नवजात शिशूच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारने कौटुंबिक सहभाग संगोपनाबाबतची (एफपीसी) मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे देशभरातील विशेष नवजात संगोपन कक्षांना (एसएनसीयू) लागू होणार आहेत.एफपीसी ही आरोग्य सेवेसाठी महत्त्वाची संकल्पना म्हणून उदयास आली आहे. ती आरोग्य कर्मचारी आणि कुटुंबातील आजारी मुलांचे संगोपन यांच्यामध्ये भागीदारी करण्याचे काम करते.

ही मार्गदर्शक तत्त्वे बाल संगोपनासाठी आवश्यक असून, या माध्यमाद्वारे पायाभूत सुविधांची माहिती, प्रशिक्षण, आरोग्य सेवेची भूमिका याबाबत माहिती देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी केलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व राज्यांसासाठी लागू असतील. त्यामुळे देशभरातील नवजात संगोपन कक्षांच्या माध्यमाद्वारे शिशूच्या आरोग्याची आवश्यक ती सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. आजारी आणि नवजात बालके अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनाच्या प्रथम वर्षांत त्यांचे काळजीपूवर्क संगोपन करणे आवश्यक असते.

राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत देशामध्ये ७००पेक्षा अधिक ठिकाणी चोवीस तास बालकांचे संगोपन करण्यासाठी विशेष नवजात संगोपन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नवजात मुलांची अतिशय जास्त काळजी घेण्यासाठी येथे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे.

जर पालकांना रुग्णालयात बालक आजारी असताना बालकांची योग्य ती काळजी घेण्यासंदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण दिले तर पुढील काळामध्ये बालकाच्या आरोग्यामध्ये फक्त  सुधारणाच होत नसून त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासामध्येही वाढ होत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांना आढळले आहे.