शस्त्रक्रिया करताना शरीराच्या त्या भागातील गंधावरून तेथील कर्करोगग्रस्त पेशी ओळखून तशी सूचना डॉक्टरांना देणारे साधन शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्यामुळे कर्करोगाच्या गाठी नेमकेपणाने काढून टाकणे डॉक्टरांना शक्य होणार आहे.

सध्या चेताशल्यकर्मात (न्यूरोसर्जरीमध्ये) इलेक्ट्रिक चाकू किंवा डायअथर्मी पात्याद्वारे काप घेण्याचे तंत्र सर्रास वापरले जाते. या क्रियेत जेव्हा शरीरातील उती जाळली जाते, तेव्हा शल्यजन्य धुराच्या (सर्जिकल स्मोक) रूपाने या उतीचे रेणू त्या भागात पसरतात.

फिनलंडमधील टॅम्पेरे विद्यापीठातील संशोधकांनी असे एक नवे मापन साधन तयार केले आहे, ज्यामध्ये शल्यजन्य धूर जाताच, हे साधन रोगग्रस्त उतींची सूचना देते. त्यामुळे शरीरातील कर्करोगग्रस्त पेशींची उती कोणती आणि निरोगी उती कोणती, हे ठरविणे शक्य होणार आहे.

याबाबत टॅम्पेरे विद्यापीठातील इल्का हापाला यांनी सांगितले की, सध्याच्या शल्ककर्म पद्धतीत शरीरातील काढून टाकण्याच्या कर्कगाठी ओळखण्यासाठी ‘फ्रोझन सेक्शन अ‍ॅनालिसिस’ ही सर्वमान्य पद्धत आहे. या पद्धतीत शस्त्रक्रिया करताना कर्कगाठीचा लहानसा भाग पॅथोलॉजिस्टला तपासणीसाठी दिला जातो. या भागाचे सूक्ष्मदर्शकाखाली अवलोकन करून पॅथोलॉजिस्ट आपला अहवाल दूरध्वनीवरून शस्त्रक्रियागारातील डॉक्टरांना कळवितो. आमच्या नव्या पद्धतीमुळे शस्त्रक्रिया सुरू असतानाच कर्करोगग्रस्त उती ओळखणे शक्य होईल, शिवाय कर्कगाठीच्या विविध नमुन्यांची वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून तपासणीही करता येईल, असा दावा हापाला यांनी केला. विशेष म्हणजे हे नवे साधन न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रियागारांमध्ये सध्या असलेल्या साधनांना जोडता येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.