बॉन्ड विद्यापीठातील संशोधकांचा दावा 

सध्या रुग्णांचे अतिनिदान म्हणजे ओव्हर डायग्नोज होण्याचे प्रमाण वाढले असून जो रोग किंवा व्याधी कधीही होऊ शकणार नाही, त्याचे उपचार केल्याने आयुष्यभरासाठी प्रकृतीच्या तक्रारी उद्भवत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

बॉन्ड विद्यापीठाचे पुरावा आधारित औषध विभागाचे प्रो. जी. पी. पॉल ग्लासझिव्ह्यू यांनी याबाबत न्यूज जीपीला सांगितले की, प्रामुख्याने कर्करोगाचे अतिनिदान होण्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तुम्हाला आयुष्यात जो विकार होऊ शकणार नाही, त्याचे निदान जाहीर करणे म्हणजे अतिनिदान होय, असे त्यांनी सांगितले.

प्रामुख्याने स्तनांचा, पुरस्थ (प्रोस्टेट) ग्रंथी, घशाचा कर्करोग आणि मुत्रमार्गाच्या कर्करोगात अतिनिदान होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण ४० ते १०० टक्के इतके भयावह आहे. घशाच्या कर्करोगाचे निदान करताना तीनपैकी केवळ एका घटकाचे निदान बरोबर ठरते, असा त्यांचा दावा आहे.

ऑस्टेलियात दोन दशकांत घशाच्या कर्करुग्णांचे प्रमाण तीनपट वाढले आहे. मानवात सुप्तावस्थेतील कर्करोगाचे प्रमाण मोठे असते. अशा कर्करोगाची प्रत्यक्षात बाधा होत नाही. अनेकदा तो नष्ट होतो. पण सध्या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे अशा कर्करोगाचेही निदान होत आहे, असा प्रो. ग्लासझिव्ह्यू यांचा दावा आहे.