रिलायन्स जिओ बाजारात आल्यापासून स्पर्धक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. जिओ दिवसागणिक बाजारात आपले नवीन प्लॅन्स आणत ग्राहकांना खुश करत आहे. या प्लॅन्सला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्याही सज्ज झाल्या असून त्याही आपल्या ग्राहकांना स्वस्तातील प्लॅन देऊन सुखद धक्के देत आहेत. नुकतेच बीएसएनएल या सरकारी भागीदारी असलेल्या कंपनीने आपले काही आकर्षक प्लॅन बाजारात दाखल केले आहेत. ४४४ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना आता रोज ६ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधताही ६० दिवस इतकी आहे. आधी या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज ४ जीबी डेटा मिळत होता. मात्र त्यात २ जीबीने वाढ करण्यात आली आहे. तसेच डेटाची मर्यादा संपल्यानंतर ६० केबीपीएस वेगाने डेटा मिळेल.

याबरोबरच कंपनी ९९९, ६६६, ४८५ आणि ४२९ व १८६ रुपयांच्या प्लॅनमध्येही जास्तीचा डेटा देत आहे. १८६ रुपयांच्या प्लॅनमध्ये आता ग्राहकांना रोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन जिओच्या १४९ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देत आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे. ४२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८१ दिवसांसाठी ३ जीबी डेटा, ६६६ रुपयांच्या प्लॅनमध्ये १२० दिवसांसाठी ३.५ जीबी डेटा मिळत आहे. मोबाईल इंटरनेटच्या प्लॅन्सबरोबरच बीएसएनएलने ब्रॉडबँडच्या प्लॅनमध्येही बरेच बदल केले आहेत. या क्षेत्रात आपले स्थान कायम रहावे असा कंपनीचा प्रयत्न आहे.

कंपनीने नुकताच ४९१ रुपयांचा ३० दिवसांसाठीचा प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना २० एमबीपीएस वेगाने २० जीबी डेटा मिळणार आहे. हाय स्पीड इंटरनेटबरोबरच बीएसएनएल या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा देत आहे. याआधी कंपनीने ७७७ रुपये आणि १२७७ रुपयांचे प्लॅन बाजारात दाखल केले होते. त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय कंपनीने आणखी एक खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बीएसएनएलने देशात पहिल्यांदाच इंटरनेट टेलीफोनी सेवेची सुरूवात केली आहे. या सेवेअंतर्गत बीएसएनएलचे ग्राहक मोबाइल अॅपद्वारे देशभरात कोणत्याही फोन क्रमांकावर कॉल करु शकतात. यासाठी बीएसएनएल ग्राहकांनी केवळ मोबाइल अॅप Wings डाउनलोड करण्याची गरज आहे.