मुंबईत पेट्रोल १०८ तर डिझेल ९७.४६ पैसे प्रति लिटरवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत जर नवीन कार घ्यायची असेल तर खरेदीदार आता पेट्रोल, डिझेलला पर्याय शोधत आहे. विद्युत कार हा एक चांगला पर्याय डोळ्यासमोर आहे. मात्र या वाहनांच्या किमती सर्वसामान्यांना अद्याप परवडणाऱ्या नाहीत तर पायाभूत सुविधांचीही वानवा आहे. आता कुठे शासनाने नवे विद्युत वाहन धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील काळात यात काही बदल होतील व या वाहनांकडे खरेदीदार वळतीलही पण आता काय? हा प्रश्न अनेकांसमोर असून ते सीएनजी कारचा पर्याय शोधत आहेत. होय, सध्या सीएनजी कार हा त्यातल्या त्यात परवडणारा पर्याय आहे.

सीएनजी म्हटले की पहिले नाव घेतले जाते ते मारुती सुझुकी या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीचे. या कंपनीने अनेक सीएनजी कारचे पर्याय बाजारात उपलब्ध करून दिले असून त्यांना चांगली मागणी आहे. मारुतीने या आर्थिक वर्षात दीड लाख सीएनजी कार विकल्या आहेत. तर दुसरा पर्याय आहे ह्युंदाई मोटर्स. या कंपनीनेही आपल्या काही कार सीएनजीवर बाजारात उपलब्ध करून दिल्या असून कंपनीने या आर्थिक वर्षात सुमारे २५ हजारांच्या घरात कार विकल्या आहेत. महिंद्राने ‘केयूव्ही’च्या रूपाने पर्याय दिला होता, मात्र या कारला मागणी दिसत नाही. सीएनजी कारची वाढलेली मागणी पाहता दुसरी आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आता सीएनजी कारचे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी २०२२ या चालू वर्षात आपल्या दोन कार (टियागो व टिगोर’ सीएनजी रूपात बाजारात उतरविणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुढील काळात सीएनजी कारमध्ये खरेदीदारांसाठी आणखी चांगले पर्याय उपलब्ध होतील असे दिसत आहे.

त्यामुळे सीएनजी कारचा पर्याय शोधत असलेल्या खरेदीदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोणत्या सीएनजी कारची किती विक्री झाली व कोणती कार घेणे योग्य ठरू शकते, ते पाहू.

सीएनजी कार विक्रीत पहिल्या स्थानावर राहिली ती मारुती सुझुकीची वॅगन आर. सध्या परवडणारी, कुटुंबासाठीची कार म्हणून या कारकडे पाहिले जात आहे. या वर्षी ६०,२२२ इतक्या कारची विक्री झाली. तर गेल्या वर्षी ३८,३४७ इतक्या कार विकल्या होत्या. दुसऱ्या स्थानावर मारुती सुझुकीचीच एर्टिगा ही कार आहे. या कारलाही चांगली मागणी आहे. गेल्या वर्षी १२,१७२ कारची विक्री झाली होती तर या वर्षी ३१७७६ कार विकल्या गेल्या आहेत. सीएनजी इंधनावर असलेली ही एकमेव सात आसनी कार असून दुसरा कोणताही पर्याय नसल्याने या कारला मोठी मागणी आहे. तर सर्वाधिक वापर होणारी व बहुपयोगी म्हणून ज्या कारकडे पाहिले जाते ती मारुतीची सुझुकीची इको तिसऱ्या स्थानावर आहे. या कारच्या विक्रीत ३४ टक्क्यांनी  वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १४५५३ कारची विक्री झाली होती तर या वर्षी १९४४२ कार विकल्या गेल्या आहेत. चौथ्या स्थानावर आहे मारुती सुझुकीची सेलेरिओ. या कारची १८ टक्क्यांनी मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी १५,५५६ कार विकल्या होत्या. या वर्षी १८,३०२ कारची विक्री झाली आहे.

ह्यांदाई मोटर्सने सीएनजी कार विक्रीत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आघाडी घेतली आहे. कंपनीच्या ऑरा या कारला मोठी मागणी आहे. गेल्या वर्षीपेक्षा एक हजार टक्क्यांनी मागणी वाढली असून १०६५६ कार विकल्या आहेत. तर गेल्या वर्षी फक्त ९३३ कार विकल्या होत्या.  तर ह््युंदाईच्या ग्रँड आय टेन नियोस या कारची या वर्षात ८,९८१ कारची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी फक्त १,६२५ कार विकल्या गेल्या होत्या.

सातव्या स्थानावर आहे, मारुती सुझुकीचीच डिझायर. या कारची विक्री मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत  ५३ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षी १८,५०५ कारची विक्री झाली होती. या वर्षी ८७४६ कार विकल्या आहेत. तर ५५०९ कारची विक्री करीत सीएनजीत आठव्या स्थानावर आहे मारुती सुझुकीची अल्टो. गेल्या वर्षीपेक्षा फक्त ९ कारची जास्त विक्री झाली आहे. नवव्या स्थानावर आहे मारुतीची एस प्रेसो. या वर्षात ४२१४ कार विकल्या आहेत. गेल्या वर्षी फक्त एक कारची विक्री झाली होती. पण त्या वेळी ती नुकतीच बाजारात आली होती. आणि दहाव्या

स्थानावर आहे ह्युंदाईची सेंट्रो. या कारची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी ४२४७ कारची विक्री झाली होती. मात्र या वर्षी फक्त २८०६ कारची विक्री झाली आहे.

र्याय कोणता?

सात आसनी कारचा विचार करीत असाल तर एकमेव पर्यात आहे एर्टिगा. लांबच्या प्रवासासाठी इंधन म्हणून परवडणारी कार असून मोठ्या कुटुंबासाठी ही कार योग्य पर्याय ठरू शकते.

सेडान

या प्रकारात सीएनजी कारचा विचार करीत असाल तर ह्युंदाईची ऑरा हा एक चांगला पर्याय आहे. या वर्षी १०,६५६ इतक्या कार विकल्या गेल्या असून या कारमध्येही मोठी जागा मिळते तसेच दिसायलाही ही कार चांगली आहे.

हॅचबॅक

या प्रकारातील सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल आणि बजेटही नऊ लाखांपर्यंत असेल तर ह्यांदाईची ग्रँड आय टेन निऑस हा चांगला पर्याय आहे. बजेट ६ लाखांपर्यंत असेल तर मारुती सुझुकीची वॅगन आर हा चांगला पर्याय आहे. आणि ५ लाखांपेक्षाही कमी बजेट असेल तर मारुती सुझुकीची एस प्रेसा आणि अल्टो हे दोन पर्याय चांगले आहेत.