आहारात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या व्यक्तींना चरबीयुक्त पदार्थ जास्त खाणाऱ्यांपेक्षा लवकर मृत्यू येण्याचा धोका असतो, असे प्रॉस्पेक्टिव्ह अर्बन रुरल एपिडेमिऑलॉजी (प्युअर) नावाच्या अभ्यासात दिसून आले आहे.

आजवर असे मानले जात होते की, आहारात चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण कमी ठेवल्यास कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते. पण नव्या अभ्यासात या मान्यतेलाही धक्का बसला आहे.

ज्या व्यक्तींच्या आहाराचा दर्जा उच्च असतो, म्हणजे ज्यांना मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ५४ टक्के ऊर्जा कर्बोदकांतून मिळते, २८ टक्के ऊर्जा चरबीयुक्त पदार्थातून मिळते, १८ टक्के ऊर्जा प्रथिनांतून मिळते त्यांना कोणत्याही कारणाने मृत्यू येण्याचा धोका २५ टक्के कमी असतो असे या अभ्यासात दिसून आले.

या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांना अनेक डॉक्टरांनीही दुजोरा दिला. हृदय निरोगी ठेवण्यासाठी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाबासारखे रोग नियंत्रित ठेवले पाहिजेत आणि त्यासाठी पॉलिश केलेल्या तांदळाचा भात, शर्करायुक्त पदार्थ, रोटी आणि ब्रेडच्या वापरावर मर्यादा आणली पाहिजे, असे डॉक्टरांनी सांगितले.

संतुलित आहारात ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्बोदके नसावीत आणि ३० ते ३५ टक्के चरबीयुक्त पदार्थ असावेत. असंतृप्त चरबीचे (अनसॅच्युरेटेड फॅट्स) प्रमाण मर्यादित असावे आणि संतृप्त चरबीयुक्त पदार्थ टाळावेत, असेही अपोलो ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सचे डॉक्टर सुव्रो बॅनर्जी यांनी सांगितले. प्रक्रिया न केलेले पूर्ण चरबीयुक्त दूध आणि चीज प्रमाणात खाण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले.