ऑस्ट्रेलियातील संशोधकांचे मत
मोबाइल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे ऑस्ट्रेलियातील संशोधनात दिसून आले आहे. वय व िलग विशिष्ट पातळीवर १९८५८ पुरुष व १४२२२ महिलांच्या मेंदूची तपासणी ऑस्ट्रेलियात १९८२ ते २०१२ दरम्यान करण्यात आली होती, त्यावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. मोबाइलचा वापर व मेंदूचा कर्करोग यांचा काही संबंध नाही, असे नवीन अभ्यासात दिसून आले असून जास्त वापर असला तरीही गेल्या तीस वर्षांत मेंदूमध्ये गाठी आढळून येण्याचे प्रमाण वाढलेले नाही.
सिडनी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात १९८२-२०१२ दरम्यान रुग्णांची मेंदू तपासणी व १९८७ ते २०१२ दरम्यान मोबाइल फोनच्या वापराची माहिती यांची सांगड घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात मोबाइलचा वापर वयाच्या विशीपुढील लोकांमध्ये १९९३ मध्ये ९ टक्के होता, तो आता ९० टक्के आहे.
वयानुसार २०-८४ वयोगटात मेंदूच्या कर्करोगाचे प्रमाण पुरुषात किंचित वाढलेले दिसले पण वयाच्या तिशीपुढील महिलांत ते स्थिर राहिले. वयाची सत्तरी व त्यानंतर मेंदूच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसून आले पण ही वाढ १९८२ पासूनच सुरू झाली होती व मोबाइल फोन १९८७ मध्ये आले व त्यामुळे त्याचा याच्याशी काही संबंध नाही. वृद्ध व्यक्तींमध्ये आधीपासूनही मेंदूचे कर्करोग असावेत पण आता वाढत्या निदानाच्या सोयींनी ते शोधले जात आहेत. या काळातील मेंदूच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांची संख्याही तपासण्यात आली. पण त्यात दहा वर्षांच्या काळात मोबाइल फोनमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले नाही.
मोबाइल फोनच्या वापरात पन्नास टक्के वाढ गृहीत धरून हे संशोधन करण्यात आले. मोबाइलमुळे मेंदूचा कर्करोग होतो हे गृहीतक सिद्ध करण्यासाठी तसे १८६६ रुग्ण सापडणे आवश्यक होते पण १४३५ रुग्ण आढळले. त्यामुळे ते गृहीतक चुकीचे सिद्ध झाले. मोबाइल फोन हे आयनेतर पण कमी ऊर्जेची प्रारणे सोडत असतात. त्यामुळे केवळ इलेक्ट्रॉन्सना हलकीशी प्रेरणा मिळते, असे सिडनी विद्यापीठाचे सिमॉन चॅपमन यांनी सांगितले. ‘जर्नल कॅन्सर एपिडेमियॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.