले हेडफोन घातल्याने एका १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मलेशियामध्ये घडली आहे. रेमबाऊमधील कामपुंग गाईंग बारु पेडास याठिकाणी ही घटना घडली. हेडफोन्स चार्ज होत असल्याने त्यात विद्युत लहरीं होत्या. या लहरींचा झटका बसल्याने तो कानात जाऊन मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नेमकी कशी घडली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र हा मुलगा वायरलेस ब्लुटूथ हेडफोन्स वापरत होता इतकी माहिती मिळाली आहे.

या मुलाची आई सकाळी कामानिमित्त बाहेर पडली तेव्हा तो जमिनीवर लोळत असल्याचे आईने पाहिले होते. तो झोपला असेल म्हणून त्याला न उठवता त्या कामाला गेल्या. दुपारी १२.४५ वाजता कामावरुन घरी आल्यानंतर तो सकाळी ज्या अवस्थेत दिसलेला त्याच अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्याचे शरीर थंड पडले होते आणि त्याचा मृत्यू झाला आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्याच्या शरीरावर कुठेही काही झालेले नव्हते. मात्र त्याच्या डाव्या कानातून रक्त वाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

काही महिन्यांपूर्वी जूनमध्ये क्रेडल फंडचा सीईओ नाझरीन हसन याचा मोबाईलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला होता. तो ब्लॅकबेरी आणि हुवाई या कंपनीचे स्मार्टफोन वापरत होता. हे दोन्ही फोन त्याच्या बेडरुममध्ये ठेवले होते, त्यांनी अचानक पेट घेतल्याने मोठा अपघात घडला होता. मात्र या दोन्हीपैकी नेमका कोणता फोन जास्त चार्ज झाल्याने स्फोट झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही. तर भारतातही ओडीशामध्ये मार्चमध्ये एका मुलीचा फोन चार्जिंगला असताना त्यावर बोलत असल्याने झालेल्या स्फोटात मृत्यू झाला होता. म्हणूनच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्जिंगला असताना वापरु नये हेच खरे.