करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. देशात सध्याची परिस्थिती पाहता काही दिवसांसासाठी हे लॉकडाऊन वाढवलं जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या काळात घरात राहण्याची विनंती सर्व सरकारी यंत्रणा करत आहेत. या काळात जिवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक लोकं आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली रहावी यासाठी प्रयत्नात असतात. सोशल मीडियावर अनेक जणांनी या काळात नवनवीन पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. डगलोना कॉफी हा ट्रेंड गेल्या काही दिवसांत चांगलाच फेमस झाला आहे. मात्र सेलिब्रेटी शेफ संजीव कपूर यांनी या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली रहावी यासाठी हळद घातलेलं दूध पिण्याचा सल्ला दिला आहे.

“पारंपरिक भारतीय स्वयंपाक घरात बनणारे सर्व पदार्थ हे सकस मानले जातात. आपल्या घरात मसाल्यांचा डबा असतो तो एका प्रकारे औषधांचा बॉक्सच आहे. सकस आणि संतुलित आहार याला सध्याच्या काळात अधिक महत्व आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हळद…हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, जंतूनाशक म्हणून उत्तम मानली जाते. एक भांड गरम पाणी घेऊन त्यात हळद, आलं आणि तुळशीची पान घालून पिऊ शकता. सध्या अनेक लोकं डलगोना कॉफीबद्दल बोलत आहेत, पण मी त्यांना सांगेन की हळद घातलेलं दूध सध्याच्या घडीला सर्वोत्तम आहे. याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. संत्र, मोसंब, लिंबू यासारख्या गोष्टींचं सेवन सध्याच्या काळात केलं तर उत्तम राहिल. आवळे, सिमला मिरची, ब्रोकोली यासारख्या फळभाज्याही सध्याच्या काळात सेवनासाठी चांगल्या आहेत.” संजीव कपूर इंडियन एक्स्प्रेसच्या फेसबूक लाईव्हमध्ये बोलत होते.

सध्याच्या काळात अनेकांना घश्याचा त्रास होतो. खोकला, घसा खवखवणे यासारख्या आजारांसाठी हळद आणि गुळ एकत्र करुन त्याच्या गोळ्या घेतल्या तरीही बरं वाटतं. महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या काळात व्यवस्थित झोप मिळणं हे देखील तितकचं महत्वाचं असल्याचं संजीव कपूर यांनी सांगितलं. भारतात सध्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा यावर कधी नियंत्रण मिळवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.